रेडिओ
- ना.रा.खराद
पूर्वी करमणूकीच्या साधनांमध्ये रेडिओचे स्थान
फार उच्च होते.लग्नामध्ये बायको सोबत येणाऱ्या दोन वस्तू म्हणजे घड्याळ आणि रेडिओ.घड्याळाचा उपयोग देखील रेडिओसाठी व्हायचा.घड्याळ बघूनच रेडिओचे बटन फिरवायचे.काही नामांकित कंपन्यांचे रेडिओ
असायचे.दिल्ली मेड स्वस्त असायचे.दोन,तीन, चार अशा सेलवर चालणारे रेडिओ असायचे.आकाराने मोठे असणारे रेडिओ एक दोन पिढ्या जागेवर असायचे.कुटुंब प्रमुखाशिवाय त्या रेडिओस कुणी हात लावू शकत नसे.जे ऐकायला मिळते तेच ऐकायचे.
सेलची बचत व्हावी म्हणून रेडिओचा वापर
कमी केला जात असे.आवाज देखील कमी ठेवला जायचा , त्यामुळे सेल टिकतात असा त्यावेळी समज होता.
गावामध्ये अनेकांकडे रेडिओ असायचे.चित्रपट
संगीत हा आवडीचा कार्यक्रम.गल्लीगल्लीत गाण्यांचा आवाज ऐकू यायचा.रेडिओचे एक बटण कायम फिरत असायचे.वेगवेगळे स्टेशन हा रेडिओचा आत्माच म्हणावा लागेल.पहाटपर्यंत गाणे ऐकविणारे आणि ऐकणारे होते.लहान मुलांना रेडिओचे खुप आकर्षण असायचे.मोठी माणसे रेडिओचा
वापर मुलांकडून कामे करुन घेण्यासाठी,रडणाऱ्या मुलांना गप्प करण्यासाठी करायचे.रेडिओतून येणाऱ्या आवाजाविषयी फारसे कुणाला माहित नसायचे.आतमध्ये लहान लहान माणसे आहेत असे आम्हाला सांगितले जायचे, आम्हाला ते खरे वाटायचे.आवडीचे गाणे लागले की आम्ही आनंदित व्हायचो.घरात जास्त माणसे असली की वेगवेगळ्या वेळेत
रेडिओ मिळायचा.झोपतांना देखील रेडिओ उशाला असायचा.शेतातील शांत वातावरणात गाण्यांचे
मधुर स्वर कानावर पडायचे.
कधी कधी रेडिओत बिघाड होत असे.त्याची दुरुस्ती मोठे दिव्य होते.अनेक खेट्या मारल्या शिवाय रेडिओ मिळत नसे.कित्येकवेळा त्याचा अंतिम संस्कार दुकानातच होत असे.
लग्नामध्ये रेडिओ साठी नवरदेव रुसून बसत असे,मोठ्या शिताफीने समजूत काढली जात असे.बायको नाही मिळाली तरी चालेल पण
रेडिओ मिळाला पाहिजे अशा बाण्याचे नवरदेव
असायचे.किर्तन, पोवाडे,तमाशा,लावण्या सर्व
काही असायचे.जो तो आपल्या आवडीप्रमाणे
आस्वाद घेत असे.देशातील मोठमोठ्या बातम्या
रेडिओवर येत असे.रेडिओ हेच अंतिम सत्य होते.रेडिओ गळ्यात लटकावून गावभर फिरणारे
काही हौशी लोक असायचे.कुणी कुणी स्वतः पुरताच आवाज ठेवत असायचे.काही टारगट
पोरं आवाज खूप वाढवायचे.आवाजाची स्पर्धा
करायचे.
रेडिओवर नाव असायचे.कातडी कव्हर असायचे.मुले रेडिओ मांडीवर घेऊन बसायचे.
रेडिओ इतके काहीच प्रिय नसायचे.रेडिओ
एकटेपण घालवायचा.हिंदी आणि मराठी असे
दोन बैंड असायचे,ते मागील बाजूस छोट्या आकाराचे , सुरक्षित असायचे.कित्येकांना ते माहित नसायचे.शेतात काम करतांना रेडिओ सोबतीला असायचा.गळ्यात किंवा रुमण्याला लटकवला जायचा.
एकेकाळी गळ्यातला ताईत बनलेला रेडिओ,
आज अडगळीत पडलेला आहे.तरी मनाच्या
एका कोपऱ्यात त्याची एक जागा आहेच.