- ना.रा.खराद
हे जग मानवी कष्टाने समृद्ध झालेले आहे.गरजेच्या सर्व वस्तू कुणाच्या तरी कष्टाचे फलित आहे.मानवामध्ये कष्ट करण्याची अपारक्षमता आहे, कष्टाने शरीर बळकट होते परंतु त्यासाठी कष्टाचा मोबदलाही पुरेसा असला पाहिजे.जितक्या म्हणून ऐतिहासिक वास्तू असतील त्या सर्व कष्टकऱ्यांनी उभ्या केल्या आहेत,नाव मात्र त्यांचे होत नाही.ज्या रस्त्यावरून श्रीमंतांच्या गाड्या धावतात तो रस्ता कष्टकरी लोकांनी निर्माण केलेला असतो.सर्व साधने, सुविधा कष्टकरी लोकांमुळे आहे.
कष्टकरी समाज कायम विवंचनेत असतो.शिकलेले लोक कायम या वर्गाचे शोषण करत आलेले आहेत.त्यांच्या किमान गरजा देखील भागू नये हि शोकांतिकाच मानावी लागेल.जो उच्चभ्रू वर्ग त्यांच्या कष्टावर सुखवस्तू
जीवन जगतो ,तोच वर्ग त्यांना विसरतो हे अमानवीय आहे.त्यास फूकटचे नको ,त्यांचे हक्काचे तरी द्या.कित्येक ठिकाणी राबणारे हाततुटपुंज्या पगारावर राबतात, ज्यामध्ये त्यांची उपजिविका पण भागत नाही हे आपण कसेबघू शकतो?
समाजातील मुठभर लोक अति श्रीमंत आहेत,
त्यांच्या सेवेसाठी हा कष्टकरी समाज आहे का?
कशाच्या बळावर हे शोषण चालते हे समजून
घेणे गरजेचे आहे.जो उत्पादक घटक आहे तोच
जर अर्धपोटी रहात असेल तर कधी साधणार
आहोत आपण आर्थिक समानता.कष्टकरी लोकांची फार दयनीय अवस्था आहे, त्यांना समजून घेणे,त्यांचे शोषण न करणे,कामाचा योग्य मोबदला दिला तरी पुष्कळ झाले.
कष्टकरी समाज हा उपेक्षित, वंचित आहे.त्याचे
दु:ख समजून घेण्याची कुणाला गरज वाटत नाही.घाम गाळून पैसा कमावणे,रक्ताचे पाणी करणे याशिवाय पर्याय नसतो.जनावरांपेक्षा जास्त कष्ट माणसाला करावे लागणे लाजिरवाणे आहे.शेतात राबणारे शेतकरी, शेतमजूर, विविध कारखान्यात काम करणारे कामगार किती कष्ट
उपसतात हे डोळ्याने बघितल्याशिवाय कळत
नाही, आपणास शेकडो सुविधा पुरविणारा हा वर्ग किती दिवस खितपत पडणार? त्यांना कुणी
वाली नाही का?
समाजातील अति श्रीमंत लोकांनी उदारमनाने
या घटकांचा विचार केला पाहिजे.शिक्षित लोकांनी त्यांची व्यथा समजून घेतली पाहिजे, किमान त्यांचा छळ होणार नाही,ह्याची दक्षता घेतली पाहिजे.कष्टकरी ,मग तो कोणत्याही प्रकारचे कष्ट करतअसेल तर त्यास त्याच्या घामाचा भरपूर मोबदला मिळाला पाहिजे.जेणेकरुन त्यांच्या गरजा भागतिल.कष्टकरी जर उपासी असेल तर
हा समाज अनैतिक ठरतो, कृतघ्न ठरतो.कष्टकऱ्यांना कमी लेखण्याचे पाप तर करुच नये.त्याचे मळलेले आणि फाटलेले कपडे ही आपली चूक आहे.त्या बिचाऱ्यांची काय चूक?
कष्टकरी लोकांकडे होणारे दुर्लक्ष अक्षम्य आहे.कधीतरी त्याचा सोस समाजाला सोसावा लागणार आहे.प्रत्येक सधन माणसाने कष्टकरी लोकांच्या बाबतीत उदार असले पाहिजे.योग्यवेळी योग्य मोबदला देऊन त्यांच्या ही चेहऱ्यावर जर आपण हास्य फूलवू शकलो तरच आपण सुसंस्कृत आहोत.