शिक्षक - ना.रा.खराद

                       शिक्षक
                            - ना.रा.खराद

     भारतीय समाजात शिक्षक कायम चर्चेत असतात.गुरु वगैरे पासून थेट मास्तरड्या पर्यंत त्याची घसरण होते ‌.समाजातील सर्व घटक शिक्षकांबद्दल बोलत असतात.
शिक्षकांकडून समाजाच्या अवास्तव अपेक्षा व भ्रामक समजूत त्यास कारणीभूत आहे.
    सर्वकाही बदलले तरी शिक्षक मात्र पूर्वीसारखाच असला पाहिजे,अशी अपेक्षा बाळगली जाते.
भारताची लोकसंख्या, त्यामध्ये शिक्षकांची संख्या शिक्षणाची सोय व एकंदरीत सर्व बघता शिक्षक या घटकाचा विचार करावा लागेल.  
       शाळा कोण चालवते, त्या कशा पद्धतीने चालतात, शिक्षक भरती कशी होते वगैरेअनेक बाबींचा विचार करावा लागेल.शाळांची संख्या, विद्यार्थी संख्या, शिक्षक संख्या याचा असमतोल बघावा लागेल.
    पूर्वीचे शिक्षण आणि आताचे शिक्षण यामध्ये खुप फरक आहे.साधणे बदलली,गरजा बदलल्या बदल हा सर्वांगिन असतो.सर्वच क्षेत्रात आमुलाग्र बदल झाला असताना शिक्षण क्षेत्र अपवाद कसे राहणार?
    आध्यात्मिक क्षेत्रातील गुरू आणि शिक्षक
यामध्ये फरक आहे.व्यावसायिक शिक्षण घेऊन या व्यवसायात उतरलेले शिक्षक हे गुरू वगैरे नाही असू शकत.आजच्या शिक्षकांसमोरची आव्हाने फार मोठी आहेत.
  शाळा बंद असल्याने काय होते, हे पालकांना विचारा किंवा विद्यार्थी कसे वागतात हे तपासा.नसता संपूर्ण समाज कोलमडून पडेल इतकी ताकद शिक्षण आणि शिक्षणामध्ये आहे.
   शिक्षक,जो समाज घडविण्याचे काम करतो,त्याचे समाजातील स्थान काय आहे.एक नेभळट, उपद्रव मूल्य नसलेला गरीब प्राणी.वरची कमाई नसलेला,त्याच्याशी काही अडत नसल्याने त्यास समाज सन्मान देत नाही.याउलट लाईनमन, पोलिस, तलाठी , ग्रामसेवक हे सगळे ' साहेब' असतात,कारण त्यांच्या कडून आर्थिक
फायदे होतात.शिक्षक जो फळा आणि खडू यामध्ये आपले आयुष्य घालतो.कुठलाही भेदभाव न करता
मुलांना शिक्षण देतो.आपण शिक्षक आहोत,याची जाणीव ठेवतो.तरीही त्यांच्यावर कुरघोडी समाज करतो.
   आपली मुले यशस्वी झाली तरच शिक्षकांचा आदर , नसता तो कवडीमोल.श्रीमंत लोक तर शिक्षकांची काही किंमत ठेवत नाहीत.पैशांमध्ये त्याचे मोल करतात.
अधिकाऱ्यांसाठी हारतूरे घेऊन पळणारे शिक्षकांकडे ढूंकून देखील बघत नाही.पैसेवाले फक्त पैसा बघून किंमत देतात.
     शिक्षक हा एका जिवंत घटकांशी जोडलेला
आहे.आईवडीलांना आपले मुल सर्वाधिक
प्रिय असते, परंतु त्या मुलाला प्रिय असलेल्या शिक्षकांना भेटण्याची तसदी कुठलाही पालक घेत नाही.
शिक्षकांविषयी जी काही टीका होते,ती देखील रास्त नाही.शिक्षक हा देखील मनुष्य आहे.तुम्ही ज्या मजा मारता तो अधिकार त्यास देखील आहे.मनुष्य म्हणून जगण्याचा खाण्यापिण्याच्या अधिकार आहे.
शिक्षकांकडून अपेक्षा करायच्या मात्र त्याचा सन्मान करायचा नाही, हे कसे चालणार?
    आता फक्त शिक्षक बिघडणे बाकी आहे.इतर सर्वांनी आपला रंग दाखवला आहे.सर्वच शिक्षणातून पुढे आले आहेत,त्या प्रत्येकाचे शिक्षक होते,मग शिक्षक तुच्छ कसा असेल? लहान मुले आईवडिलांपेक्षा शिक्षकांचा आदर करतात,मग तुम्ही कशाला त्यांचा अनादर
करता? 
   जो समाज शिक्षकांचे महत्व जाणतो, त्यांच्या विषयी कृतज्ञ राहतो तोच समाज प्रगती करु शकतो.शिक्षकांच्या कार्याची महती लक्षात घ्यावयास हवी.त्यास ईमानदारीचे दोन पैसे मिळतात म्हणून त्यांचा द्वेष करणे योग्य नाही.अधिकाऱ्यांकडे घबाड सापडले तरी
ब्र शब्द न काढणारे लोक.
    आपल्या आर्थिक फायद्यासाठी अनेकांना लाच देणारे लोक,शिक्षक फार बिघडले म्हणत असतील,तर ह्यास किती महत्त्व द्यायचे हे शिक्षक ठरवतील.समाजाने याबाबत थोडा विचार करावा एवढीच अपेक्षा!
               
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.