आयुष्याची प्रश्नपत्रिका

           आयुष्याची प्रश्नपत्रिका


मानवी जीवन म्हणजे प्रश्नांची मालिकाच आहे.प्रश्न सोडवत राहणे म्हणजे जीवन!
जीवनाची प्रश्नपत्रिका जीवनभर सोडविण्यासाठी असते.कित्येक उत्तरे चुकत असतात,ती पुन्हा सोडवण्यासाठी उभी असतात.काही प्रश्न काही केल्या सुटत नसतात.कधी एकाच प्रश्नांची अनेक उत्तरे असतात,तर कधी अनेक प्रश्नांचे एकच उत्तर असते.जीवनाची प्रश्नपत्रिका सर्वांना सोडवावी लागते.काहींचे अनेक प्रश्न सोडवायचे राहून जातात.काही प्रश्न इतरांनी
निर्माण केलेले असतात,तर काही काही स्वतःच.जिकडे तिकडे प्रश्नांचा भडीमार केला जातो.काही प्रश्न साधे सरळ असतात,तर काही अत्यंत गुंतागुंतीची असतात.काही प्रश्न बोलून दाखवले जातात,तर कित्येक मनात घुटमळत राहतात.कुणीकुणी तर सतत प्रश्न निर्माण करुन ठेवतात.कुणाला पोटाचा प्रश्न असतो.नोकरीसाठी प्रश्नांची उत्तरे लिहावी लागतात,तोंडी द्यावी लागतात.माणसे माणसांना कायम काही तरी प्रश्न विचारत असतात.कधी काय उत्तर द्यावे हा प्रश्न पडतो,तर कधी काय प्रश्न करावा हा प्रश्न निर्माण होतो.
प्रत्येकाला आपल्या प्रश्नांची उत्तरे हवी असतात.काही प्रश्न अचानक समोर येतात.त्याची उत्तरे तयार नसतात, ते तात्काळ सोडवायचे असतात.
अनेक प्रश्न व्यर्थ किंवा चूकीचे असतात, मूर्खपणाचे असतात.त्यांची उत्तरे तशीच मिळतात.प्रत्येक प्रश्नांचे उत्तर असतेच असे नाही, नसेल तर नाही, हे त्याचे उत्तर असते.
सर्व परीक्षा प्रश्न असतात, म्हणूनच त्यास
प्रश्नपत्रिका म्हंटले जाते.न्यायालयात आरोपींना प्रश्न विचारले जातात.चौकशीसाठी पोलिस प्रश्न विचारतात.उत्तरे प्रश्नांमुळे मिळतात.डाक्टर
रोग्याला प्रश्न विचारतो.जो तो जिथे तिथे प्रश्नांच्या माध्यमातून उत्तरे मिळवत असतो.
बहुतेक संवाद हे प्रश्न स्वरूपातच असतात.
काही प्रश्न निरुत्तरीत करतात,तर काही प्रश्न अजून प्रश्न निर्माण करतात.
बालके जिज्ञासूपणातून प्रश्न करतात.अडचण, समस्या किंवा संकट एक मूक प्रश्नच असतो.कित्येक प्रश्न आपणच समजून घ्यायचे असतात आणि उत्तरे देखील आपणास शोधावी लागतात.काही प्रश्न कायम भेडसावत असतात,तर काहींची उत्तरेच नसतात.
प्रश्न जसे निर्माण झालेले असतात,तसे ते आपण निर्माण केलेलीही असतात.
प्रश्न समजून घेता आले पाहिजे.प्रश्नांना तोंड
देता आले पाहिजे.प्रश्न पडले पाहिजेत.प्रश्न
सोडवत राहिले पाहिजे.मृत्युचा पूर्ण विराम लागेपर्यंत जीवनाची प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
     
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.