- ना.रा.खराद
मी एका कापड दुकानात गेलो होतो.एका महिलेसमोर साड्यांचा ढिग पडलेला होता.दोन ते तीन तास उलटले तरी त्या महिलेस साडी पसंत पडत नव्हती.कदाचितअनेक पसंत पडत असूनही एकच खरेदी करणे शक्य होते.असो.
सर्व दुकानात ग्राहक आपल्या आवडीची निवड करतांना दिसतात.आवडीच्या बाबतीत फारच चोखंदळ असतात.वस्र असो की पदार्थ स्वत:ची आवड जपतात.बालवयापासूनच आवडीनिवडी सुरू होतात.मला अमूक आवडते,तमूक आवडत नाही.हा प्रवास अव्याहतपणे चालत रहातो.जे आवडतं नाही त्याचाही तिरस्कार घडो नये.
बसण्याची जागा देखील आपण आवडीची निवडतो.निवडीचे हे स्वातंत्र्य म्हणजे जीवन स्पंदन असते.आवडीप्रमाणे जगता आणि वागता आले की माणसे सुखी होतात.आवडीचे साम्य जवळीक निर्माण करते.आवडीप्रमाणे माणसेही निवडली जातात.अजिबात न आवडणारी माणसेही असतात.शाळेत माझा आवडता अमूक तमूक असे निबंध विषय असतात.
आई आपल्या मुलांना आवडते ते खाऊ घालते.आवडीची ठिकाणी असतात, माणसे असतात.एकाला जे आवडते ते इतरांना आवडतेच असे नाव.आवडीचे विषय निवडले जातात, आवडीचे साहित्य वाचले जाते.जे आवडते ते आपल्या आवडीच्या विषयांवर मनुष्य भरभरूनबोलतो.आवडीच्या माणसाच्या सहवासात आनंदी राहतो.त्याच्याशी संवादाने सुखावतो.खाद्यपदार्थांच्या थाळीतले आवडीचे पदार्थआवडीने खातो.शिक्षणामध्ये आवडीचे विषय
आपण निवडतो.
लहान सहान वस्तू खरेदी करतांना आपण आवड जपतो.पेन देखील आवडीचा निवडतो.परिधान आपल्या आवडीचे असते.आवडते ते सर्व आपणास प्राप्त होते असे नाही.त्यामध्येही कित्येकवेळा तडजोडीशिवाय पर्याय नसतो.जीवनामध्ये आवडते ठिकाण बघण्याचे राहून जाते.आवडती पोरगी इतर कुणाशी लग्न करते.आवडीचे कधी शिल्लक नसते.आवडीच्या निवडीच्या या खेळात जीवन चाललेले असते.
ज्याची आपण आवड जपतो,त्याच्या आवडीचे होतो.आवडीची भाजी निवडतो.निवडलेल्या भाजीतून परत निवडतो.फळांमधून आवडीचे फळ निवडायचे ,निवडलेल्या फळांमधून पुन्हा फळ निवडायचे.आयुष्यभर नकळत हे सुरूचअसते.आवडी निवडी भिन्न असतात म्हणून तर या जगात सगळे खपते.शंभर पोरांनी
डावलेली मुलगी ,कुणाला तरी आवडतेच.निवडून निवडून उरलेली वांगी कुणीतरी घेतोच.
घर बांधतांना आवड जपली जाते.प्रत्येक बाबतीत आवडीचे ते निवडले जाते.आपली आवड नावाचा रेडिओवर एक कार्यक्रम असायचा.फरमाइशी गाने असायचे. लोकांना आवडते ते लोकप्रिय ठरते.नवऱ्याला आवडतेते बायको खाऊ घालते.संपर्कातील लोकांच्या आवडी निवडी ठाऊक असल्या पाहिजेत.स्वत:प्रमाणे इतरांच्या आवडीचा सन्मान राखता आला पाहिजे.आपली आवड इतरांवर थोपण्याची गरज नसते.माणसातीलमतभेद हे त्याच्या आवडीनिवडीमुळेच होतात.इतरांची आवड जपता आली की आपणही आवडीचे होतो.सतत आपल्या आवडीचे घोडे पुढे काढण्याचा प्रयत्न कराल तर नावडीचे व्हाल.
आवडीचा आग्रह स्वत:पुरता मर्यादित ठेवता आला पाहिजे.आपली आवड जगजाहीर करावी परंतु नावड कधीच उघड करु नये.
नावडीचेही पचवता आले की आपण आवडीचे होतो आणि आपण आवडीचे झालो की आपले नावडीचे कधीच ठरत नाही. माणसांसाठी इतकी तडजोड आवडीने करता आली की माणूस म्हणून माणसा़मध्ये जगणे
सुकर होते आणि ते व्हावे एवढीच अपेक्षा!