36 गुण - ना.रा.खराद
💒 लग्न जुळवण्यासाठी ‘ गुण जुळणे ' किंवा जुळविणे अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो.ठेवलेल्या नावावरुन पंचांग नावाच्या त्या महाग्रंथातून माहिती मिळवली जाते.ती पंडित सोडून इतर कुणालाही कळत नाही, पंडितांना कळते असे आपण गृहीत धरु.सर्व विवाह गुण जुळले तेव्हा पार पडते , परंतु विवाहानंतर जे बघायला मिळते, ते बघता , शंका येते.
प्रत्यक्षात मुलांमधील किंवा मुलींमधील गुण आणि दोष देखील बघितले असते,तर निश्चितच विवाह यशस्वी झाले असते.एखाद्या अनोळखी व्यक्तीशी कायम गाठ बांधायची म्हणजे सोपी गोष्ट नाही.मुलाने सौंदर्य बघुन पसंत, नापसंत सांगायचे,मुलीकडील लोक संपत्ति बघतात.पंडित पंचांग बघतो.सोबत राहायचं असेल तर एकमेकांचे गुण दोष माहिती पाहिजे, किमान समान गुणांमुळे त्यांच्यामध्ये मैत्री होऊ शकेल , त्यातून प्रेम वाढीस लागेल.दोन सजीवांना कायम सोबत राहायचे असेल तर किमान त्यांचे गुणदोष माहिती हवेत आणि ते दोन्ही कडील लोकांनी एकमेकांना दिलखुलास सांगावयास हवीत.पंचागात जुळलेले गुण
आयुष्यात कामी येत नाही, एखाद्याचे ठेवलेले नाव,त्याची खरी ओळख होऊ शकत नाही.
आवडीनिवडी, भावभावनां, संवेदनशीलता, धैर्य किंवा आजार वगैरे हे बघणे गरजेचे आहे.उदारता, कंजूस,अंहकारी,लालची ,फटकळ, बडबड्या, तीक्ष्ण बुद्धी, मूर्ख या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.काटकसरी, उधळपट्टी, फुकटचे खाणारा, स्वाभिमानी,आळसी,मेहनती हे बघणे गरजेचे आहे.
नवरा बायको मधल्या कटकटी मागची कारणे शोधली तर वरील बाबी न बघितल्या मुळेच हे सर्व घडते.लग्न लावणे हा प्रकार तरी काय आहे, पंडित जे मंत्र बोलतो कधी त्याचा अर्थ कुणाला कळला का,कुणी सांगितला का? मग कशाला असले थोतांड? लग्न जुळवतांना मुलांमुलींचे गुणदोष बघितले जावेत.बुद्धि , भावना बघितली जावी ,सौंदर्य समानता बघावी, आर्थिक समानतेलाही महत्व द्यावे.पत्रिका जुळविणे हा प्रकार योग्य वाटत नाही.
लग्नापूर्वी व लग्नानंतरचे सर्व विधी यांचा अंत्यविधी करणे गरजेचे आहे.काहीही तार्किक तथ्थ नसताना ते किती दिवस सुरू ठेवणार?
वैवाहिक जोडपे एखाद्या बैलजोडी प्रमाणे संसाराचा गाडा ओढत असले, फक्त तडजोड म्हणून सोबत राहत असले, एकमेकांना समजून घेणे यामध्ये किती कोंडमारा होत असेल.संसार दुःखमय वाटण्याचे कारण जोडपे नसून विजोडपे आहे.आपण दोघांची बुद्धी आणि भावना तपासतो का? आचारविचार बघतो का?
ज्या गुणांच्या समानतेमुळे ते एकत्र गुण्यागोविंदाने राहू शकतील असे खरेखुरे गुण आपण बघतो का? अगदी पहाटे उठून व्यायाम करणारा मुलगा आणि आठ किंवा त्यानंतर झोपेतून उठणारी मुलगी यांचा मेळ
जमेल का? स्वतः चे पुस्तक काढणारा नवरा आणि ते वाचू न शकणारी किंवा वाचणाची बिलकुल आवड नसणारी बायको यांचे सुत जुळत असेल का? दोन व्यक्ती ज्या आयुष्यभर सोबत राहणार आहेत, त्यांना पंचांगाच्या भरोशावर सोडणे कितपत योग्य आहे, त्यांच्या खऱ्याखुऱ्या गुणदोषांना महत्व दिले जावे असे मला वाटते.आपणास काय वाटते हे कळाले तर यावर अजून खलबत होईल आणि काहीतरी उपयोगी असे हाती लागेल.