"सत्याची गरज: एक जागरूक यात्रा" .....................?

सत्य हे सर्वकाळ , सर्वत्र गरजेचे आहे, जगात आज जे काही मंगलमय दिसते आहे,तो फक्त सत्याचा परिपाक आहे.सत्य बोलणे,सत्य ऐकणे आणि सत्य स्वीकारणे गरजेचे असते.खोटारडेपणा हा देखील सत्याच्या आश्रयाने राहतो,त्याचे स्वतःचे अस्तित्व नसते,खऱ्याच्या  पायाने त्याचा प्रवास होतो. कुठल्याही आजाराचे निदान पेशंट सत्य सांगेल तेव्हाच होईल, डाक्टर सत्य उपचार सांगेल तेव्हाच तो आजार दुरुस्त होईल.बंद पडलेली गाडी तेव्हाच सुरू होईल, जेव्हा मैकेनीक खरोखरच ती दुरुस्त करून देईल.राजकारणी लोक जे बोलतात,ते जर सत्य असते तर हे जग स्वर्ग बनले असते.कायम शब्द फिरवणे, आपल्या सोयीनुसार बोलणे हे कसे सत्य असू शकते? आज राजकीय अराजकीय होण्यामागे हे असत्य आहे. माणुस माणसांवर जो विश्वास ठेवतो तो या सत्यामुळेच, म्हणून मानवसमाज जितका सत्यमार्गी असेल,तितका तो समाज सुसंस्कृत मानावा लागेल.कोणताही धर्म हा सत्य सोडू शकत नाही,सत्य हाच धर्म आहे, धर्माच्या आडून असत्य चालत असेल तर तो अधर्म आहे.खरा न्याय हा सत्याचा परिणाम आहे,सत्याचा विजय हाच धर्म आहे.

 सत्य मार्ग दाखवण्याचे काम संतांनी केले,त्यावर चालण्याचे काम महापुरुषांनी केले आणि त्याच्या आश्रयाने सामान्य माणूस जीवन कंठतो आहे.सत्यावर ज्याचा अगाध विश्वास असतो, ते डगमगत  नाहीत, स्वातंत्र्यासाठी कारावास भोगणारे देशभक्त असो की सत्यासाठी विष प्राशन करणारा साक्रेटिस असो, अशा लोकांनी सत्याचा महिमा वाढवलेला आहे,ही पृथ्वी सत्याच्या छातीवर वसलेली आहे,तीचा श्वास हा सत्याशिवाय असू शकणार नाही.    न्यायनिवाडे सत्याचे आधारे होतात,सत्य प्रस्थापित करण्यासाठी अनेक उपाय केले जातात,सत्याचे अधिष्ठान असल्याशिवाय कुणीही तग धरु शकत नाही,खोट्याचा पोकळ डोलारा कधीही कोसळत असतो. सत्य मान्य करणं हे धाडसाचे काम आहे,सत्य सांगणे हे कर्तव्य आहे आणि सत्य मार्ग अवलंबणे हा धर्म आहे.

जे असत्य आहे, ते सर्व चूकीचे असते आणि जिथे चूक आहे, तिथे ती काहीतरी विपरीत घडवते.सत्य स्पष्ट असते,सरळ असते, ते आढेवेढे घेत नाही, ते कारस्थानी नसतं,ढोंग नसते, ते पटणार असते, परंतु खोट्यांना ते रुचत नसते,पचत नसते.खोटे नेहमी सत्याच्या विरोधात  असते. सत्य हे समाधान आहे,सत्य निश्चिंत असते.सत्य स्वयंसिद्ध असते, सत्याकडे तेज असते,सत्याची वाणी प्रखर असते, ते डळमळीत नसते.सत्य बोलल्या शिवाय सत्य बाहेर येत नाही.सत्य सत्याला तारत असते.

       सत्याची गरज सर्वत्र, सदैव असते.ते सर्वकालीन, सर्वव्यापी असते,सत्य लपवता येत नसते, ते संपवता येत नसते,ती एक साधना आहे,सत्याचा पाईक तो मार्ग कधीच आणि कशासाठीच सोडत नाहीत.

                                                                                                                                 ना.रा.खराद  

                                                                                                                                8805871976      

Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.