- ना.रा.खराद
हे स्पर्धेचे युग आहे असे म्हंटले जाते.तसे ते का असावे हा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.
मांसाच्या तुकड्यावर जशी अनेक कुत्री तुटून पडतात त्याप्रमाणे माणसे देखील जिथे तिथे स्पर्धा करतांना दिसत आहे.कित्येक स्पर्धा गरज नसतांनाही लावलेल्या असतात.जे मिळवायचे तेअधिक कठिण करणे हा स्पर्धेमागचा उद्देश असतो.ससा कासव आपली जीवनकहाणी बनली आहे.
निसर्गात कुठेही स्पर्धा नाही.प्राणी कोणतीही स्पर्धा करत नाही.स्पर्धा अनैसर्गिक आहे.अमूकला दाखवण्यासाठी.मागे टाकण्यासाठी.जिरवण्यासाठी जे काही केले जाते,ही जीवघेणी व आयुष्याचा अपव्यय आहे.
साधने कमी , उपभोक्ता जास्त तिथे स्पर्धा अपरिहार्य असते.इतरांना मागे सारुन आपले घोडे पुढे काढायचे हे स्पर्धेचे वैशिष्ट्य असते.
अगदी शाळेतील रांगोळी स्पर्धेपासून तर
आय ए एस स्पर्धा परीक्षेपर्यंत त्याची व्याप्ति आहे.
रांगोळीचे सौंदर्य महत्त्वाचे नाही तर स्पर्धेत नंबर आणणं महत्त्वाचे होऊन जाते.कोणतीही कला स्पर्धेत उतरली की ती कला राहत नाही.स्पर्धेसाठी पहलवान तयार केले जातात, अशा कित्येक स्पर्धा फक्त अंहकाराचे पोषण करण्यासाठी असतात.त्यामधून साध्य काहीच होत नाही, फक्त इतरांना हरवण्याचा उन्माद हा अनाकलनीय आहे.
माणसे माणसांशी कायम स्पर्धा करत आहेत.प्रत्येक व्यक्ति आपणास स्पर्धक वाटावा असा हा काळ आहे.प्रत्येक बाबतीत मीच पुढे असले पाहिजे असे सर्वांनाच वाटू लागले आहे.
मानसिक बिमारी वाटावी इतका तो टोकाला गेला
आहे.इतरांची बरोबरी करणे या नादात तो आपली
मानसिक शांति गमावतो.
कित्येक स्पर्धा करमणूकीसाठी असतात.माणसांनी
स्पर्धेमध्ये मुक्या प्राण्यांना पण ओढले आहे.हेल्याची,एडक्याची टक्कर.बैलशर्यंत हे काय
आहे, कशासाठी आहे.आपण जिंकलो हे काय
त्या बैलांना ठाऊक असते.स्पर्धा म्हंटले की जिंकण्यासाठी असते, त्यासाठी इतरांना हरवावे
लागते.हा खटाटोप कशासाठी? साधे सरळ जीवन
जगणे सोडून हा खटाटोप का करावा?
त्याचे तो जगतो,आपले आपण जगतो ह्यात कशाला स्पर्धा हवी.मोठमोठ्या परीक्षेमध्ये मिळालेले यश त्यामूळेच कुतूहल वाटते.इतक्या
स्पर्धकांना मागे टाकून मी यशस्वी झालो.
इतरांना मागे टाकण्याचा हा अट्टाहास अयोग्य
आहे.प्रत्येकजन आपल्या ठिकाणी योग्य आहे.
योग्यतेचे आपण लावलेले निकष खरेच योग्य
आहे का?
लोकशाहीमध्ये निवडणुका देखील पुढाऱ्यांसाठी
स्पर्धा ठरत आहे.हिसकावणे,बळकावणे,पटकावणे
ही विजयी स्पर्धकांची क्रियापदे असतात.
वाढत्या लोकसंख्येमुळे वस्तूंचा तुटवडा. वाढत्या
गरजांमुळे जीवघेणी स्पर्धा.दूसऱ्यांकडून हिसकावल्याशिवाय बसमध्ये जागा मिळणे देखील
दुरापास्त झाले आहे.एका कुत्रीमागे जशी चार कुत्री
भटकतात तसे एका पदासाठी लाखों अर्ज येतात.
मी माझ्या ठिकाणी योग्य आहे.माझी कुणाशी स्पर्धा
नाही.कुणाला मागे टाकून मला मूळीच पूढे जायचे
नाही.माझ्या मागेपुढे कुणी नसेल तर मी जिंकलेलोच आहे.कुणाला तरी पटकी देऊन पहलवान म्हणून घ्यायची आवड काय कामाची.
पळायला लावायचे आणि त्यास स्पर्धा हे नाव द्यायचे हा कसला पोरकटपणा.नोकरीची गरज सर्वांना आहे.त्यासाठी स्पर्धा कशाला? सरसकट
ती गरज पूर्ण करावयास हवी.मी इतरांना मागे टाकून, हरवून जिंकलो ,हा अंहकार व्यर्थ आहे.
यामुळे माणूस माणसाचा वैरी झाला.तो इतरांना
आपला स्पर्धक समजू लागला.
महाकाय वटवृक्ष आणि बाजूला एखादे गुलाबाचे
रोपटे असेल तर एकमेकांशी स्पर्धा करत नाही.तुलना करत नाही.आपल्या जागेवर दोन्ही
योग्यच.गरुड आणि घुबड स्पर्धा करत नाही.
माणसे स्पर्धा का करतात.महत्वाकांक्षा हे त्यांचे
एक कारण आहे.असूया,अंहकारातून देखील स्पर्धा
सुरु होते.त्याने गाडी घेतली ,मी त्याच्यापेक्षा मोठी
घेणार.मी जास्त गुण मिळवणार.यशस्वी स्पर्धकाचा
होणारा उदोउदो अजून खतपाणी घालतो.
हत्ती आपल्या गतीने चालतो,घोडा आपल्या गतीने
स्पर्धेचा प्रश्न कुठे येतो.आपणास चित्र काढण्यात
आनंद नाही तर माझे चित्र प्रथम आले यामध्ये आहे.गायनाचा आनंद घेण्यासाठी आपण खात
नाही तर ते गाणे स्पर्धेत आणतो.आपल्या कविता
सहज अभिव्यक्ती न रहाता,स्पर्धेच्या बाजारात नाचत असतात.आपणास सिद्ध करायचे आहे की
मी कोण आहे,किती लोकांना मी मागे टाकले आहे,
मी श्रेष्ठ आहे.मी विजेता आहे .मी...मी..मी.
घरात सगळ्या प्रकारची भांडी असतात.लहान
मोठी पण ती आपसात स्पर्धा करत नाही.गरजेचे
वेळी जो तो महत्त्वाचा.युद्ध सुरू झाले की अधिकारी लढत नाहीत.खंब्यावर नेते चढत नाही.
गटारे साफ करणारेही महत्वाचे असतात.
स्पर्धा लावता कुणामध्ये.कौशल्याची कामे करणारे
द्या मोठा मोबदला मग बघूया.दहीहंडी स्पर्धा किती
जीवघेणी.हंडी खाली कुणीही फोडू शकते मग
कशाला वर लटकावयाची.केवळ स्पर्धेसाठी!
स्वयंवरमध्ये बायको मिळवण्यासाठी स्पर्धा.बायकोपेक्षा मी जिंकलो याचाच आनंद जास्त. विजयाची मिरवणूक ही हरवण्याचा उन्माद
असतो.सुंदर असणे पुरेसे पण त्यामध्येही स्पर्धा.
सर्व प्रकारच्या स्पर्धेपासून दूर रहाणे मला आवडते.
मला पुढे जाणे,मोठे होणे, यशस्वी होणे नक्कीच
आवडते पण इतरांना मागे टाकून,त्याच्याशी स्पर्धा
करुन कदापि नाही.
स्पर्धेविषयी आपले मत वाचायला आवडेल.