- ना.रा.खराद
आपल्या नजरेसमोर जे घडते,तेवढेच घडते असे कधीच नसते. नजरेआड खुप काही घडत असते.नजर चूकवून किंवा आडपडदा ठेवून, लपून छपून खूप काही चाललेले असते. भल्याभल्यांना त्याचा थांगपता लागत नाही.
"माझा मुलगा सिगारेट पितो ,हे मला दहा वर्षे कळाले नाही." असे कित्येक पालकांच्या तोंडून मी ऐकले आहे."काय,आमचा बाळू शाळेत नसतो,घरुन तर रोज येतो." हे विधानही पालकांचेच.
जे दिसते आणि जितके दिसते तेवढेच सत्य मानणे चूकीचे आहे.जे दडलेले आहे,लपवलेले आहे, झाकलेले आहे त्याचा शोध घेणारी दृष्टी हवी.नुसते बघणं सामान्य
प्रक्रिया आहे,शोधक आणि वेधक दृष्टी महत्वाची आहे.
नजरेआड जे चालते ते नेहमीच आश्चर्यकारक
असते. समोरासमोर देखील नजर चुकवून नजरेने खुणावले जाते.नजरेआडचे जग नेहमीच विलक्षण असते. मुले शाळेत शिक्षकांची नजर चुकवून नकल करतात किंवा खोड्या करतात, घरी पळून जातात. एवढेच काय जेलमधून नजरेआडून कैदी पळून जातात. सैनिकांची नजर चुकवून घुसखोर घुसतात. मांजर देखील घरात नजर चुकवूनच घुसते. शिकारी नजर चुकवून शिकार करतो.बेसावध प्राणी सावज ठरते.चोरी नजरेआड होते. खिसेकापू नजर चुकवून खिसा कापतात. आपणास थांगपत्ता लागत नाही.
आपणास जे कळत नाही, दिसत नाही, उमगत नाही ते समोर चालते पण आपणाकडे नजर नसते. ज्यांना नजर नसते ,त्यांची नजर चुकविण्याची गरज नसते.
लाच घेतांना नजरेआड घ्यावी लागते.इतरांच्या नजरा चुकवून अनेक गोष्टी केल्या जातात. उघड आपण तेच करतो जे लोक करु देतात बाकी मात्र नजरेआड करावे
लागते.प्रेम लपून छपून केले जाते. कुणाचे कुणावर प्रेम आहे हे जगाला ठाऊक नसते.
सर्व कारस्थाने नजरेआड चालतात. आपल्या माघारी आपल्या बद्दल बरेच काही चाललेलेअसते हे आपणास ठाऊक नसते. बहाना हा देखील नजर चुकविण्यासाठी असतो. सत्यता लपविणे म्हणजेच नजर चुकविणे असते. नजरेला जे दिसत नाही ते नजरेआड असते.
डोळ्यांनी फक्त दिसत असते, दिसलेले कळण्यासाठी नजर लागते. कुत्रे देखील नजर चुकवून घरात घुसते ,भाकरी घेऊन पळते.घरातील पाल,मुंग्या देखील नजरेआड आपला स्वार्थ पूर्ण करतात.
नजरेसमोर जे करता येत नाही ते नजरेआड केले जाते."तो असा करेल माहीत नव्हते.""तो असा असेल वाटलं नव्हतं."असे म्हणण्याची वेळ माणसावर येते
तेव्हा नजरेआड काय चाललेले असते हे त्यास उमगते.कित्येक रथी महारथींना चकवा देण्याचे काम होते. आपण जे बघितले नाही ते खरे मानण्यास तयार नसतो.मला सर्व कळतेअसे माणून माणसाची फसगत होते. अतिविश्वास नेहमीच नडतो.तो असे करणार
नाही ,असे आपण उगीच समजतो.नजरेआडचे आपणास दिसत नाही.
वर्गात शिक्षक नसतांना गोंधळ घालणारा विद्यार्थी, शिक्षक येताच शांत बसलेला दिसतो.नजरेआड सर्व खपवून जाते.चिरमिरीलपून घेतली जाते.अनेक तथाकथित साधुंनीलोकांच्या नजरेत धूळ झोकून त्यांना गंडविलेआहे.बघुन देखील लोक आंधळे करता येतात. अंधभक्त ह्यलाच म्हणतात. जादूचा खेळ करणारे जशी नजर चुकवितात तसा खेळ सर्वत्र, सर्वकाळ सुरूअसतो.
अनेकवेळा नजर धोका खाते,त्याचे कारण वरकरणी बघण्याची सवय आहे.अनेक घडामोडी आपल्या माघारी घडतात, म्हणून त्या घडल्या नाहीत,असे समजू नये.कोण काय दाखवतो यापेक्षा काय लपवितो हे समजणं गरजेचे आहे.अंधानुकरण ते हेच.
या ब्रम्हांडात काय घडामोडी चाललेल्या आहेत आपणास ठाउक नाही. आपल्या नजरेआड खुप काही चाललेले असते. आपल्याला जे ठाऊक असते ते तुटपुंजे असते. अचानक घडले असे जे आपण समजतो ते चुकीचे आहे. ते फक्त आपणाससमजत नव्हते एवढेच.कारण नजरेआडचे परिणाम दिसतात तेव्हाच ते कळते.झाडा फुलांची वाढ आपल्या नजरेआड होते. खानावळीतले पदार्थ आपल्या नजरेआड बनवले जातात. दिसते तेवढे आपण बोलतो.पण न दिसणारे खरे डोळ्यात भरणारे,डोळे उघडणारे असते.
नजरेसमोर हे जे ठेवले ते नजरेआड करु नका.नजरेआड जे आहे, ते नजरेसमोर आले पाहिजे.