"आठवी नापास! शिक्षा के महत्वपूर्ण पहलुओं का आदान-प्रदान"


आज मागे वळून पाहताना वर्ग आठवीची
आठवण झाली आणि सर्व घडामोडी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.माझ्या नावावर
आठवीमध्ये नापास होण्याचा विक्रम आहे.आज त्याविषयी सांगणार आहे.
आमच्या गावात त्यावेळी सातवी पर्यंत वर्ग होते, पुढील शिक्षणासाठी जवळच असलेल्या आपेगाव या ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्मगावी जावे लागत असे.गावातील बहुतेक मुले त्याच शाळेत शिकलेली.शाळा
शिस्तीची होती,शिक्षक तळमळीचे होते.मुले धाकाने अभ्यास करत असे.
माझा सर्वात मोठा भाऊ त्याच शाळेत होता, परंतु शेती बघायला कुणी नव्हते, म्हणून त्याने नववीत शाळा सोडली आणि घरच्या शेतीमध्ये तो राबू लागला.माझा दूसरा मोठा भाऊ त्याच शाळेत इयत्ता दहावीत होता.दहावीचे महत्त्वाचे वर्ष म्हणून वडिलांनी त्यास एक जूनी सायकल घेऊन दिली होती.त्या सायकलवरून तो ये जा
करत असे, गावातील इतर काही मुले त्याच्या सोबतीला होती.मी सोळा वर्षांचा होईपर्यंत तो माझ्याशी एकदाही बोललेला नव्हता,त्याचे कारण मला आजपर्यंत कळाले नाही.आजही तो माझ्याशी कामापुरतेच बोलतो.असो.
सातवी बोर्ड परीक्षा मी सर्वाधिक गुण घेऊन पास झालो.खुप अभ्यास करायचो.पहिली ते सातवी वर्गाचा प्रमुख होतो.माझा पहिला नंबर ठरलेला असायचा.इंग्रजी, गणित,मराठी खूप आवडायचं,साने गुरुजींची पुस्तके वाचायला मिळायची.
पुढील शिक्षणासाठी इतर मुलांप्रमाणे आपेगावला जायचे,अशी तयारी सुरू असताना, माझ्या तिथे दहावीत शिकत असलेल्या भावाने विरोध केला.त्याला पैठणला टाका, इथे टाकले तर मी शाळेत जाणार नाही.तो कोणत्या कारणाने तसं बोलला असेल मला आजही कळत नाही.असो.
आमच्या गावात त्यावेळी नुकतीच पैठणहून दोन वेळा बससेवा सुरू झाली होती.एस.टी.पास मिळत असे त्यामुळे गावातील अनेक मुलांनी पैठणच्या शाळेत प्रवेश घेतला, तिथे अनेक शाळा होत्या,श्री नाथ हायस्कूल अत्यंत प्रतिष्ठेची शाळा होती.मोठी इमारत, बसस्थानक जवळ , बहुतेक मुलांनी त्या शाळेत प्रवेश घेतला.शाळा मोठी होती, संख्या खूप होती.शहरातील मुले ग्रामीण भागातील मुलांना तुच्छ लेखायची, अनेक शिक्षक आम्हा खेडूत मुलांना हीनवायची, कुचंबणा होत असे.शिक्षकांना शारीरिक शिक्षा करण्याची मुभा होती, कमीजास्त प्रमाणात सर्वच शिक्षक खुप मारहाण करत असत, परंतु माझे वर्गशिक्षक फारच अघोरी शिक्षा करायचे,मी घाबरुन जायचो.येणेकेणे कारणाने ते बेदम मारत असत.लाथाबुक्यांनी मारायचे,हातावर छड्या मोडायच्या.गावातील शाळेत एकदाही मार न खाल्लेला मी , इथे रोज मार
खाऊ लागलो.शाळेत जायचे म्हटले की थरकाप उडायचा.एकदा मधल्या सुट्टीतून मी घरी गेलो.दूसऱ्या दिवशी खुप मार भेटणार, अजून एक दिवस शाळेत गेलो नाही.घरुन पैठणला येत असे, परंतु शाळेत जात नसे.गैरहजर खुप दिवस होतो,आता
शाळेत जाण्याची माझी हिंमत होत नव्हती.
माझे वडील गावातील खुप प्रतिष्ठीत व्यक्ती होते,रुबाब होता.मी शाळेत गैरहजर राहतो, हे सांगण्याची हिंमत कुणीही केली नाही आणि त्यामुळे मी तीनचार महिने शाळेत गेलो नाही, माझे नाव शाळेतून कमी करण्यात आले.वार्षिक परीक्षा सुरू होती.मी परीक्षेला हजर नसल्याची कुणकुण
घरी लागली होती.परीक्षा सुरू असताना माझा चुलत भाऊ शाळेत गेला आणि माझ्या विषयी विचारले तर वर्गशिक्षकानी
मी तीन चार महिन्यांपासून शाळेत नाही,नाव तेव्हाच कमी केलेले आहे.भाऊ अवाक् झाला,त्याने माझा शोध घेतला, मला वडीलांसमोर उभे केले.वडीलांना खुप दुःख झाले,कारण मी दोन वर्षांचा असताना माझ्या आईचा मृत्यू झाला होता आणि वडील खुप लाड करायचे,आपली मुले शिकून सुखाने जगावीत असे त्यांना वाटायचे.ते मला एवढेच म्हणाले,' नारायण तू असे नव्हते करायला पाहिजे.' त्यांची ती शून्यात गेलेली नजर बघुन माझं काळीज चरकलं.
मला खरा धाक होता तो मोठ्या भावाचा,तो
खुप रागीट होता, आमच्या शिक्षणासाठी त्याने स्वतःचे शिक्षण सोडले होते.गाई म्हशी,बागायती शेती त्याला खूप राबावे
लागत असे.तो पहाटे लवकर उठून सर्व कामे करायचा व घरी दूध घेऊन यायचा.
त्याला जेव्हा माझा प्रताप कळाला तेव्हा त्याने मला खूप मारले , कुणीतरी मध्यस्थी केली म्हणून तो थांबला,नसता मी मेलोच असतो.त्याच्या त्या मारण्यात किती प्रेम होते, हे मला आज कळते.तो एवढ्यावरच
थांबला नाही,त्याने मला जनावरे सांभाळायला दिली,विहीर खोदकाम सुरू होते, तिथे काम करायला लावले.इतर मुले शाळेत जात होती आणि मी शेतात राबत होतो.एकेदिवशी भावाने मला जवळ घेतले आणि डोळ्यात पाणी आणून बोलला, नारायण तुला शिकायचे का शेतात काम करायचे? मी फक्त रडू लागलो.मला पश्चात्ताप झाल्याचे त्याने ओळखले,मला पुन्हा शाळेत टाकले, यावेळी मात्र वर्गशिक्षक बदलले होते.खुप अभ्यास केला, चांगले गुण घेऊन दहावी पास झालो.
आज मी शिक्षक आहे.आनंदात आहे.आज
भाऊ हयात नाही, हे बघायला की त्याचा त्याग आणि प्रेम किती फळाला आले.
- ना.रा.खराद , आनंदपूर,अंबड
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.