काय बी करीन....! "जीवनाच्या मार्गावर: एक दिलचस्प अनुभव"


बसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होतो, मात्र कंडक्टर दरवाजा उघडत नव्हता.' जागा नाही, नंतरच्या बसने या.' असा खेकसत बोलला.बसमध्ये खुप जागा होती, तरीही तो
अशी मनमानी करत होता.बसमधील प्रवासी हे उघड्या डोळ्यांनी बघत होते, परंतु आपल्याला काय करायचे,आपण तर बसलो ना,या भारतीय मानसिकतेचे होते.नंतरच्या बसमध्ये बसलो.गाडी निघण्याची वेळ निघून गेली, पंधरा मिनिटे उलटली तरी गाडी काही निघेना,कारण वाहक व कंडक्टर चहा प्यायला गेले होते.
गाडी निघाली आणि माझे विचारचक्र सुरू झाले की नियमांची पायमल्ली करून मनमानी करणारे लोक सर्वत्र आढळतात आणि त्याचा खूप त्रास लोकांना सोसावा
लागतो.
जिथे तिथे माणसे अधिकाराचा हवा तसा वापर करताना दिसत आहेत.मी कुणाचे ऐकत नाही,माझा कोण मालक, तुम्ही मला कोण सांगणारे अशी दर्पोक्ती हे लोक करतात.अधिकार मग तो लहान असो की मोठा त्याचा गैरवापर करून छळ करणे कितपत योग्य आहे.बरे, कुणी सांगितलं तर, 'कळते आम्हाला,तुमची सांगण्याची गरज नाही. ' असे तोंडसुख घेतात.
अधिकार काम करण्यासाठी असतात, ते अडविण्यासाठी नाही.मात्र जो तो ज्या त्या ठिकाणी मनमानी करताना दिसत आहे आणि पुन्हा,' काय करायचे ते करा!' लोकही म्हणतात,“कुठे नादी लागतात मूर्खांच्या." परंतु मूर्खांच्या नादी न लागल्याने
त्यांची संख्या वाढत चालली आहे, आणि एक दिवस असा येईल की तिकडे तिकडे या
लोकांचे साम्राज्य असेल आणि तो दिवस खुप दूर्भाग्यपूर्ण असेल.
मनमानी करणारे सर्वच क्षेत्रात आढळतात, मनमानी हुकुमशाहीचेच एक छोटे रुप आहे.
त्याच्या अधिकार क्षेत्रात त्याने घातलेला धुमाकूळ हेच दर्शवितो.ती एक वृत्ती आहे, अशा वृत्तीचे लोक खाणावळीत वेटर जरी असले तरी आपली चाल सोडत नाही,एखादा मोठा अधिकार मिळाला तर
अधिनस्थ लोकांना खूप सतावले जाते.माकडाच्या हाती कोलीत पडावे तसा
प्रकार होतो.
पोलिस, तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, कंडक्टर वगैरे सर्वच चाकरमानी मनमानी करताना आढळतात.सत्तेतील लोक तर आपण राजे असल्यासारखे हुकुम सोडतात.“ मी सांगतो, गुपचूप ऐकायचे."अशी दमदाटी करतात.नीती नियम , कायदे यांच्यासाठी बाहुले असते.मी पाहिजे तेच करणार,मी मालक आहे.' नोकर
जेव्हा मालकीची भाषा करु लागतो , तेव्हा तो मस्तवाल झालेला असतो.माझ्या डोक्यावर हेल्मेट नाही, म्हणून मला अडवणारा पोलिस, पन्नास लोक विना हेल्मेट गेले त्यांना अडवत नाही, हे जेव्हा मी
लक्षात आणून दिले तर 'तो माझा प्रश्न आहे, तुम्ही कोण सांगणार.?' आता हे सर्वांना सांगण्याची वेळ आली आहे की,“ आम्ही कोण.?" नागरिक कोण असतो आणि तो कोण आहे?
जिकडे तिकडे बोकाळलेल्या मनमानीला चाप बसणे गरजेचे आहे.लोकशाहीच्या गोंडस नावाखाली चाललेली चांडाळकी वेळीच थांबवली पाहिजे,नसता ही चेटकीण एक दिवस समाज गिळंकृत केल्याविना रहाणार नाही.
‌. - ना.रा.खराद

Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.