लग्न हा एक संस्कार होता.ओळखीच्या, जवळपासच्या नात्यातील मुलां-मुलींमध्ये विवाह जुळायचे.शिक्षितांचे प्रमाण कमी होते, मुलींचे तर नगण्य.कुणाच्या तरी मध्यस्थीने लग्न जुळले जायचे,देणे घेणे बोली चाली व्हायच्या, मानपान असायचे, रुसवे फुगवे होतेच, परंतु त्यामध्ये जिव्हाळा,प्रेम, आपुलकी, सन्मान असायचा त्यामुळे त्या लग्नाला एक सौंदर्य असायचे.संशयाला जागा नसायची.आल्या गेल्याचा सत्कार केला जायचा.जावई लाडका असायचा.मुलगी सासरी रुळायची.नात्यामध्ये गोडवा होता.
बायोडाटा, वधुवर मेळावे असला प्रकार नव्हता.लव्ह मैरेज किंवा रिलेशनशिप असले प्रकार नव्हते.लग्नपत्रिका असायची, भावकी जपली जायची, मोठ्यांचा आदर असायचा.
काळ बदलला, मुलंमुली शिकू लागली.स्वावलंबी झाली, स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ लागली.लग्न हा संस्कार वगैरे विचार मागे पडू लागला,पैकेज वगैरे विचारण्यात किंवा सांगण्यात येऊ लागले.नोकरी, पैसा,घर,शेती लग्नात जमेच्या बाजू ठरु लागल्या आणि लग्नाचा
बाजार कधी झाला, कुणाला कळलेच नाही.
आता मुलींचे सासर नावापुरतेच उरले,आता मुलगाच स्वतःच्या घरी रहात नसल्याने सासर हा शब्द हद्दपार झाला.बाजारात वस्तूंची बोली लागावी तशी मुलांची बोली लावली जात आहे.संप्पतीचे पूर्ण विवरण दिल्याशिवाय मुलीचा बाप धजावत नाही.मुलांनाही मुलगी सुंदर पाहिजे, नोकरी करणारी असावी अशी अपेक्षा असते.लग्नातला हा व्यावसायिक विचार लग्न संस्कार मोडकळीस काढत आहे.
लग्न ही एक सामाजिक गरज आहे.दोन शरीर ,दोन कुटुंबे आणि दोन मने जुळली
जायची , परंतु आता पैसा जुळला की झाले,कुरुप मुलांना देखील सुंदर मुलगी हवी आहे,गरीब मुलींना देखील श्रीमंत नवरा हवा आहे.मुलांमुलींना मिळालेले अति
स्वातंत्र्य स्वैराचार बनले आहे.
लग्नाचे पावित्र्य नष्ट होऊन तो एक शुद्ध व्यवहार झाला आहे आणि जिथे व्यवहार असतो , तिथे बाजार असतो.लग्नाच्या या बाजारात ' बायोडाटा' नावाचा फलक असतो ,त्यावर पैकैज नावाची मोहर असते आणि अपेक्षा नावाच्या अटी असतात.
लग्नाचा हा बाजार नव्या युगाची आणि नव्या जगाची ओळख आहे.
आपल्या वेळी असं नव्हतं बुवा! इतकेच मी
अगतिकपणे बोलू शकतो.