- ना.रा.खराद
जीवन म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास! मृत्यू म्हणजे पूर्णविराम, मृत्यू म्हणजे समारोप.जन्माप्रमाणेच मृत्यू एक गुढ आहे, ते अद्याप कुणालाही उलगडलेले नाही.आपण एका रहस्यमय जगात वावरत आहोत,या विश्वात आपण एकटेच नाहीत,तर असंख्य जीवजंतू आहेत.एकच ग्रह नाही तर असंख्य आहेत, कशाचीही मोजदाद करता येणे शक्य नाही.
मृत्यू आकस्मिक आणि दुःखद असतो,कारण
तो सर्व काही संपवून टाकतो, हिसकावून घेतो.मृत्यूला कुणीही हारवू शकलेले नाही.अनेक दंतकथा आणि भाकडकथा पसरलेल्या किंवा जाणीवपूर्वक पसरलेल्या असतात.मृत्यूची तारीख आणि वेळ मृत्यू नंतर कळते.जे इतरांना वाचवतात त्यांचाही मृत्यू होतोच.मृत्यू कुणाचाही आणि कशानेही टळत नाही.त्याची वेळ,काळ, आणि स्थळ ठाऊक नसते,तो कायम सोबत असतो.पाहिजे तेव्हा तो गाठतो,तो जवळचा शत्रू असतो.तो कशानेही आला तरी तो येणारच असतो.तो आपणास घेऊन जातो.कुठे घेऊन जातो कुणालाही माहीत नसते.
मृत्यू बद्दलच्या अनेक कपोलकल्पित कथा प्रसिद्ध असतात, त्यामध्ये तथ्थ नसते.मृत्यू
इहलोकातून परलोकात प्रवास असतो.मृत्यू नंतर जर आपण कुठे जात असू तर मृत्यू नंतर ही कुठेतरी जात असणार, कदाचित आहे त्यापेक्षा जास्त चांगल्या जगात!
मृत्यू एक भयंकर घटना मानली जाते,जो मरतो त्याच्यासाठी की जे मागे आहेत त्यांच्यासाठी! जगण्याचा मोह हेच मृत्यूच्या भयाचे कारण आहे.या पृथ्वीशी आणि येथील जिवाशी जे नाते जुळते त्याचा विरह सहन होत नाही, म्हणून अश्रू अनावर होतात.
मृत्यू हे एक सत्य आहे,जन्मासारखे, प्रत्येक व्यक्ती मरणार आहे.मृत्यूचे भान आणि ज्ञान आवश्यक आहे.बेभरवशाचे जीवन कसे जगावे, कशासाठी जगावे हा विचार केला पाहिजे.कुणीतरी आपणास जगवित असते.मृत्यूचे बटन आपल्या हातात नाही, ते ज्याच्याकडे आहे,तो कधी बंद करेल सांगता येत नाही, त्यामुळे फार दूरचा आणि फार जवळचा विचार करु नये.लहान संकटाला संकट मानू नये, एवढ्या तेवढ्या कारणाने कुत्र्यामांजराप्रमाणे भांडू नये.
जीवन एक अमूल्य वेळ आहे,तो जितका आशयपूर्ण जगाल ,तितका तो सार्थकी लागेल.फूकटच्या कटकटीत तो वाया घालवू नये.आपण सुधारक,उद्धारक असल्याचा आव आणू नये.अद्वितीय असल्याच्या भ्रमात राहू नये.कुणीतरी विशेष आहोत असा तोरा मिरवू नये.पोशिंदे,मसिहा, जहांपनाह वगैरे फालतू शब्दांपासून सावध रहावे.
मृत्यू समानतेचे प्रतिक आहे.चंदनात जाळला म्हणून कुणी अमर होत नाही.कितीही देखावा केला तरी तो जिवंत होत नाही.उपचार करणारे वैद्य देखील एक दिवस स्वतःला वाचवू शकत नाही.मृत्यूशी तडजोड करता येत नाही.
मृत्यू आवश्यक आहे, जर्जर झालेले शरीर किती वेदना देते,वेदनेपासून मुक्त मृत्यू करतो.
मृत्यू आकस्मिक असल्याने दुःख करायला वेळ मिळत नाही आणि मृत्यू नंतर दुःख कोण करणार? मृत्यूला भयंकर घटना मानणे चुकीचे आहे.ती एक सामान्य घटना आहे.फक्त माणसाने माणसाला मारु नये, जितके शक्य आहे,तितके केले पाहिजे.
मृत्यू अटळ आहे आणि अटळ गोष्टी सहर्ष स्विकारल्या पाहिजे,तरच त्याचे ओझे होत नाही.