इतर आपणास ओळखतात याचाआपण अभिमान बाळगतो, मात्रआपण स्वत:ला खरेच ओळखतो का? इतरांनी आपणास ओळखावे यासाठी जो खटाटोप केला जातो ,तीच आपली खरी ओळख असेल का? आरशामध्ये आपण प्रतिबिंब बघतो आणि बिंब अनोळखी रहाते.
स्वत:ला न ओळखण्याचे अनेक वाईट परिणाम होतात.इतरांना आपल्या बद्दल काय
वाटते ही आपली खरी ओळख असूच शकत नाही.कारण तेही बिचारे इतरांना ओळखण्याच्या नादात ,स्वत:शीच अनोळखी राहतात.
स्वत: बद्दल एखादी समजुत करुन घेणे ही आपली वास्तविक ओळख नाही.आपणच आपल्याला लावलेले किंवा इतरांनी चिकटवलेले लेबल हे फसवे असते.ते लेबलच खऱ्या ओळखीच्या आड येते.आपण आपल्याचसाठी, आपल्याच धुंदीत काही करतो की नाही.दूसरा इतका महत्त्वाचा होऊन गेलेला असतो की आपण स्वत:ला पार विसरुन जातो.बाह्य बाबी आकर्षक वाटू लागल्या की आत्मपरिक्षण होतच नाही.
भल्याभल्यांनी ही चूक केलेली असते.
स्वत:ला ओळखणे ही सरळ सोपी गोष्ट आहे.त्यामध्ये आध्यात्म वगैरे शब्द घालून ते अधिक गुंतागुंतीचे मी करु इच्छित नाही.स्वत:ला ओळखण्यासाठी इतरांना विसरणे
गरजेचे आहे.मन जे सतत बाहेर भटकते त्यास थोडे स्वत:कडे बघायला लावले पाहिजे.मनोरंजन करत रहाल तर मन ओळखू येणार नाही.
भौतिक जगात फार गुरफटले की आपलीच ओळख आपणास रहात नाही.एखादे बिरुद
मिळाले की त्यांचे ओझे आयुष्यभर आपण वाहतो.स्वत:ला त्यामध्ये कैद करतो.बाह्य ओळख हीच खरी ओळख आपण मानू लागतो.नाटकातले पात्र आपण खरे समजू लागतो.आपण जे काही करतो ते इतरांसमोर
मांडतो.एक प्रतिमा तयार करतो आणि तिचे रक्षण करत रहातो.
स्वत:ला ओळखल्याविना आपले बाह्य आचरण शुद्ध होणार नाही.इतरांच्या प्रभावाखाली येणे हेच मूळात चूकीचे आहे. तटस्थपणे बघण्यासाठी स्वत:ची ओळख आवश्यक असते.कुणाचे तरी अनुयायी,कुणाचा तरी पगडा या कुणांकुणामुळे आपण स्वत:स हरवून बसतो.
इतर हे कायम इतरच राहिले पाहिजे.कुणाचाही आणि कशाचाही पगडा आपल्यावर असता कामा नये.
स्वत:ची ओळख ही फार दिव्य गोष्ट आहे.इतरांबद्दल भरमसाट बोलणारी माणसे,स्वत:बद्दल ब्र शब्द काढत नाहीत.
स्वत:शी संवाद करता आला पाहिजे.निशब्द देखील शब्दच असतात.आरशात स्वत:चा चेहरा बघता येतो पण त्या चेहऱ्यातला माणूस दाखवणारा आ्रसा फक्त आपण स्वत: असतो.
आपणास कुणी ओळखो अथवा न ओळखो,लोकांचे आपल्या बद्दलचे मत काहीही असो , जोपर्यंत आपण स्वत:ला ओळखत नाही तोपर्यंत खरी ओळख झालेली नसते.