हा खेळ पाहुण्यांचा

                                            हा खेळ पाहुण्यांचा
                                                               - ना.रा.खराद
पाहुणे, प्रत्येकाला विनासायास लाभलेले घबाड असते, त्यामध्ये जवळचे,लांबचे असे बरेच काही असते,
आवडते, नावडते असतात.आपल्या प्रत्येक सुख दुःखात हजेरी लावणारे किंवा आपल्या सुख दुःखाला कारणीभूत असणारे पाहुणे असतात.काही नाती नाजूक तर काही नावापुरती असतात.आपल्या जीवनातील बराच वेळ हा पाहुण्यांच्या गराड्यात जातो,या विश्वातील पाहुणे हे एक आपले वेगळे विश्व असते.पाहुणे म्हणून पाहुण्यांची मदत केली आणि घेतली जाते, पाहुणे म्हणून पाहुणचार होतो, आदरतिथ्य होते.
 पाहुणे किंवा नातेवाईक यामुळे अनेक गोष्टींत बदल होतो.आधी विचार पाहुण्यांचा होतो.पाहुणे आपुलकीचे असतात, नाते अधिक घट्ट करण्यासाठी पाहुण्यांवर उपकार केले जातात.पाहुणे विश्वसनीय असतात किंवा वाटतात.पाहुणे म्हणजे जवळची माणसे असतात.आपल्या बऱ्या वाईट गोष्टीची चर्चा पाहुण्यांमध्ये असते.पाहुण्यांमध्ये किंमत असावी लागते.पाहुणे अनेक तऱ्हेची असतात,त्या सर्वांना सांभाळून घेत, आगेकूच करावी लागते.आर्थिक दृष्टीने सशक्त पाहुणे आपले एक वेगळे वजन बाळगून असतात.गरीब पाहुणे काहीसे उपेक्षित व नेहमी तक्रार करत असतात किंवा आपण स्वाभिमानी असल्याचे ठनकाऊन सांगत असतात.
 अनेक पाहुणे हे सर्व पाहुण्यांच्या उधारीवर दिवस काढतात, उसनवारीच्या पैशांवर आपली गुजराण करतात, काही पाहुणे नको त्या नातेवाईकांकडे बस्तान मांडतात, स्वाभिमान नसलेले लाचार पाहुणे यामध्ये मोडतात.कुणी आपल्या नातेवाईकांचे अनाठायी गुणगान गातात, त्यांच्या संपत्तीवर भाष्य करतात.आपले
पाहुणे कोणकोणत्या मोठ्या पदांवर आहेत,यांची माहिती देतात.
 काही पाहुणे कायम कोणत्यातरी पाहुण्यांच्या घरी असतात,अशा पाहुण्यांना पाहुणे कंटाळून जातात.
पाहुण्यांना कधीही घरी येण्याचा अधिकार असतो, तुम्ही का आलात हा प्रश्न करायचा नसतो.नुसती आठवण आली, भेटावे वाटले तरी पुरेसे असते.महत्त्वाच्या पदांवरील पाहुण्यांचा मोठा आधार असतो.काही अडले नडले की मदत घेतली जाते, नुसते नाव सांगितले तरी काम होते.राजकारणात पाहुण्यांची मते निर्णायक असतात.पाहुण्यांना नाराज ठेवणे हिताचे नसते.घरचा शत्रू कधीच हलक्यात घेऊ नये.
 राजकारणात तर अनेक विरोध पाहुणे असतात.इतिहासात तर अनेक लढाया पाहुण्यांमध्ये झालेल्या आहेत.पाहुण्यांमध्ये सौख्य असतेच असे नाही.अनेक पाहुणे आपले शत्रू असतात.पाहुण्यांमध्ये देखील गटतट असतात.बरीच उलथापालथ पाहुण्यांमुळे होते.काही पाहुणे कायम मदतीला धावतात.कित्येक फक्त सुखाचे सोबती असतात, कित्येक नावापुरतीच असतात.पाहुण्यात आवडते नावडते असतात.
 कोणत्याही संस्थेत पाहुण्यांची एक साखळी असते,सर्व काही सांभाळून घेतले जाते,त्यांचे हित जोपासले जाते,आपलेपणा असतो.
    एकंदरीत आपले जीवन पाहुणे या घटकांभोवती फिरत असते.
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.