- ना.रा.खराद
जन्माला आलेल्या प्रत्येकाला आपल्या पद्धतीने जगण्याचे स्वातंत्र्य असते, आणि ते असावयास हवे, परंतु नानाविध नियम,बंधन, संस्कार या जोखडात तो अडकतो.प्रत्येक पिंड हा भिन्न असतो,त्याची ही भिन्नता विचारात न घेता कोणतीही गोष्ट सरसकटपणे लागू करण्याचा सामाजिक अट्टाहास त्या व्यक्तीचे जीवन व्यक्तीमत्वच मारुन टाकतो,
कारण सगळे नियम, आचारसंहिता अगोदरच तयार असते, स्वतःला जगायचे तसे जर जगता येत नसेल तर हे जीवन कसले,हा तर जगण्याचा निव्वळ फार्स आहे, औपचारिकता आहे
हजारों वर्षांच्या जून्या ग्रंथांची पारायणे, शेकडो वर्षांचे आदर्श आणि रोजचे नवीन नियम या चक्रव्यूहात माणूस इतका भरडला जातो की त्याचे जगणे, गर्दीतला एक माणूस, एवढेच उरते.
स्वातंत्र्य प्रत्येकाला हवे आहे, परंतु प्रत्येक जण इतरांचे स्वातंत्र्य नाकारतो.देश स्वातंत्र्य आहे, म्हणजे आपण स्वातंत्र्य आहोत,हा देखील एक भ्रम आहे.
आपण पारतंत्र्याच्या इतक्या चौकटी निर्माण केल्या आहेत की कोणत्या तरी चौकटीत अटकल्याविना आपले जगणे असतं नाही, परंतु हे जगणे, जगणे नसून,आपला आत्माच मारुन टाकणे आहे.हे जग कुणाचीही खाजगी मालमत्ता नाही, तरीही इथे किती मालक आहोत, प्रत्येक पाऊलावर तुम्हाला हटकणारे लोक आहेत, सूचना करणारे किंवा आदेश देणारे आहेत, हे खरे पारतंत्र्य आहे.आयुष्यभर इतरांचे ऐकत जगायचे, हे कसले जगणे, जगण्यातले हे अडथळे आहेत.
लहान बालकांना घरातील मोठी माणसे झोपू देत नाहीत.वेगवेगळ्या सबबीखाली त्यास उठवले जाते, परंतु त्याचा झोपण्याचा मूलभूत हक्क आपण हिरावून घेत आहोत, हे लक्षात घेत नाही.पुढे शिक्षण नावाचे पारतंत्र्य हजर असते,त्याची शाळा निवडली जाते आणि एकदा शाळेत टाकला की संपूर्ण बालपण त्या कोंडवाड्यात, गुरुजी नावाच्या पारतंत्र्याच्या पाईकाच्या हाताखाली जाते.स्वातंत्र्याच्या कविता पाठ करुन घेतल्या जातात, स्वातंत्र्य हिरावून!
अर्ध्या रात्री उठून मला रात्र कशी दिसते,आकाश दिसते हे बघावे वाटले,तर घरातील मोठी माणसे तेवढेही स्वातंत्र्य देत नाही.हा काय वेडेपणा, झोप, बाहेर खुप अंधार आहे,असे सुनावले जाते आणि ते बालक तसेच पडून राहते,त्याचा जगण्याचा मौलिक अधिकार आणि स्वातंत्र्य आपण कसे हिरावून घेत आहोत, कुणाच्या लक्षातही येत नाही.
धर्म,जात,भाषा, कर्मकांड हे तर पारतंत्र्याचे मुख्य स्रोत आहेत.संस्काराच्या आणि धर्माच्या नावाने जे काही केले जाते, किंवा करावे लागते, अथवा करुन घेतले जाते,ते तर संपूर्ण पारतंत्र्य आहे.तिथे आपले काही नसते, एखाद्या वस्तूप्रमाणे इतर कुणीतरी किंवा समाज आपणास संचालित करत असतो.लोकांसारखे वागणे, लोक म्हणतात तसे वागणे किंवा लोकांसाठी वागणे हे जीवन असू शकत नाही.जीवन एक वेगळी बाब आहे, त्यामध्ये इतरांचा हस्तक्षेप असता कामा नये,बापाचे खातो म्हणून बापाचे ऐकायचे.नोकरीच्या ठिकाणी मालकाचे ऐकायचे.समाजात समाजाचे ऐकायचे, फक्त इतरांच्या सूचनेनुसार जगणे हे जगणे नव्हे,मन आणि आत्मा मारुन फक्त शरीर जिवंत ठेवणे म्हणजे जगणे नव्हे.
स्वातंत्र्याचे ध्वज फडकवत असताना, स्वातंत्र्य म्हणजे काय, हा विचार कधी मनात आला का? देश स्वातंत्र्य आहे, परंतु आपण स्वातंत्र्य आहे का,आपले स्वातंत्र्य म्हणजे काय हे समजण्यासाठी,आपण किती बंधनात जगतो, हे विचारात घ्यायला हवे.ही बंधनं लक्षात येत नाहीत,कारण ती आपल्या नकळत अंगवळणी पडली आहेत, किंवा आपण इतके अज्ञानी किंवा पारतंत्र्यात जगण्याचे पाईक झालो आहोत की स्वातंत्र्य आपणास पचणार नाही.
आपले जगणे हे आपले जगणे असले पाहिजे,तेच अंगिकारले पाहिजे.इतरांचा कमीतकमी हस्तक्षेप आपल्या व्यक्तिगत स्वातंत्र्यावर असला पाहिजे.आदर्श हे देखील पारतंत्र्यास खतपाणी घालतात.आदर्श थोपविले जातात, थोपविले गेलेले आदर्श म्हणजे पारतंत्र्य.
सर्व प्रकारचे नियम मानवी कुचंबणा आहे.सतत कुणाच्या तरी दबावाखाली जगणे हे पारतंत्र्य आहे.फक्त इतरांच्या अपेक्षा पूर्ण करणे, कर्तव्य पार पाडणे हे पारतंत्र्य आहे.एक उंदीर देखील आपल्या मस्तीत जगतो,त्याच्यावर
कुठलेही बंधन नसते, मात्र आपण हजारो बंधनात असे काही अडकले जातो की त्यामधून सुटकाच नाही.हे न
दिसणारे पिंजरे समाजाने निर्माण करून ठेवले आहे.त्यातून बाहेर पडण्याची धडपड सुरू असते, परंतु आपल्या सारखीच सर्व माणसे त्यामध्ये तगमगत आहेत,मोकळा श्वास घेण्यासाठी!