कारणाशिवाय....

             कारणाशिवाय....
                            - ना.रा.खराद

मी एका नातेवाईकाच्या घरी गेलो, मला अचानक आलेले बघून त्यांना आश्चर्य वाटले, ते म्हणाले,“ आज कशी वाट चुकलात?" मी म्हणालो ,“ असेच ,सहज!" चहा वगैरे झाल्यावर त्यांनी परत विचारले,“ काय काम काढले आमच्याकडे? " “ तुम्हाला भेटायला आलो." मी म्हणालो.तरीही त्यांच्या मनात हा विचार घोळत होता की,मी
कशासाठी आलो असेल?" 
  आजकाल कुठेही जाण्याचे,येण्याचे,बघण्याचे,थांबण्याचे कारण सांगावे लागते.संपूर्ण जीवनाचे व्यावसायिक व व्यावहारिकरण झाले आहे.मला एका झाडाखाली बसावे वाटले म्हणून बसलो,तर तेथून जाणारा प्रत्येक जण मला,
इथे का बसलात,असे विचारु लागला. मी एकदा मित्रांना म्हणालो,“ या आज जेवायला जाऊ?" लगेच त्यांनी विचारले,“काय आहे खुशखबर?" मी म्हणालो, तुम्हाला जेऊ घातल्याचा आनंद मिळेल मला." 
 शिक्षण घेणाऱ्या मुलांना विचारले जाते,“ तुला काय बनायचे?" ध्येयाच्या नावाखाली त्यास मोकळेपणाने शिक्षण देखील घेऊन देत नाही.निर्हेतूक, निस्वार्थ असे काही नसतेच का? आणि तसे असेल तर ते योग्य आहे का?
मागे एकदा मी नेत्याकडे गेलो, नमस्कार केला आणि बसलो.मला ते म्हणाले, "काय काम आहे?" मी म्हणालो,“ काही काम नाही म्हणून आलो." त्यांना आश्चर्य वाटले.ते म्हणाले, “माझ्याकडे प्रत्येक जण काहीतरी कामच घेऊन येतो म्हणून विचारले."  मी म्हणालो,” म्हणूनच मी कारणाशिवाय आलो आहे." 
 मला बसस्थानकावर बसावे वाटले म्हणून बसलो तिथे.ओळखीच्या प्रत्येक माणसाने मला विचारले,“ कुठे चाललाय?" मी म्हणालो,“ कुठेच नाही." त्यांना नवल वाटत होते व मी तिथे का बसलो असेल असा विचार त्यांच्या मनात घोळत असेल.
  मी एका मित्राला कारणाशिवाय फोन केला,त्याचा पहिला प्रश्न, “काही काम आहे का? मी म्हणालो,“ काही काम नाही म्हणून तुझ्याशी बोलावं म्हटले." हल्ली बाप मुलाकडे भेटायला गेला तरी तो ,“ काय काम काढले?" असे बापाला विचारतो. कुणी मिठाई वाटतो, लगेच कारण विचारले जाते.निमित्त हवेच का, काही कारण नसताना
काहीच करु नये का? कुणी झोपला तरी त्यास,का झोपला विचारतात.कुणी खळखळून हसू लागला तर“काय
झाले दात काढायला?" असा टोला लगावतात.
निर्भेळ, निरपेक्ष असे काही नसतेच का, किंवा नसावेच का? हा विचार करावयास हवा.अमूकच वेळी अमूक गोष्ट करावी, कुठले तरी निमित्त साधूनच काही करायचे, हे बंधन कशासाठी? साधे भजे तळून खाल्ले तरी, प्रश्न!
फक्त निमित्त पाळायचे हे जीवन निमित्तमात्र आहे, यामध्ये प्राण नाही, हे केवळ औपचारिक आहे.
पोळ्याशिवाय बैल सजवले तर काही चूक होणार का, दिवाळी नसताना गोडधोड खाल्ले म्हणून काही डोंगर कोसळणार का? गळा भेट फक्त दसऱ्याचा मुहूर्त साधूनच होणार का? अशा कितीतरी गोष्टी आहेत,ज्या निमित्त आणि कारणाने सुरू आहेत,  कारणाशिवाय काही करणे जसे वेडेपणा मानले जाऊ लागले आहे.
एक साचेबद्ध जीवन पद्धती एक प्रकारची गुलामी आहे.या न दिसणाऱ्या बेड्या आहेत.हे पाश पाशवी आहेत.
कारणाशिवाय जगले पाहिजे,केवळ नैमित्तिक नाही.

Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.