व्याधि

                                          व्याधि
                                                       - ना.रा.खराद

हाडे, रक्त, मांस याने बनलेले मानवी शरीर अनेक व्याधिंचे माहेरघर असते.
कित्येक व्याधि तर जन्मासोबतच असतात तर काही कालांतराने किंवा वयोमानानुसार डोके वर काढतात.उपचाराने,पथ्थ्याने व्याधिंवर मात करता येते परंतु मूळासकट उच्चाटन कदाचितच
होते. कोणतीही व्याधी वेदनादायक असते, सहनशीलता वाढीस लावते.पर्याय नसला की
कोणतीही गोष्ट सहन करण्याची क्षमता प्रत्येकाच्या अंगी येते, सवयीने वेदनेची दाहकता
कमी होते, परंतु पथ्य आले की तथ्य राहत नाही.
वृद्धांची व्याधी स्वाभाविक समजली जाते,कोणतेही दुखणे ," वय झाले,असे होणारच".
एखादी गोष्ट स्विकारली की तीचे काही वाटेनासे होते.जसे पायात घुंगरू बांधले की नाचायची लाज वाटत नाही.
मनुष्य स्वतःच्या वेदना सहन करु शकतो परंतु आपल्या प्रिय व्यक्तीच्या वेदना तो सहन करु शकत नाही.एखादी माता किंवा पिता ज्यांचे मुल व्याधीग्रस्त आहे, त्यांनाच ते ठाऊक असते.प्रिय व्यक्तीची व्याधी पथ्थ्यावर पडलेली असते, सेवा हे कर्तव्य असते.
व्याधी या केवळ शारीरिक नसतात, मानसिक व्याधी तर खूप त्रासदायक असतात.असून देखील नाही अशा वाटतात.त्या ओळखणे सोपे नसतात, परंतु त्यांचे परिणाम दिसून येतात.कोणत्याही परिणामापासून कुणाचीही सुटका नसते.
अनेक घरातून व्याधीग्रस्त लोकांचे विव्हळणे आपल्या कानी पडते.कोणत्याही व्याधींवर नाना उपचार सुचवले
जातात,त्याचा काही उपयोग होतो असे दिसत नाही.
व्याधीग्रस्त माणसे इतरांना नकोशी होतात.शरीराच्या वेदनेपेक्षा स्वकियांकडून होणारी उपेक्षा मनाला तीव्र वेदना देते, परंतु जगण्याचा मोह सर्व काही करण्यास भाग पाडतो.
काही व्याधी या आकस्मिक निर्माण होतात, कित्येक अपघाताने उद्भवतात .सुडौल,निरोगी माणसे देखील अचानक व्याधीग्रस्त होतात.
मानवी शरीर हे मोठे कोडे आहे.पथ्थ्य, व्यायाम,आहार असून देखील व्याधी सोडत नाही.अनेक योगी पुरुष अल्पकाळ होते. व्याधीमुळे सर्वकाही असून, काही नसल्यासारखे वाटते.इतरांकडून बघून हेवा वाटतो.
व्याधीची विविध रूपे असतात.बऱ्याच व्याधी उघड करता येत नाहीत."गुप्तरोग" म्हणून त्या ओळखल्या जातात.सहन होत नाहीत आणि सांगताही येत नाहीत अशा स्वरूपाच्या असतात.देह नाशवंत जरी असला तरी, आहे तोपर्यंत तो निरोगी असावा असे वाटते परंतु ' पराधीन आहे पुत्र मानवाचा.' या उक्तीप्रमाणे
हतबल होण्यापलीकडे काहीही हाती उरत नाही.
व्याधीग्रस्त माणसांविषयी अधिक प्रेम, जिव्हाळा आवश्यक आहे.आपण निरोगी आहोत म्हणून व्याधीग्रस्तांवर हसायचे हे पाप तर कधीच करु नये.आधीच वेदना असतांना त्यास अधिक वेदना देऊ नये.एक मनुष्य म्हणून
इतके समंजस आपण असायलाच हवे.
          
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.