- ना.रा.खराद
प्राथमिक शाळेत.'छडी' या नावाने ओळखले जाणारे हे शस्त्र आणि कधीकधी अस्र देखील,मास्तरांचे मुलांना वळण लावण्याचे अमोघ आयुध होते.कुण्या महाभागांनी त्या छडीचे महत्त्व जाणले आणि लिहिले,"छडी लागे छमछम.." मास्तरांनी देखील मुले घडविली कमी आणि बडविलीच जास्त! छडी कधीच विकत आणावी लागत नसे.पाहिजे तेव्हा उपलब्ध.मुलांच्या तळहातावरच्या रेषा या छडीनेच घडवलेल्या असतात.मार न मिळणारी मुले छडीची कमतरता भासू देत नसत.मानिटर तर तिला रंग वगैरे देत असे.त्या छडीवर मास्तराचे किंवा वर्गाचे नाव लिहिलेले असायचे.
मुलांना गप्प बसवण्याचा हा अघोरी प्रकार अनेक वर्षे बिनदिक्कत सुरू होता.या छडीचे अनेक उपयोग असायचे.वर्गात शिरलेला बेडूक बाहेर ढकलण्यासाठी,पुस्तकांवर ओझे ठेवण्यासाठी, मैदानावरीलशेळी ,कुत्रे हाकलण्यासाठी .छडीशिवाय कुत्रं देखील घाबरत नाही.या छड्या वैशिष्ट्येपूर्ण
असायच्या.ओलीछडी,वाळलेली,वाकडी,
सरळ असे विविध नमुने असायचे.छडी वाकडी असली की मुलगा सरळ व्हायचा.मास्तरांचा मार त्यावेळी पोलिसांसारखा अधिकृत होता.कुठेही दाद मागता येत नव्हती.छडीशिवाय मास्तर ही कल्पनाच शक्य नव्हती.
काही हौसी मुले छड्या सुतारांकडून सुडौल बनवून आणायचे.कधी कधी आपण आणलेली छडी आपल्याच हातावर पडायची.
छडी नरदेहाच्या कित्येक भागावर सोपस्कार चालवता येते.हाडे वगळता कुठेही.पार्श्वभाग हे छडीचे आवडीचे ठिकाण.चोळायला थोडे लाजल्यासारखे व्हायचे.परंतु इतरांना चोळतांना बघून गंमत वाटायची.अनेक वेळा वळ एक दोन रहायचे.परंतु मुलं मार खाऊन मोठे होतात,असा पालकांचा समज होता.कोडगी होतात, हे त्यांना उशिरा कळायचे.
वर्गात छडी घेऊन आलेला मास्तर किंवा गुरुजी , हातात हंटर असलेल्या इंग्रजासारखा भासायचा.छडी मोजून मारता येते.शाळा सूटली की त्याचा हिशोब व्हायचा.छडी नुसती टोचता पण येते.काही छड्या डांबरत मुलांच्याअंगावर मोडत असत.मोडेल पण वाकणार नाही अशा बाण्याच्या त्या छड्या असतात.एखादी छडी लवचिक असायची.वाकवली तरी मोडत नसे.आवाज सपक असा यायचा.जाड चड्डी असेल तर मार कमी लागायचा.काही मुले छडी चूकवित असत.युद्ध कलेत निपूण असलेली ही मुले , अलगदपणे छडी चूकवायचे.फक्त आवाज होत असे,सोंग करणारी मुले छडीला खुप घाबरायचे.मास्तर हळू मारायचे तरी खुप ओरडायचे.कित्येक छड्या पाठीवर मोडण्याचा विक्रम करणारे महाभागही असायचे.शिकवणे आणि छडी दोहोंचा परिणाम त्यांच्यावर होत नसे.
वर्गातील मुलींना छडीचा हल्का मार मिळत असे.मार खाण्यापूर्वीच अश्रू बघून गुरुजी ,जाऊ द्या पुढे कुठे शिकणार आहे.चूल आणि मुल सांभाळणार!
तळहातावर बसलेला मास्तरांचा मार,मुलांच्या हस्तरेषा सरळ करायचा आणि मुलांच्या हातावरच्या छडीच्या वळांना हळद लावून शेकून काढतांना आई म्हणायची," बाळा,तुह्या कल्याणासाठीच मास्तराचा जीव तुटतोय, म्हणून पोटतिडकीने मास्तर मारतोय."आता तशी आई नाही, तसे मास्तर नाहीत.
छडीची छमछम ना विद्येची घमघम!