क्षेत्र चुकलेली माणसे

            कार्यक्षेत्र चूकलेली माणसे 
                                            - ना.रा.खराद

 जगात विविध कार्यक्षेत्रे आहेत, त्या कार्यक्षेत्रात काम करणारी माणसे आहेत.उद्योग, व्यवसाय, नोकरी वगैरे अशा क्षेत्रात माणसे कार्यरत आहेत, परंतु ज्या त्या क्षेत्रासाठी लागणारी वृत्ती आणि पात्रता सर्वांच्या ठिकाणी असतेच असे नाही, नको त्या क्षेत्रात नको तशी माणसे असल्याने समाजाला आणि एकंदरीत मानव जातीला खूप नुकसान सहन करावे लागत आहे.
  कोणत्याही क्षेत्रात कार्य करण्यासाठी नैपुण्य हवे 
असते, मात्र त्याचा अभाव सर्वच क्षेत्रात दिसून येतो.आपल्या कौशल्याचा वापर करून छोटे उद्योजक, व्यावसायिक उत्तम सेवा देत असतात व भरघोस कमाई करत असतात, मात्र अनेक मोठे उद्योग केवळ तो चालवणारा त्यामध्ये निपुण नसल्याने डबघाईस आले आहेत.
एखादी पानटपरी किंवा चहाचे दुकान खूप लोकप्रिय होते,कारण तो चालक त्या व्यवसायात तरबेज असतो.आपण असेच कार्यक्षेत्र निवडले पाहिजे,जसा आपला जन्म त्या कामासाठीच झाला आहे.लादलेले किंवा गरजेतून स्विकारलेले
कार्यक्षेत्र त्या क्षेत्राची अपरिमित नुकसान करत असते.
  चोरीची वृत्ती असलेला, भित्रा असा व्यक्ती जेव्हा पोलिस बनतो, तेव्हा तो पुढे काय करत असेल,ह्याचा विचार कुणी करतं का? अंगावर खाकी आली म्हणून वृत्ती थोडी बदलणार आहे.
  वाचनाची आणि अभ्यासाची आवड नसलेले,तत्वहीन, खोटारडे, अल्प बुध्दी, मनोरुग्ण 
लोक जर शिक्षण क्षेत्रात असतील तर ते काय दिवे लावणार,या पिढ्या ज्या बरबाद होताना दिसत आहेत,त्या अशाच लोकांमुळे.तत्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र ह्याची यत्किंचितही जाण नसलेले लोक जर शिक्षण क्षेत्रात मोठ्या हुद्द्यावर असतील तर हे क्षेत्र दिशाहीन होऊन जाते.विमानाचा पायलट जसा पारखून घेतला जातो, तसे प्रत्येक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करतील अशा योग्य माणसांची निवड केली गेली पाहिजे.गधे को हलुवा खिलाना नहीं चाहिए।
   विद्यार्थी हिताची तळमळ नसलेले, त्यांच्या विषयी प्रेम नसलेले, सूडबुद्धीने वागणारे शिक्षक या क्षेत्रात बघितले की शिक्षणाचे वाटोळे का झाले हे लक्षात येते.
  राजकीय क्षेत्रात तर अयोग्य लोकांचा भरणा झाला आहे.अनेक गुन्हेगार या क्षेत्रात धुडगूस घालत आहेत.शिवराळ भाषा वापरणारे , दंगली घडवणारे आणि जातीयवादी लोक या क्षेत्रात असतील तर या देशाचे भले कसे होणार.या क्षेत्रात संविधानाचे तंतोतंत पालन करणारे, लोकहिताची तळमळ असणारे न्यायी लोक आवश्यक आहेत, मात्र क्षेत्र चुकलेली हजारों माणसे या क्षेत्रात दिसत आहेत.
  लहान सहान दुकानदार असो की मोठा उद्योजक तो त्या क्षेत्राला न्याय देणारा असायला पाहिजे ‌.प्रत्येक क्षेत्रात कार्य करण्यासाठी काही गुण अंगी असणे अगत्याचे असते,त्याचा अभाव असेल तर इच्छित ध्येय कधीच साध्य होत नाही.
 अनेक दुकाने ओस पडली आहेत,कारण ग्राहकांना आकर्षित करण्याची क्षमता आणि कला त्या दुकानदाराकडे नसते.ज्या क्षेत्रात लोकांशी संपर्क येतो तिथे तर खूप बुद्धिमान, प्रतिभावान माणूस हवा ‌.सुसंवाद साधण्याची कला अवगत हवी.हेकेखोर,तुसडा, अंहकारी,अल्पमती किंवा मनोरुग्ण असा व्यक्ती कोणत्याही सामाजिक क्षेत्रात कार्य करु शकत नाही,त्याची अयोग्यता इतरांसाठी डोकेदुखी ठरते.क्रिकेटची टीम जशी कसून तपासणी करून निवडली जाते, तसे प्रत्येक क्षेत्रात लायक माणसे असली पाहिजेत.
 ज्यांना म्हशी भादरता येत नाहीत,त्यांना राजाची दाढी काढायला लावू नये इतकेच!
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.