अडवणूक

                                       अडवणूक.                  - ना.रा.खराद


हल्ली जिथे तिथे अडवणूकीचे प्रकार बघायला मिळतात.कधी चिरीमिरीसाठी तर कधी नाहक!
अडवणूकीमुळे खूप मानसिक छळ होतो , हे लक्षात घेतले जात नाही.
अडवणूकीचे सर्वात जास्त प्रकार सरकारी कार्यालयात दिसून येतात.सनदशीर कामे देखील अडवले जातात,एखादी खोटी सबब सांगून अडवणूक केली जाते.सरकारी कामासाठी मारावे लागणारे हेलपाटे बघता दिरंगाई किती खोलवर रुजलेली आहे ते लक्षात येते."रोजचेच मढे" किंवा " आम्हाला काय तेवढेच काम आहे का?" वगैरे शेरेबाजी केली जाते.
   अडवणूकीची वृत्ती असलेली माणसे सर्वत्र कमी-जास्त प्रमाणात आढळतात.परंतू असा मनुष्य जर मोठ्या अधिकारावर असला की त्याचा सोस जास्त प्रमाणात आढळतो.
अडवणूक एक प्रकारचे शोषण, छळवणूक व पिळवणूक आहे.गरजवंताना वेठीस धरणे कितपत योग्य आहे? 
सहज होणारे काम खुप ठिकाणी अडवले जाते.एखादी थातूरमातूर सबब सांगितली जाते.जिथे
तिथे अडवणूक.मंदिरात देखील हे प्रकार दिसून येतात.दुकानदार,छोटे विक्रेते, विविध व्यावसायिक अडवणूक करतात आणि आपले इच्छित साध्य करतात.
अकारण अडवणूकीचा प्रकार फार भयंकर असतो.सहनशीलतेचा अंत संपला की कसा मानसिक उद्रेक होतो हे आपण जाणतोच. अरेरावी, टाळाटाळ, बनवाबनवी जसे मानवी चरित्र बनले आहे.आपल्या अडवणूकीमुळे समोरच्या व्यक्तीला जाच , वेदना होत आहेत, हे निर्ढावलेले लोक जाणत नाहीत.कित्येक ठिकाणी फक्त पैशांसाठी अडवणूक केली जाते.
  कामात त्रुटी काढायची आणि पैसे उकळायचे असा धंदा सर्रास सुरू असतो.साधी दिसणारी
माणसे डाकूंना लाजवतील इतके भीषण असतात.बंदूक काय आणि पेन काय कशासाठी
चालवतो यावर सगळे अवलंबून आहे.धाक जितका बंदूकीचा तितकाच तो नियमांचा, कायद्याचा दाखवला जातो.अडवणूकीसाठी कायद्याचा आधार घेतला जातो.अडवणूक हा अमानवीय प्रकार आहे.निष्ठूरता हे
त्याचे कारण आहे.पेनाने वार करणारे हत्यारे कुणालाही जुमानत नाहीत.दिवसाढवळ्या लोकांची अडवणूक करणारे अधिकारी, कर्मचारी व सर्वच व्यावसायिक डाकू पेक्षाही भयंकर आहेत.कायद्याचा हवा तसा वापर करायचा आणि लूट करायची हा या नराधमांचा उद्योग असतो, पुन्हा उजळमाथ्याने वावरायचे ते
वेगळेच!आपण मनुष्य आहोत असे जर वाटत असेल तर अडवणूकीचे प्रकार थांबवले पाहिजेत ,नसता
कर्माचे फळ भोगावे लागते हे कधीच विसरू नये.
        

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.