जीवनाचा मार्कमेमो
- ना.रा.खराद
जीवन म्हणजे परीक्षा आहे.या परीक्षेत अनेक
विषय असतात. पास होण्यासाठी किमान पस्तीस गुणांची अट असते.नापास होणारे कशात तरी कमी पडतात.आवडी नावडीचे विषय असतात.गुण कमी जास्त असू शकतात परंतु पस्तीस मार्क मिळवावेच लागतात.
अनेक असे विद्यार्थी असतात जे एखाद्या विषयात खुप गुण मिळवतात पण निकाल नापास ,असा असतो.
जीवन आणि परीक्षा सारखी असते.जीवन विविध विषयांवर असते.आपण तेव्हाच पास होऊ शकतो , जेव्हा सर्व विषय पास करु शकू.कुणीतरी कशामध्ये तरी यशस्वी होते आणि आयुष्य त्यामध्ये वाया घालवते.
जीवन अफाट,अचाट,असीम आहे.ते तसे जगता
आले पाहिजे.तितके मोठे होता आले पाहिजे.
जीवनाचे विविध रंग न्याहाळता आले पाहिजे.
शुद्र कारणासाठी आयुष्य खर्ची घालणे योग्य
नाही.जीवन एकांगी, एककल्ली नसावे ,ते चौफेर
असावे.एखादे लेबल लावून स्वतःची वस्तू बनवू
नये.
पद, प्रतिष्ठा,पैसा हे जीवन नाही.जीवनाचा तो
फक्त अंश आहे.उपलब्ध वेळ आपण कसा घालवतो, कुठे वावरतो आणि काय करतो
याचाही विचार व्हावा.जीवन म्हणजे लोक आपणास काय समजतात हे नसते.लोकांचा
फार विचार करणे गरजेचे नाही.तेही आपल्या
सारखेच भरकटलेले असतात.इथे कणा कणात आणि क्षणा क्षणात रहस्य दडलेले आहे.ते उलगडता आले पाहिजे.जीवन अमूल्य आहे ते एखाद्या फडतूस कारणासाठी वाया घालवू नका.आपले छंद जोपासले पाहिजेत.विविध आनंद मिळवले पाहिजेत.
मित्रत्व,नाती जपली जावीत.माणूस म्हणून
जगले पाहिजे.आपली ओळख माणूस म्हणून
व्हावी , इतके समृद्ध असले पाहिजे.
तोरा मिरवणे गरजेचे नसते.
जीवनाचा मार्कमेमो सरासरीमध्ये उत्कृष्ट असावा.किमान पस्तीस मार्क मिळाले तरी चालेल ,पण नापास होता कामा नये