माहेर -सासरी नांदायला गेलेल्या मुलींना माहेरची....

माहेर
- ना.रा.खराद


सासरी नांदायला गेलेल्या मुलींना माहेरची फार ओढ असते. जन्मदाते आई वडील जिथे असतात, तिच्यासाठी ती पंढरी असते. अनेक आठवणी असतात. मित्र मैत्रिणी असतात. तिच्या हाताने लावलेले पारिजातकाचे झाड तिला बघायचे असते. माहेरी जाऊन बाबाला
मीठी मारत,'बाबा,तुम्ही का आले नाही, मी खुप वाट बघितली .'तुमच्या आवडीचे कारले
मी आणून ठेवले होते.' मुलीच्या शब्दांतला प्रेमाचा पाझर बापाच्या डोळ्याच्या कडा ओल्या करतो.
बाप म्हणतो,"मला तुझ्या हातचे पिठले खायचे आहे आज." मुलगी आपल्या बाबासाठी पिठले बनवतांना मायेचा,स्नेहाचा असा काही रस त्यामध्ये मिसळते की बाप ते पिठले खाऊन धन्य होतो.मग बाप सासरची विचारपूस करतो.सासू कशी,सासरा कसा ? मुलगी भरभरून बोलायला लागते."सगळे खुप चांगले आहेत, बाबा."तुम्ही काही काळजी करु नका." मुलीच्या वाक्याने बाप सुखावतो.
मुलीचे कल्याण झाले, असे पुटपुटतो.
माहेरी आलेली मुलगी ,आपल्या सासरच्या
गुजगोष्टी सांगते.आई मोठ्या कुतूहलाने ऐकत
असते. म्हणते,"जातांना तेवढी लोणच्याची भरणी घेऊन जा." माहेरात रमलेली मुलगी सासरच्या स्मरणाने गांगरते.चिडून आईला म्हणते,"तुला घाई झाली ,मला काढून द्यायची." आई पुन्हा सावरते."चल आज मळ्यात जाऊ,तु लावलेले जांभूळ किती मोठे झाले बघ.
" कुठे कुठे जांभूळही दिसत आहेत." मुलीच्या पुढे बालपणचा सगळा चित्रपट दिसू लागतो.पंचमीला बाबाने बांधून दिलेला झोका.त्या बालमैत्रिणी.मग ती आईला विचारते,"ती मंगू कुठे आहे गं?' गावच्या सर्व मैत्रीणीविषयी माहिती घेते.
आई तीला सर्वकाही सांगते.माहेरच्या वातावरणात
रमलेली असतांना भाऊ म्हणतो,"तुला कधी जायचे?" तसा तिचा कंठ दाटून येतो."जा तुला काय करायचे,मी माझ्या बापाच्या घरात आहे." भाऊही भावूक होतो.बहिणाचा आपल्या मधून जीव निघत नाही ,त्याने हे ओळखलेले असते.
एक दिवस सासरचा सांगावा येतो."मंगळवारी येतो,तयारीत रहा."
आता जाणे भाग असते. जाण्याचा विचार तिला आतून तोडतो.वरकरणी ती तयारी करते,पण मन तयार नसते. आवरतांना घरातल्या प्रत्येक जागेत तीला आपले आस्तित्व दिसते."आई ,बाबाला वेळेवर गोळ्या देत जा." अभ्यासाच्या खोलीत जाऊन ती सारखी रडत होती.तीचीे काही जुनी पुस्तके तीला भूतकाळ विसरु देत नव्हती.आपल्याच घरात परक्या सारखे का वाटावं या विचाराने ती गांगरून गेली होती.
सर्व तयारी होते.गाडी निघण्याची वेळ असते.
आई वडीलाच्या गळ्यात ती पडते. अश्रूचा पाट वाहत असतो."मुली ,सुखी रहा."एवढे दोनच शब्द बाप उच्चारु शकतो.
वळून बघणाऱ्या मुलीकडे बघण्याइतके धाडस बापाकडे उरलेले नसते.

Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.