गंभीर माणसे

            गंभीर माणसे
                            -  ना.रा.खराद

      आजच्या काळात माणसे चेहऱ्यावरील हास्य गमावून बसली आहेत.जिकडे तिकडे गंभीर चेहऱ्याची माणसे दिसत आहेत.माणसे माणसांकडे अकारण रागाने बघत आहेत.
   श्रीमंत लोक, अधिकारी,विद्वान यांना तर गंभीरतेचा शापच आहे.हसणारी माणसे यांच्याजवळ गेली की गंभीर होतात.मनुष्य असा गंभीर का असतो किंवा होतो याची कारणे शोधली पाहिजेत.थोडेसे हसमुख असले तर काय बिघडते.
   घोड्यावरुन वरात काढलेला नवरदेव गंभीर असतो.समोर बाजा, नृत्य असतांनाशुद्धा गंभीर? मग आनंदी होणार तरी कशाने? मंडपामध्ये शुद्धा नवरदेव
गंभीरपणे पाऊले टाकतो.तरुण मुलगी सोबत असतांना थोडा चेहरा खुलायला काय हरकत आहे!
नवरीसोबत चालणाऱ्या करवल्या किती गंभीर हो?
पंगतीचे वाढपे किती वैतागून वाढ करतात.खाणारे लाजतात.
       विनोदाची पुस्तके विकणारा बुकस्टालवाला देखील गंभीर असतो.गुलाबजामून पाकात टाकणारा स्वयंपाकी सश्रम कारावास झाल्यासारखा गंभीर असतो.हे गांभीर्य येते कोठून आणि कशासाठी?
   ‌स्विट मार्ट मधला विक्रेता कढी प्याल्यासारखा
चेहरा करुन बसलेला असतो.एखाद्या आफिसमध्ये गेले की खुर्चीवर एखाद्या पुतळ्यासारखा तो अधिकारी बसलेला असतो.थोडा हसरा चेहरा केला तर काही नुकसान होणार आहे का? 
  ‌‌ अधिकारी प्रसन्न असो नये असा शासनाचा काही फतवा आहे का?थोडे हसमुख असले तर काही बिघडणार आहे का? कुणी अधिकारी म्हणणार नाही, अधिकारी खडूस चेहऱ्याचा असला तरच योग्य असतो का?इतका पगार, नोकर,गाडी ,मान मग घोडे अडते कुठे? थोडे हसायला शिकलात तर आपण देखील माणसं आहोत हे लोकांना पटेल.
    बसमध्ये तिकिट फाडणारा तो कंडक्टर ,त्यालागंभीर असण्याची काय गरज? गाडी सरकारी,बसणारे लोक,स्वत: फूकट प्रवास पुन्हा लोक साहेब म्हणतात , तरीही हा गंभीरच.
      एखाद्या शाळेचा हेडमास्तर किंवा प्राचार्य किती आनंदीअसायला पाहिजे.निरागस बालकांना सोबत
रहाण्याचे अहोभाग्य लाभलेले हे लोक.प्रसन्नतेचे महत्त्व
इतरांना सांगणारे लोक परंतु एखाद्या जेलर सारखे त्या खुर्चीवर मुद्रा करुन बसलेले असतात.एकवेळ पोलिस स्टेशन मध्ये मोकळं वाटेल पण हेडमास्तर किंवा प्राचार्य यांच्या केबिनमध्ये कायम तणाव! जसे एस.एस.कोडमध्ये हसण्यावर बंदी आहे.
   जिकडे तिकडे ही पडक्या , गंभीर चेहऱ्याची
माणसे बघितली की माणसांपासून दूर रहावे
वाटते.घरी एखादा उत्सव असतो तेव्हा तरी
गंभीर राहू नये.तोंडात पेढा भरला तरी शेण
खाल्ल्यासारखा चेहरा करतात.
   उच्च शिक्षित लोक तर जाणूनबुजून गंभीर राहतात.जाड भिंगाचा चष्मा,पडलेले टक्कल , गंभीरपणाचा आव आणतात.थोडे हसरे, खेळकर, मनमोकळे असायला काय हरकत आहे.मुलगी बघायला गेले की इतके गंभीर वातावरण बनवतात.अधिकारी पदाची मुलाखत घेतल्यासम गंभीर होतात.
नोटांचे बंडल मोजणारे सेठ लोक तरी हसायला हवेत.ते तर नोटा अशा मोजतात, जसे रद्दी जोडत आहेत. गुंड तर कधीच हसत नाही.हसरा चेहरा असेल तर लोक भिणार नाहीत,असे त्यांना वाटते.
    अंगरक्षक तर इतके गंभीर असतात, माणसे
आहेत की पुतळे तेच कळत नाही.दाखवायला आणलेली मुलगी तर इतकी गंभीर असते की जसे कापायला आणले.आनंदाच्या सोहळ्यात माणसे इतकी गंभीर असतात की ती शोकसभा वाटायला लागते.
      पोलिस खात्यातील लोक तर गंभीरतेचा कळस आहे.अकारण डाफरल्यासारखे बघतात.अनोळखी स्त्रिया तर मुद्दाम गंभीर चेहरा करतात.पाचशे किलोमीटर सोबत एकासीटवर बसणारी माणसे एकमेकांशी बोलत नाहीत.बोलावं असे त्यांचे चेहरे नाहीत.
घरी स्वयंपाक करणाऱ्या बायका देखील हसऱ्या चेहऱ्याने स्वयंपाक करत नाही, कामवाली बाईसारखा गंभीर चेहरा असतो.
  ‌‌आनंदी आणि उत्साही मनुष्य बावळट असतो
असा काही समज पसरलेला आहे.गंभीरता हाएक रोग आहे, परंतु तो सर्वांना असल्याने तोआरोग्य वाटू लागला आहे.सगळीच माणसे एस.बी.आय मधल्या कर्मचाऱ्यांसारखी गंभीर दिसत आहेत.
   ‌फूले विकणारा जर प्रफुल्लित रहात नसेल तर धंदा खोटाच.सोन्याचे दुकानदार वीट भट्टीवर
असल्यासारखे वागतात.सोने चमकते परंतु
दुकानदार नाही.थोडे सैल व्हा,ताठरपणा कमी करा,भेटणाऱ्यामाणसांशी मोकळेपणाने बोला.तुम्ही देखील मनुष्य आहात हे दाखवून द्या.
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.