- ना.रा.खराद
आपणास जन्मासोबत जे लाभलेले असते ते उपजत.आपले शरीर हे आपणास उपजत लाभलेले असते,अवयवांची आपण निवड केलेली नसते,लिंग देखील उपजत असते.
आई वडील व इतर नाती जन्माबरोबरच लाभतात.आपण कसे आहोत आणि आपले काय आहे याची आपण पडताळणी करतो.
आपले काय असावे यापेक्षा काय आहे ही
वास्तविकता स्विकारावी लागते.आपले शरीर
उपजत लाभलेले असल्याने त्याचा गुणदोष
आपणास लाभत नाही.आपला जन्म कोणत्या देशात झाला हे आपणास फक्त कळू शकते.ज्या कुटुंबात जन्म झाला,त्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती आपणास लागू होते.
एखाद्या अपघाताप्रमाणे किंवा सुनियोजित कटाप्रमाणे सर्व घडते.श्रीमंत घरात जन्मलेली मुले किती थाटात जगतात.याउलट काही मुलांना जन्माला येताच उपासमारीची वेळ येते.चमचाभर दूध देखील नसते, येथूनच भाग्य वगैरे शब्दाचा उदय होतो.एक अनामिक आस्था उदयास येते.त्यास ईश्वर हे नाव देऊन आपण मोकळे होतो.सर्व घडामोडीला देवाला जवाबदार धरले जाते.
देवाच्या नावाने सर्व काही चालते. कोकिळेचा गळा उपजत आहे.बगळा आणि कावळा उपजतच रंग घेऊन जन्मलले असतात.गायन क्लास न लावता कोकिळा
गाते.चांगले गायले की कोकिळेचा कंठ आपण म्हणतो.सर्व प्राण्यांना ,पक्षांना ,कीड्यांना उपजत खुप काही लाभलेले आहे.जन्मासोबत लाभलेले
गुण हे जन्माची शिदोरी ठरतात मात्र अनेक दोष अनेक पिढ्या जात नाहीत.
कुठल्याही प्रशिक्षणाशिवाय कोळी जाळे विणतो.पक्षी आपले घरटे तयार करतो.
अंघोळीशिवाय प्राणी स्वच्छ असतात. त्यांची
दूर्गंधी येत नाही.मानव रोज अंघोळ करतो,साबण वापरतो अजून बरेच काही तरी..असो.
वाघाचे जबडे उपजत आहे.नैसर्गिकरित्या वाढ होते.केस,नखे वाढू लागतात.उपजत गुण
दोष नष्ट करता येत नाहीत.वारसाने फक्त संपत्ती लाभते असे नाही.स्वभाव आणि वृत्ती देखील वारसाने लाभते.सौंदर्य कुठेही जन्माला येते,त्यास कशाचीही आडकाठी नसते.ज्ञान आणि विद्वता कुठेही जन्म घेऊ शकते.वाळीत टाकले तरी तो ज्ञानेश्वर असतो.
हीनवले तरी तो शिवछत्रपती असतो आणि उपेक्षा केली तरी जो आपली बुद्धिमत्ता सिद्ध करतो तो महामानव ठरतो.
उपजत लाभलेले गुण जीवनाचे सोनं करतात तर दोष धूळीस मिळवतात.जन्माने काटेरी बाभूळ असली की तिच्या नशीबी कुऱ्हाड आहे.गुलाब एखाद्या सुंदरीच्या डोक्यावर जाऊन बसते.
जन्माने कुणी शुर असतो.कुणी लंपट ,कुणी भंकस असतो.जन्माची ही सोबत मरणापर्यंत
असते.नटलेल्या सौंदर्यांपेक्षा उपजत सौंदर्य उठावदार असते.घोड्याला पळण्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे नसते.उसने अवसान आणून उडी लांब मारता येत नसते.आपल्या उपजत गुण दोषांची आपणास जाणीव हवी.
गुणांचा गाजावाजा करत असतांनाच ,आपले
दोषही आपण जगासमोर मांडले पाहिजेत.हा
प्रामाणिकपणा राखता आला तरी खुप झाले!