मूर्खांचा स्वर्ग, शहाण्यांना नर्क असतो.

                                        मूर्ख असण्याचे फायदे !
                                                                   - ना.रा.खराद
जगात माणसाचे दोन प्रकार मानले जातात, मूर्ख आणि शहाणे.प्रत्येकजन स्वतःला शहाणा समजत असला तरी त्यामध्ये बहुतेक मूर्ख असतात.मूर्ख हा कुणी निवडलेला प्रकार नसतो.नैसर्गिकरित्या मूर्ख जमात जन्माला आलेली असते.मूर्खांमुळे जसा शहाण्या लोकांना त्रास होतो,तसा शहाण्या लोकांमुळे मूर्खांना होतो.शहाणे असणे जसे फायद्याचे असते, तसे मूर्ख असण्याचे देखील खूप फायदे आहेत.असे नसते तर
कुणीही मूर्ख राहिले नसते, मूर्खपणा सोडला असता, परंतु मूर्ख असणे खूप फायदेशीर ठरते.
  जितका त्रास शहाण्याच्या वाट्याला येतो ,तितका मूर्खांच्या वाट्याला येत नाही.जगातील सर्व शहाणी माणसे छळली गेली, तुरुंगात गेली.विचारवंत, तत्वज्ञानी, साहित्यिक कायम दुःखात असतात,ते ज्यांना सुखी करु पहातात, ते मात्र आपल्या मूर्खपणात,अज्ञानात सुखी असतात.
मूर्ख असण्याचे खुप फायदे आहेत, त्यामुळे मूर्ख आपला मूर्खपणा सोडत नाहीत.जो त्रास होत तो शहाणपणामुळे! मूर्खांची दृष्टी शहाण्यापेक्षा वेगळी असते.जे कृत्य शहाण्या लोकांना चूकीचे वाटते, मूर्ख ते कृत्य आवर्जून करतो.हे जग शहाण्याच्या शहाणपणावर नाही तर मूर्खांच्या मूर्खपणावर चालते.जगातील
घडामोडी आणि उचापती या शहाण्या लोकांच्या नसून मूर्खांच्या आहेत.बहुतेक देशात लोकशाही असल्याने शहाणे निवडून येत नाहीत,बहुमताचा परिणाम!
   जगात बोटावर मोजण्याइतके शहाणी माणसे आहेत,त्यांचा शहाणपणा अजून थोड्या लोकांपर्यंत पोहोचला आहे,इतर मात्र आपल्या विश्वात वावरतात.शहाणपणापासून दूर राहतात.आपण शहाणे आहोत,असे प्रत्येक मूर्खांची धारणा असते.एकमेकांना माणसे सहज मूर्ख म्हणतात ते उगीच नाही.
जगातील सर्वात ज्ञानी माणसाला देखील मूर्ख माणसे मूर्ख समजतात.
  मूर्ख हा समजून घेत नसल्याने,त्यास समजत नसल्याने त्यास योग्य, अयोग्य समजत नाही, त्यामुळे त्यास फार काटेकोर, न्यायाने, नीतीने वगैरे वागण्याची गरज नाही.त्याच्याशी कुणी भांडत नाही." मूर्खांच्या कुठे नादी लागता." असे बोलून लोक त्यांच्यापासून दूर राहतात,त्यास सांभाळून बोलतात.
मूर्खास पुढील संकट कळत नसल्याने, संकटातही आनंदी राहण्याची त्यांची वृत्ती असते.मूर्ख असल्याने मान अपमान कशा सोबत खातात हे त्यांना माहीत नसते.
कल्पनाशक्ती आणि स्मरण दोन्ही नसल्याने ते काल्पनिक गोष्टी करत नाहीत व ते मागचा विचार करत नाहीत, त्यामुळे मूर्ख नेहमी सुखी असतात.कशाचे दुःख करावे आणि करु नये हे कळत नसल्याने अनेक दुःखाच्या प्रसंगी ते सुखी राहू शकतात.
 मूर्खांचा बहुतेक वेळ भांडण तंट्यात जातो, त्यामुळे वेळ कसा घालवावा हा प्रश्न त्यास पडत नाही.मूर्खांची
संख्या जास्त असल्याने त्यास मित्रांची कमतरता नसते.मूर्ख हा कुणालाही वठणीवर येत नाही, त्यामुळे
तो सदैव विजयी असतो.मूर्खांना शहाणपणाचे वावडे असल्यामुळे, शहाण्यांची पुस्तके वाचण्यात ते वेळ घालत नाही.मूर्खाना मोठ्या हुद्द्यावर बसवले की शहाणी माणसे दुय्यम ठरतात.अनेक मोठी माणसे मूर्ख असतात, परंतु मोठे असणे महत्त्वाचे असते, शहाणे असणे नाही.शहाणी माणसे पैशाने मोठी नसण्यामागे
त्यांचे शहाणपणा आहे.
मूर्ख कुणाचे ऐकून घेत नसल्याने,त्यास कुणाचे ऐकावे लागत नाही.त्याचे कुणी ऐकत नसले तरी तो बोलत
राहतो.
 चूकीच्या गोष्टी नष्ट करण्यासाठी शहाणी माणसे आजन्म प्रयत्न करतात, आयुष्य खर्ची घालतात,उलट
मूर्ख मजेत राहतात, आपण कसे आणि कशासाठी जगत आहोत, ह्याचा ते मूळीच विचार करत नाहीत.
शहाण्याला शब्दांचा मार असतो,तसा मूर्खाना नसतो.इथेही तो वाचतो.गाढवाला गुळाची चव नसते म्हणतात, तसे मूर्खाना चांगल्या गोष्टीचे महत्त्व कळत नसल्याने त्याचा वेळ आणि श्रम वाचते.
मूर्खाकडे तत्व आणि सिद्धांत नसल्याने तो कसेही वागण्यास स्वतंत्र असतो.मूर्खास सर्व क्षम्य असते, त्यामुळे त्यास शिक्षा होत नाही.सर्व गुण हे शहाण्याकडेच असले पाहिजेत, मूर्खाकडे एकही गुण नसला तरी लाड त्यांचे होतात.जो शहाणा असतो,तो माघार घेतो,कारण मूर्ख माणसे हटवादी, दुराग्रही व उपटसुंभ असतात.त्यांचा अंदाज घेता येत नाही, ते अत्यंत लहरी किंवा मूडी असतात.
त्यांच्या विश्वात ते रममाण असतात,मूर्खांचा स्वर्ग हा शहाण्यांसाठी नर्क असतो.
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.