अर्धे हळकुंड

                      अर्धे हळकुंड
                                      - ना.रा.खराद


त्याने नुकतीच एक कविता लिहिली होती.कविता कसली,केवळ पाच पन्नास शब्दांचा गोपाळकाला होता.वयाच्या चाळीसीत लिहिलेले खुपच बालिशपणाचे त्याचे ते पहिले काव्यअपत्य होते.त्यामुळे त्यास भलतेच नवल झाले होते.गद्यालाही लाजविल असे ते काव्य!,
त्याच्या मते ,साहित्य जगतात खळबळ माजविणार होते.
प्रत्येक नवीन कवीप्रमाणे त्यास उधाण आले होते.आपले पहिले लेकरु कडेवर घेऊन गांवभर फिरावे तशी त्या कवीची अवस्था झाली होती.गल्लीतल्या कुण्या 'बाल गणेश मंडळात' त्याने काव्यवाचन केले होते.त्यामध्ये त्यास' प्रथम पुरस्कार 'मिळाला होता व अखिल गल्ली स्तरावरची 'काव्य भूषण' ही उपाधी देखील!त्याने आपल्या दारावर तशी पाटी देखील लावली होती.त्याने एकच कविता लिहिलेली असली तरी त्याच्या संभावीत पुस्तकांची यादी फार मोठी होती.कविता जरी
लिहिलेल्या नसल्या तरी त्याच्या काव्यसंग्रहाला दिली जाणारी नावे त्याने शोधून ठेवली होती.
लोक त्यास कवी नावाने ओळखू लागली होती.तोही कविता हाच आपला उद्योग आहे,असेच लोकांना सांगायचा.कवीराज,कवीमहाशय अशा शब्दांनी लोक त्यास हाक मारु लागले.
कवीचा वेष त्याने धारण केला होता,दाढी वाढवली,खादीचा झब्बा तो घालू लागला.गळ्यात शबनम लटकावून तो गावभर फिरु लागला.आपण कवी असल्याचे भूत त्याच्यावर स्वार झाले.
कुठेही त्याने रचलेली प्रथम कविता तो 'माझी
प्रथम कविता' म्हणून मिरवू लागला.इतर कवीप्रमाणे तोही बाळसं धरण्याअगोदरच प्रसिद्ध होऊ लागला.
काव्यलेखन, काव्यवाचन स्पर्धेत तो भाग घेत
असे.त्याचा परिचय देतांना तो त्यास प्राप्त झालेल्या किंवा त्याने पटकावलेल्या पुरस्कारांची यादी देत असे.त्याची काव्यवाचनाची लकबही न्यारी होती.श्रोते ऐकत नसत पण त्यास बघत असत.तो या देशाला कवींची गरज आहे असे सांगत असे.
देशाचा गुणगौरव कवीमुळेच आहे असे त्यांचे
मत होते.टागोरांनी राष्ट्रगीत लिहून देशावर
फारच उपकार केले असे त्यांचे मत होते.
आपण कवी म्हणून जन्मलो आहोत आणि आकंठ त्यात बूडालो आहोत असे तो आवर्जून सांगत असे.
आमरण काव्यव्रत आपण घेतल्याचेही तो बोलत असे.
खरेच आपण काय लायकीचे असतो,आपण
काय भासवतो,लायकीपेक्षा किती प्रसिद्ध होऊ पहातो आणि स्वत:चे हसे करुन घेतो.प्रसिद्धीचा हव्यास त्यामुळे
उथळपणा वाढतो.आपण जे काही करतो ते ताकदीचे असावे.आपली कृती गाजली पाहिजे,आपण नाही.
आपली वास्तविक योग्यता आपणास ठाऊक
हवी.प्रसिद्ध होण्याचा खटाटोप आपणास मागे घेऊन जातो.मागे जाण्यापेक्षा मागेच असावे.दमदार पाऊल टाकावे.
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याचा प्रयत्न करु नये.
                
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.