"आत्मविश्वास वाढवण्याच्या मार्गावर:-उशीर




प्रत्येक कामाची एक वेळ असते, उशीर किंवा विलंब झाला की ते काम बिघडते किंवा होत नाही, उशीरा सुचलेले शहाणपण हा वेडेपणा असतो.उशीरा पोहचले की गाडी सुटते, पतंग उठते, परीक्षा हुकते असे बरेच काही होत असते.ठरल्यावेळी काम उरकून टाकले की उसंत मिळते,वेळेवर एक टाका मारला की जास्त उसवत नाही.
 आपल्या जीवनातील बरेच अपयश या उशीर केल्यामुळे प्राप्त झालेले असते.उशीरा शाळेत जाणारी मुले, उशीरा नोकरीवर जाणारे कर्मचारी,लग्नात उशीरा पोहोचणारे नेते, घटनास्थळी उशीरा पोहोचणारे पोलिस किंवा अग्निशमन दल काही तरी दुष्परिणाम करतेच.
 बहुदा उशीरा येणारी रेल्वे,माहेरी गेलेली बायको उशीरा सासरी येणे हे प्रकार आपण बघतो.उशीर होऊ नये म्हणून कुणी घाई करते ,तर कुणी कायम उशीर करते.'लग्न वेळेवर लागेल'अशी टिप असताना ते फक्त
दोन तास उशिरा लागते!
 प्रियकराची वाट बघून थकलेली प्रियशी,
“मी इतकी वाट नाही बघू शकत,तु उशीर केला." असं बोलून हात वर करते.नोकरभरती झाल्यावर कुणी आपली योग्यतेची फाईल घेऊन गेला,तर उशीर झाला,असे उत्तर मिळते.
हाजिर तो वजीर ' उगीच नाही म्हंटले जाते.गाण्यामध्ये देखील, कामाला जायला उशीर झाला,आता वाजले की बारा वगैरे आपण ऐकतो.
निवडणुकीचा फार्म भरण्यास उशीर होतो, कुणाचे लग्न उशिरा होते,कुणास मुल उशीरा होते.कुणी घर उशीरा बांधते.एखाद्या आजारी माणसाला बघून डाक्टर, तुम्ही उशीर केला, असं बोलून जातात.उशीरा येणारा पेपरवाला, दूधवाला डोकेदुखी वाढवतो.उशीरा येणारी प्रेयसी आतुरता वाढवते,उशीरा सुचलेले शहाणपण पश्चात्ताप वाढवते, उशीरा जन्मलेले मुल लाडके असते, उशीरा मिळालेला न्याय अन्याय असतो.
तत्परता तात्काळ कारवाई, किंवा अंमलबजावणी हेच यशाचे गमक आहे,जे आपण आज करु शकतो, किंवा जे आज करायला पाहिजे, ते उद्यावर का,नंतर का,
हा विलंब , उशीर फार नुकसान करुन जातो.
तहान लागल्यावर विहीर खोदकाम सुरू करणे मूर्खपणाचे आहे.काहीतरी सबब सांगून काम पुढे ढकलण्यात येते.स्वातंत्र्य देखील उशीरा मिळण्याचे कारण, लोक जागे होण्यास उशीर झाला.तत्परतेचा अभाव ही अकार्यक्षम लोकांची ओळख आहे.नुसती बाष्पळ चर्चा करण्यात असले आळशी लोक पटाईत असतात.वेळेची गरज त्यांच्या लक्षात येत नाही.निर्णय क्षमतेचा अभाव असल्याने देखील उशीर होतो.बघतो, विचार करतो,सांगतो अशी भाषा वापरली जाते आणि उशीर होतो.
     योग्य निर्णय घेण्याची, योग्य वेळ असते.अनेक आजार असे असतात की ते लवकर कळले असते तर टळले असते, परंतु उशीर झालेला असतो.अनेक वेळा कळून देखील उपचार उशीरा होतो.
 कर्जाचे हप्ते उशीरा भरले की व्याज जास्त भरावे लागते.उशीरा पोहचले की अनेक गोष्टींचा तुटवडा वाट्याला येतो, बाजारात उशीरा गेले की उरलासुरला भाजीपाला घ्यावा लागतो.
     कोणत्याही गोष्टींची एक वेळ असते, तत्परतेने ती साधली पाहिजे, उशीर केल्यामुळे यश दूर जाते, जे आज करायला पाहिजे ते उद्यावर ढकलू नये.

                              ‌‌         - ना.रा.खराद
    
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.