नवरा बायको खुप जवळचे किंबहुना सर्वात जवळचे नाते.एकमेकांच्या सोबतीने व सहवासाने आयुष्य कंठणारे जोडपे.सुख दुःखाचे बरे वाईट प्रसंग सारख्या प्रमाणात भोगलेले सहचर.कडू गोड आठवणीत रमणारे, आपल्या अपत्याला जिवापाड जपणारे , त्यांच्यासाठी जीव ओवाळून टाकायला तयार असणारे पती पत्नी, एकमेकांच्या आयुष्याचे खरे सोबती असतात.दोघांचीही कर्तव्य ठरलेली असतात, आणि बहुतेक जोडपी ते पार पाडतात, परंतु काही जोडपी मात्र आपल्या कर्तव्याला विसरतात आणि त्याचे परिणाम भोगत राहतात.
अनेक ठिकाणी दोहोंपैकी एक तरी कुचकामी असतो आणि त्याचा त्रास जोडीदाराला होतो.नवरा बायको कुणी एक जरी आळसी, मूर्ख, बेजबाबदार असेल तर दूसरा खुप त्रस्त होतो.एकाचा भार दूसऱ्याला उचलावा लागतो , यामध्ये तो मेटाकुटीला येतो.
वयात आले की लग्ने होतात किंवा लावली जातात,जुळवली जातात परंतु त्यासाठी लागणारी पात्रता त्या मुलांमुलीमध्ये आहे का ह्याचा कुणी विचार करत नाही.यामुळे अनेक मुलांमुलींच्या जीवनाचे मातेरे झाले आहे.विवाह झाला की तो नवरा होतो, परंतु आपल्या आईवडिलांना सोडून आलेली मुलगी आपल्या सोबत आयुष्यभर राहणार, तीला समजून घेण्याची व सर्व जवाबदारी पार पाडण्यासाठी लागणारी मानसिक व आर्थिक स्थिती आपली आहे का ह्याचा विचार होतो का, आणि तो होत नसेल तर केवळ नावाचा नवरा काय कामाचा? विवाहित स्त्रियांचे जीवन पूर्णपणे नवरोबाच्या स्वाधीन असते,तो ठेवतो तशी ती राहते, परंतु तिच्या भावना,गरजा तो समजून घेत नसेल तो कसला नवरा !
नवरा म्हणून ज्याच्या नावाने ती कुंकू लावते, तिच्यासाठी तो काय करतो,तीचा किती मान ठेवतो हे महत्त्वाचे आहे.
आई वडिलांच्या अतिशय प्रेमात वाढलेली मुलगी जेव्हा विवाह झाला की सासरी जाते तेव्हा ती ताटातुट कठोर मनुष्य देखील बघु शकत नाही, त्यामुळे तीची किती काळजी घेणे गरजेचे आहे हे लक्षात येईल.
नुसते नावाला नवरा असणे पुरेसे नसते.खुप ठिकाणी नवरे आपल्या बायकोला कोणतेच सुख देत नाहीत, फक्त तिच्याकडून घरकाम करुन घेतात व मोलकरीण असल्यासारखे राबवतात.तिच्या आवडीचे कधी खायला आणत नाहीत, तिला कधी फिरायला घेऊन जात नाही.तिच्या आरोग्याची काळजी घेत नाहीत, असले नवरे काय कामाचे.
अनेक नवरे बायकांना मारहाण करतात, माहेरहून हे आण ते आण करतात.तिच्या आईवडिलांना शिव्या घालतात, पुन्हा सासु नावाचा हिंसक व बोचक प्राणी असतोच घरात.
घर सांभाळणारी स्री म्हणजे बायको, तुमच्या मुलांना जन्म देणारी स्त्री म्हणजे बायको , कितीही अडचणीत तुमची साथ सोडणारी स्री म्हणजे बायको.तिच्यासाठी नवरा म्हणून आपण काय करतो ह्याचा विचार प्रत्येक पुरुषाने केलाच पाहिजे.नवऱ्याने सर्व हौसमौज करायची आणि बायकोने फक्त तुमची धुणीभांडी करायची, मुलांचे संगोपन करायचे.मग तिच्यासाठी काय? अनेक स्त्रिया आयुष्यभर घराच्या बाहेर नाहीत, त्यांना बाहेरचे जग दाखवणार कधी, त्यांच्या ठिकाणी काही भावना असतील त्या कोण समजून घेणार की तिला देव्हाऱ्यात बसवणार?
आपला संसार जो सांभाळू शकतो, आपल्या पत्नीला जो समजून घेऊन तीची काळजी घेऊ शकतो आणि जो कष्टाची भाकरी खाऊ घालू शकतो ,असाच पुरुष नवरा म्हणून घ्यायच्या लायकीचा असतो.
काही महाभाग तर बायकोच्या जिवावर बसून खातात, व्यसन करतात आणि मुलांचे संगोपन करत नाही, असले नराधम नवरा म्हणून लायक असतात का?
कुचकामी बायकांबद्दल खुप ऐकायला, वाचायला मिळते.स्रीप्रधान विनोद ऐकवला जातो , परंतु पुरुषांचा अवमर्द स्त्रिया करत नाही, नांदते तीला ठाऊक असते.अखिल नवरोबांनी बायकोला समजून घ्यावे, सुखी ठेवावे.नवरा असल्याचा तीला सार्थ अभिमान वाटावा .