सासर आणि माहेर
- ना.रा.खराद
सासरच्या उंबरठ्यावर मी पहिले पाऊल टाकले,तेव्हाच मला भेदरल्यासारखे झाले. एरवी माहेरच्या घरी खिंदळणारी मी,दरवाजातूनच आईच्या नावाने ओरडायचे,"आई मला लवकर जेवायला दे गं,खुप.भूक लागली."आणि आई प्रेमळ रागाने मला गरम गरम जेवायला द्यायची."
इथे मात्र मी अचानक गंभीर बनले होते. मनात भावनांचे काहूर होते.कालपर्यंतची माहेरची दिनचर्या आणि आज अचानक असे स्वतः ला बदलविणे किती कठीण असते सर्व....! पण जगाची रित आहे, निभावी लागणार होती.मायेची माणसे सोडून एका अनोळखी ठिकाणी ..नको..नको मला हा विवाह. .
पुन्हा सावरले."अरे प्रत्येक मुलीला हाच अनुभव येतो,पण मागील आयुष्य विसरायचं असतं."मी स्वतः ला समजावलं.
हुंड्याची पै न पै वसुल करणारा सासरा,भांडी
आणि वस्तूंचा हिशोब मांडणारी सासू, आणि
तारुण्याकडे आसुसलेल्या नजरेने बघणारा नवरा ,सगळे किळसवाणे वाटत होते.
माहेरी असतांना सर्व गोष्टींवर कसा हक्क वाटायचा.कित्येक वेळा आई बाबांचे मी ऐकत
नसे.उशिरापर्यंत झोपायचे.आई उठवायची तेव्हा बाबा तिला रागवायचे,"झोपू दे लेकराला."खरे सांगू ,त्यावेळी मी जागे असायचे.पण बाबाचे गोड शब्द कानावर पडले की अजून झोपायचे.बाबा अलगद डोक्यावर थाप मारायचे तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रू दाटायचे.परंतू याबद्दल मी बाबांना कधीच सांगितले नाही.
आता मी सासरी होते. आता इथे लाड करणारे कुणीही नव्हते. माहेरी आई मला चहा आणून द्यायची.आता मी सर्वांना बसल्या जागी चहा देणार होते. धुणी ,भांडी,स्वयंपाक हे सर्व आता मला करावे लागणार होते.
कालपर्यंत माझे बाबा मला 'छकुली, चिमणी'
म्हणून हाक मारायचे.आज अचानक मी मोठी
झाली होते. माहेरी पहाटे उठून सडा रांगोळी
करणारी आई ,मला कधी कळलीच नाही. उशिरापर्यंत झोपण्याचा हक्क मी गमावला आहे. वयाची अठरा वीस वर्षे किती आनंदात गेली.आपण मोठे झालो हे आता कळू लागले.
मी सासू सासऱ्यात आई वडील शोधू लागले.सासुला आई आणि सासऱ्याला बाबा
म्हणू लागले.खरे सांगते ,आई बाबा हे शब्द ,माझ्यासाठी अमूल्य ठेवा होते.
जेव्हा कधी मी माहेरी जाईल तेव्हा माझ्या आईबाबांना भरभरून मीठी मारेल.
मी सासरला फक्त शरीराने आहे. माझे मन
कायम माहेरी रमलेले असते. माझे आई बाबा
हेच माझे खरे जीवन आहे. बाकी फक्त दुनियादारी!