कारण की...
- ना.रा.खराद
या जगात कारणाशिवाय काही घडते की नाही,असा प्रश्न पडतो.प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक मनुष्य या कारणांचा शोध घेत असतो.जो तो ज्याचे त्याची कारणे शोधत असतो.शाळेत असतांना ' कारणे लिहा.'असा प्रश्न असायचा.गैरहजर राहिले की शिक्षक कारण विचारायचे.पत्र लिहिले की पत्र लिहिण्यास कारण की.. पहिलेच वाक्य असते.
माणसाचे मन सतत या कारणांचा शोध घेत असते.त्याशिवाय त्याचे समाधान होत नाही.मग ते कारण नसले तरी तो तसे समजून स्वतः ची समजूत काढतो.एखादा पाहुणा घरी आला तरी आपण त्यास आज कशी आठवण झाली बुवा आमची,असे विचारल्याशिवाय राहत नाही.कारण माहिती झाल्याविना चैन पडत नाही.
एखाद्या गल्लीमध्ये नवीन मनुष्य दिसला की,कोण असेल, कुणाकडे आला असेल,का आला असेल असे कितीतरी प्रश्न नकळत आपणास पडलेले असतात.त्याची उत्तरे आपणास का हवी असतात याचे चिंतन करणे गरजेचे आहे.
कुणी गोड बोलले तर लगेच मन म्हणते, काय कारण असेल.जो तो या कारणांमुळे पछाडलेला आहे.प्रत्येकजन ,'तो माझ्याशी असा का वागतो.' वडील मुलांना," अरे,तु असे का वागतो?" असा प्रश्न करतो.
सर्व शोध हे कारणांचा शोध घेतल्यामुळे लागलेले आहेत.वैद्य आजाराचे कारण सांगतो , किंवा त्यास ते सांगावे लागते.नापास झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे
कारण सांगावे लागते.आपणास पदोपदी
कारणे सांगावी लागतात.नोकरीच्या ठिकाणी उशीर झाल्याचे कारण सांगावे लागते.
दूधवाला थोडा उशीरा आला की लगेच कारण विचारले जाते.कारणामध्ये सर्व काही दडलेले असते.त्यास सबब देखील म्हणतात.एखाद्या लग्नाला किंवा वाढदिवसाच्या कार्यक्रमात नाही जाऊ शकलो की कारण विचारले जाते किंवा सांगितले जाते.
कुणी रडत असले की का रडतो? विचारणा होते.तिकडे का बघतो, इकडे का बघतो हे तर रोजचेच.इथे काय करतो, तिथे काय करतो नित्याचेच.आपल्या प्रत्येक कृतीची कारणे विचारली जातात, किमान मनात तसे प्रश्न घोळत राहतात.भांडणे झाली की अगोदर त्याचे कारण विचारले जाते.आमच्या मुलाला का मारले,पालक विचारतात.तुमचा मुलगा शाळेत का येत नाही, शिक्षक कारण विचारतात.
कारण कळेपर्यंत अस्वस्थता कायम असते.काही नसताना देखील कारणांचा शोध घेणे सुरू असते.त्यास विनाकारण संबोधले जाते.आपणास खरेच इतक्या कारणांचा शोध घेणे गरजेचे असते का, आणि नसेल तर आपण आपला किती वेळ वाया घालतो. कुणाकडे दोन पैसे जास्त दिसले की कोठून आले असतील? कशाला
शोध घेतो? तुझ्या का पोटात दुखते.
प्रश्नांचा भडीमार करणारे लोक समुद्रात बुडवले पाहिजेत.भाराभर प्रश्न विचारुन भंडावून सोडतात.ज्या गोष्टींचे आपणास घेणेदेणे नाही,कशाला कारणे शोधत बसायचे.
रात्री कुत्री भूंकू लागली की कारण शोधले जाते,ते गरजेचे आहे.परंतू अमूक तमूक ठिकाणी काय करतो,शोध गरजेचा नाही.विनाकारण हे देखील कारण असते.सर्व शास्त्रज्ञ सतत कारणांचा शोध घेतात,कारण सापडल्या शिवाय पुढचा प्रवास होत नाही.युद्ध असो वा अपघात अगोदर कारण तपासले जाते.मनुष्य जे बोलतो किंवा कृत्य करतो त्यामागे काहीतरी कारण असते.सृष्टीची प्रत्येक हालचाल कारणांमुळे असते.कुणी काहीही करो, त्यामागे कारण असतेच.अनेकवेळा खरे कारण लपवले जाते, तरीही खोटे कारण तरी सांगावेच लागते.कुणी रडला किंवा हसला तरी त्याचे कारण विचारले किंवा सांगितले जाते, शोधले जाते.सर्व प्रश्न म्हणजे कारण आहे.कारण हे उत्तर आहे.
या जगात कारणाशिवाय काही घडते नसले तरी कारणाशिवाय देखील खूप काही घडते.
आपण किती खोलवर जायचे, ठरवायला पाहिजे.कुणाचे काहीही कारण असले तरी आपण त्यामध्ये दखल देण्याचे कारण नसते.कारणे विनाकारण शोधू नये एवढेच!