झोपेत मनुष्य अनभिज्ञ असतो, म्हणूनच अनभिज्ञ माणसाला,"तू झोपेत आहेस का?" असे बोलले जाते.झोप ऐच्छिक नसल्याने प्रत्येकास झोपावेच लागते.कितीही ताठर माणसाला झोप आडवी करते.मी पणाचा विसर पाडते.शरीर आणि मन शांत करण्यासाठी झोप आवश्यक असते.झोपेत मनुष्य अर्धमेला होतो.झोपेत देखील तो जीवंत असतो.तो झोपलेला असला तरी बरेच काही सुरू असते.
बरीच माणसे अंथरुणावर अंग टाकले की घोरायला लागतात.मी अधूनमधून घोरतो असे मला सांगण्यात आले परंतु मी ते मान्य करत नव्हतो."स्वत:चे घोरणे स्वत:ला कळत नसते." असा नवीन वाक्प्रचार आस्तित्वात येण्यास हरकत नसावी. 'घोरणे' हा प्रकार अनेकांच्या बाबतीत घडतो.अशा लोकांच्या
सानिध्यात झोपायचे असेल तर त्यांच्या अगोदर आपण झोपायचे.काहींचे घोरणे सौम्य असते,तर काही रेडा ओरडल्यासारखे घोरतात.इतरांची झोप त्यांनी उडवलेली असते.झोपेत थोडीही हालचाल न करणारे,कुस देखील न बदलणारे आणि श्वासोच्छ्वासाचा देखील आवाज न येणारे काही झोपाळू असतात.ते दूर्मिळ प्राणी असतात.कायमचे झोपले की काय ,अशी शंका येण्याइतपत ते निपचित पडलेले असतात.
झोपेत बरळणारी काही मंडळी असते.जागेपणी कधीच तोंड न उघडणारी ही रहस्यमय माणसे झोपेत मात्र 'नार्को टेस्ट' प्रमाणे सर्व बडबडत असते.अनेक मोठी रहस्ये त्यांच्याकडून उलगडली जातात.झोपेत पुटपुटणारी माणसे , जागेपणी देखील काटकसरीने वाणी खर्च करणारी असतात.
कुणाला झोपेत चालण्याची सवय असते.हा फार अघोरी प्रकार आहे.शेजारच्या माणसाला तुडवले की जाग येते.असले हे निशाचर झोपाळू कधी मुंडक्यावर पाय देतील सांगता येत नाही.त्यांच्या शेजारी हेल्मेट घालून झोपलेलेच बरे.अनेकांना झोपेची जागा सोडण्याची सवय असते.
झोपतांना एका अंथरुणावर आणि सकाळी दूसऱ्याच अंथरुणावर दिसतात.हे घरंगळत जाणारे चल
झोपाळू असतात.पलंग वगैरेच्या मर्यादा ते पाळू शकत नाही.
झोपेतून अचानक उठून बसणारेही काही जागृत देवस्थाने असतात.आपण जिवंत असल्याची खात्री करुन पुन्हा झोपतात.
कुणाला शेजारच्यावर टांग टाकून झोपण्याची
सवय असते.कुणाला तशी टांग टाकून घेण्याची सवय असते.हा योग जुळला तर दोघे सुखाने झोपतात.
बऱ्याच झोपाळूंना झोपेत डेंजर स्वप्न पडतात.ते घाबरून जातात.त्यांना झोपेत घाम फुटतो.जाग आली मग भीती दूर होते.
काही माणसे झोपेत हसतात.जागेपणी न हसू
शकलेले असतात कदाचित.झोपेत दात खाणारे भयानक रस निर्माण करतात.भूतप्रेत असल्याचा भास होतो.स्मशानभूमित झोपल्यासारखे वाटते.अहिंसक असणारी ही माणसे दात का खात असतील याचा अजून
थांगपत्ता लागलेला नाही.
पोटावर झोपणारी काही मंडळी असते.पाठीवर भार वाहिलेली ही माणसे पाठीला थोडा आराम देत असावीत.उतानी झोपणारी ही माणसे असभ्यपणाचा कळस असतात.पादवायु मोकळेपणाने विसर्जित करतात.वायुप्रदुषण होते.
कुणी अत्यंत वाकडेतिकडे झोपते.अगदी खेकड्यासारखे.शेजारचा माणसाच्या अंगावर
हा नेमके कोणते अंग टाकेल सांगता येत नाही.
कुणी आपले डोके गुडघ्याजवळ घेऊन झोपते.अजगरासारखा वेटोळा केलेला असतो.ही जमात तुरळक प्रमाणात आढळते.
काहींना झोपेत खाज सुटते.झोपेतच खाजत
रहातात.कुणी पाय आदळते.झोपेतल्या या सर्व क्रिया अपरिहार्य आहेत.याकडे गंमत म्हणून बघायचे असते.त्रास म्हणून नव्हे.
- ना.रा.खराद