शिक्षकाचे मानसिक आरोग्य

         शिक्षकाचे मानसिक आरोग्य


   शिक्षक हा एक मार्गदर्शक आहे,प्रेरक आहे,त्याचे कार्य जीवंत घटकांशी आहे , विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत त्याचा सिंहांचा वाटा असतो, शेंकडों नजरा त्याचे निरीक्षण करत असतात‌.
विद्यार्थी,पालक, संस्था,शासन , संसार या सर्व ओढाताणीत तो तणावात येतो.
      शाळेतील रुक्ष वातावरण,प्रशासनाची अरेरावी, विद्यार्थ्यांचे गैरवर्तन,पालकांचा उर्मटपणा,संस्थेचा दवाब आणि संसाराचा सोस यामध्ये तो इतका भरडला जातो आहे की त्याचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आहे, मानसिक आरोग्यातून शारिरीक व्याधी उद्भवतात.शिक्षकाचा गलेलठ्ठ पगार सर्वांना दिसतो , परंतु तो कोणत्या मानसिकतेत वावरतो याची चाचपणी कुणी करत नाही.पैसा मिळतो म्हणजे सर्वकाही झाले,असे समजूत झाली आहे.
     ताणतणावाखाली असलेला शिक्षक आपले कार्य प्रभावीपणे करु शकत नाही, त्यासाठी शाळेतील वातावरण अत्यंत खेळीमेळीचे, सलोख्याचे वातावरण हवे.जिथे मन मोकळे करता यावे अशी माणसे हवीत,प्रेमाची वागणुक हवी.सहशिक्षकांशी चांगले संबंध असले की तणाव कमी होतो, वितंडवाद टाळता आला पाहिजे.क्षमा करता आली पाहिजे, काही बाबी विसरता आल्या पाहिजे.एखादा अपमान पचवता आला पाहिजे.
     शाळेत आल्यावर पूर्णपणे शाळेत रमले पाहिजे,शाळा हे आपले कुटुंब आहे,या भावनेने मुलांशी वागले पाहिजे.मी नोकरी करतो असे न समजता मी सेवा करतो अशी मानसिकता ठेवली पाहिजे.काल्पनिक भिती किंवा उगीचच ताठरपणा आपली मानसिकता खराब करु शकतो, त्यामुळे शिक्षकांनी स्वतःची मानसिकता तपासली पाहिजे.
पन्नासीनंतर तर शिक्षक फारच तणावात येतात,कारण मुलांचे शिक्षण,लग्न ,त्यांचे आचरण तसेच स्वतःच्या आरोग्याच्या तक्रारी यामुळे शिक्षक मेटाकुटीला येतो, आणि अशा मानसिकतेत तो वावरतो, त्याच्या चेहऱ्यावरचे हसू गायब असते.तो पडक्या चेहऱ्याने वर्गात जातो, अगोदरच शिक्षणाचा उल्लास नसलेली मुले अजून कंटाळतात आणि एकंदरीत शिक्षण प्रक्रिया फक्त औपचारिक होऊन जाते.
   शिक्षक हा चोखंदळ, अवलिया, खेळकर असला पाहिजे.मुलांमध्ये लहान होऊन त्यास राहता आले पाहिजे, त्यांच्यामध्ये रममाण झाले की बघा किती मजा येते. हास्य विनोद, गंमतीजमती जमल्या पाहिजे.मिस्किलपणा करता आला पाहिजे.
संकीर्ण भाव सोडून,थोडे उदात्त झाले की सर्वकाही ठीक होते.
      शाळेत चहाडी,निंदा,उपहास , कारस्थान करु नये.हे सर्व आपल्याच अंगलट येते.इतरांना त्रास देऊन स्वतः सुखी होता येत नसते, त्यासाठी इतरांशी सौजन्य ठेवले पाहिजे.मानसिक आरोग्य उत्तम राहील,असेच वागले पाहिजे.
आर्थिक नियोजन देखील महत्वाचे आहे, आपल्या गरजा कमी ठेवल्या तर ओढाताण होत नाही.पगार हा पुरेसा असला पाहिजे, फार जोडधंदे करुन मानसिकता खराब करून घेऊ नये,आपण शिक्षक आहोत तीच आपली ओळख असली पाहिजे.आपले विद्यार्थी आपला आदर करत असतील,तरच आपण खरे शिक्षक आहोत.
सर्व शिक्षकांना तणावमुक्तीसाठी शुभेच्छा!
                                          - ना.रा.खराद
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.