बसमध्ये "जागा धरणे" हा अघोरी प्रकार बघितला की गनिमांनी हल्ला चढवल्याचा भास होतो.त्यासाठी संपूर्ण
शक्ति पणाला लावली जाते.मुख्य दरवाजातून प्रवेश तर मोठे दिव्य असते.माणसातले अंतर कमी करण्याची ती एकमेव जागा वाटू लागते.
"मागून रेटा आणि पुढून अडवणूक" अगतिकतेचा कळस असते.दरवाजाशिवाय ,असेल त्या मार्गाने बसमध्ये प्रवासी चढतांना दिसतात.चढण्याचा उन्माद सर्वत्र सारखाच असतो,ती बिचारी बस अगतिकपणे थांबलेली असते.
' संकटकाळी बाहेर पडण्याच्या' मार्गातून आत प्रवेश केला जातो.खुश्कीचा मार्गासारखा त्याचा वापर होतो.
पुरुष, महिला, वृद्ध,तरुण ,तरुणी असे देशाप्रमाणे 'विविधतेने नटलेले' प्रवासी आपल्या कुवतीनुसार जागा मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात.
शेवटी बसमध्ये जागा मिळू न शकणारे दोनच इसम उरतात, कंडक्टर आणि ड्रायव्हर ! ते कसेबसे घुसतात आणि आपले कर्तव्य पार पाडतात.
खिडकीतून लहान मुलांना आत ढकलले जाते,नुकतेच बाहेर आलेले मुल असे आत ढकलणे कितपत योग्य?
मुलांचा असा गैरवापर जगात कुठेही होत नसेल.
" पुढे सरका" हा एकच जयघोष बसमध्ये चढताना आणि उतरताना ऐकायला मिळतो.तिथला धक्का हा धक्कादायक नसतो.'पाय तुडविणे' एक सामान्य बाब
समजली जाते. ' कोपर टोचणे' कोपरखळीची आठवण
करुन देते.जागा मुलायम असेल तर टोचणीचा दाह उरत नाही.
" माणसे चढतांना घाई करतात आणि उतरताना कसे हळू उतरतात.' असले सूचक वक्तव्य मागून कुणीतरी करतं.मागे असले की माघारी असं बोललं जातं.परंतू माणसाच्या चारित्र्यावर हे शिंतोडे आहेत.
एखाद्या प्रवाशाकडे इतके सामान असते की ते सांभाळताना त्यांच्या नाकी नऊ येतात.कधी अठरा देखील!
वृद्धांना कळवळा दाखवला जातो.वृद्ध असल्याचा अभिमान आणि सल एकाचवेळी जाणवत असेल.
तरुणींना जागा धरावी लागते नाही , फक्त निवडावी लागते.अनेकांचा हिरमोड होतो.
चेंगराचेंगरी, आरडाओरड , धक्काबुक्की एकाच ठिकाणी
सर्व बघायला मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे बस!
- ना.रा.खराद