घर पहावे बांधून

         घर पहावे बांधून
मी घर बांधणार असल्याची बातमी वाऱ्यासारखी घराघरातपोहचली.
अनेकांना तर ती अफवाच वाटली, आपण काहीच करु शकत नाही ,असा काहींचा उगीचच समज असतो.
"आजचा भाडेकरू हा उद्याचा घरमालक असतो." असे विचारवंता सारखे मी बोलत असे.'घर बांधणे सोपे नसते.' असे घर बांधलेले लोक मला सावध करु लागले.
  एकाने तर मला फोन केला," तुम्ही घर बांधत आहात म्हणे!' आणि मोठ्याने हसू लागला.तो म्हणे,"कशाला पडता त्या भानगडीत!" भानगड? तो त्याच्या
घरात बसून निश्चिंतपणे बोलत होता.
कुणीतरी माझ्या ऐपतीवर शंका घेतली.
"कोणत्या बँकेचे कर्ज घेतले?" 
जसे कर्जाशिवाय पैसेच नाहीत."अगोदर पैशाची सोय करा, मगच पुढचे.." पैसा नसेल तर कुणी घर कसे बांधेल? इतकेही कळू नये?
एक नातेवाईक म्हणे," फार घबाड सापडले वाटते."
एक पाहुणा ,जो फार अंधश्रद्धाळू आहे," जागेची शांति करुन घ्या." असे म्हणाला ,जशी धमकीच!
"चांगले मोठे घर बांधले की खुप पाहुणे येतात हो!" असे सतत पाहुण्यांच्या घरी असलेल्या पाहुण्याने आपली व्यथा मांडली.
 एक ओळखीचा इसम बोलला," आता चांगले मोठे घर बांधा,खुराड्यात किती दिवस राहणार?" म्हणजे आतापर्यंत मी जिथे राहत होतो त्यास हा खुराडा समजत होता.
पोरांना वैतागलेला एक शेजारी ," तुमचं आयुष्य ते किती उरले?" सरळ माझ्या जगण्यावरच बोट ठेवले." पोरांसाठी कशाला खस्ता खाता,पोरं घरातून हाकलून देतील." त्याचे हे भाकीत मला
खुप झोंबले.
स्वत: चांगले तीन मजली घर बांधून
बसला. " हे काय घर बांधायचे वय आहे." असे कुणीतरीबोलले.हे काय लग्न करायचं वय आहे,असे बोलल्यासारखे वाटले.
घर बांधण्यापूर्वी घराला लागलेली घरघर बघून पुढे काय होणार याची चाहूल मला लागली.परंतु ऐकुन घ्यायचे असते, ऐकायचे नसते हे मला ठाऊक होते.
                 
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.