संकुचित
- ना.रा.खराद
विचार कधीतरी करायलाच हवा.इतरांकडून आपण कोणती अपेक्षा करतो आणि इतर आपल्या कडून काय अपेक्षा करत असतील हाही विचार केलाच पाहिजे.
विचार न केल्याने अविचार पसरतो, मनुष्य अविवेकी बनतो.' आता विश्वात्मके देवे' अशी आर्जव करणारे संत ज्ञानेश्वर जरी आपण होऊ शकलो नाही, किमान हे पसायदान घोकणारे आपण अंगी थोडातरी उदारपणा बाळगायला हवा.उदारपणासाठी पैसाच हवा असतो, दानधर्म करावयाचा असतो असे नाही.वृत्तीतला उदारपणा हवा.ज्ञानेश्वर कुबेर किंवा दानशूर नव्हते परंतु वृत्तीने ते वैश्विक होते.वृत्तीने उदार असणे गरजेचे आहे.राजा देखील वृत्तीने संकुचित असू शकतो आणि रंकही वृत्तीने उदार असू शकतो.वृत्ती ही बाह्य
गोष्ट नसून आंतरिक आहे.
बहुतेक माणसे संकुचित आखुड वृत्तीची असतात.स्वार्थी स्वत:पुरता विचार करणारी हलकट वृत्तीची असतात.
संकुचितपणाची ही वृत्ती सर्वत्र दिसून येते,त्यास अपवाद नाही.
माणसांच्या विचार आचारावरुन ती वृत्ती दिसून येते.
संकुचित वृत्तीच्या आश्रयाला अनेक दोष राहतात. मनुष्य हा वैश्विक आहे परंतु त्याने संकुचित वृत्तीने अनेक भेदभाव निर्माण केले.ही वृत्ती कुटुंबात देखील भेदभाव करते.आपले परके,जवळचे लांबचे असा विचार करते.
चहा बनवतांना देखील तो कुणासाठी आहे,हा
विचार अगोदर केला जातो.पाहुणे बघून जेवण
बनवले जाते.आपण वृत्तीने हलकट आहोत,हे
आपल्या लक्षात देखील येत नाही.समानतेबद्दल , माणूसकीबद्दल बोलणे सोपे असते परंतु खरेच आपण वृत्तीने तसे असतो का? घरातल्या घरात आपण उदारपणे आपण वागत नाही तर इतरांशी खरेच आपण
उदारपणे वागतो का? देण्यासाठी आपले हात
सरसावले का , फक्त घेण्यासाठीच आपले हात
पुढे असतात.कित्येक ठिकाणी घरात देखील
चोरुन खाल्ले जाते.भजे देखील मोजून वाढणारे आपण माणसे , वृत्तीने किती संकुचित आहोत हे आपण कधीच लक्षात घेत नाही.आपण चांगले ऐकतो,बोलतो पण चांगले बनत नाही,वागत नाही मग ते बोलण्यापुरते
काय कामाचे? वृत्तीची हलकट माणसे सर्व स्तरातील आहेत.गरीब किंवा श्रीमंत असे काही नाही.वृत्तीने गरीब किंवा श्रीमंत असे असतात.कुणी कुटुंबात देखील स्वत:पुरता विचार करतो.कुणी कुटुंबापुरते उदार असते.
संकुचितपणाच्या सीमा जो तो ठरवतो.
संत तुकाराम म्हणतात," तुका आकाशाएवढा"
आपण देखील वृत्तीने उदार असले पाहिजे.मग
तुम्ही गरीब असलात तरी राजा वाटू लागताल.
तुमच्याकडे काय आहे यापेक्षा तुम्ही किती उदार आहात हे महत्त्वाचे आहे.
निसर्ग आपणास भरभरून देतो.आपणास सर्व
काही मिळालेले असते, त्यामुळे देतांना हात
आखडू नये.केवळ पैसा, वस्तू,अन्न दान करणे
म्हणजे उदारता नव्हे.मनाचा मोकळेपणा,सरळता म्हणजे उदारता.मुंगीला जरी अन्न देऊ शकले तरी तुम्ही उदार आहात.
देतांना आनंद वाटला की आपण उदार आहोत.कुणाला त्याच्या हक्काचे देतांनाही आपण संकोच करतो,हात आखडतो.ही वृत्ती संकुचित आहे.घेण्यासाठी पुढे होणारे हात हे संकुचित वृत्तीचे असतात तर देण्यासाठी सरसावणारे हात उदार माणसाचे असतात.
माप मारणे,काटा मारणे हलकटपणाचे आहे.
खाण्यापिण्यात भेदभाव करणे भिकारपणाचे
आहे.वृत्ती बाहेरुन बदलत नसते, त्यासाठी विवेक जागा व्हावयास हवा.संकुचित माणसाचे जग छोटे छोटे असते.उदार माणूस वैश्विक असतो.तो आकाशाएवढा असतो.त्याच्याकडे काही नसले तरी त्याचे सर्व
असते,तो सर्वांचा असतो.