संयम

                     संयम
                        - ना.रा.खराद
संयम हा फार मोठा मानवी गुण आहे, उताविळपणा थांबवण्यासाठी संयम आवश्यक असतो.संयमामुळे अनेक प्रश्न सुटतात आणि अनेक निर्माण होणे टळते.
संयमीपणा कधी वाया जात नाही.संयम एक प्रकारचा धीर असतो.संयमी व्यक्तीच्या ठिकाणी इतर अनेक गुण विद्यमान असतात.जो पहिल्या रांगेत बसण्याच्या लायकीचा असून देखील मागच्या रांगेत विनाखेद बसतो,तो संयमी मनुष्य साक्षात ज्ञान असतो.
जिथे तिथे रेटून पुढे जाण्याची प्रवृत्ती माणसाचा उताविळपणा दाखवते, आणि ज्याच्या ठायी उताविळपणा आहे,तो व्यक्ती कोणतेही मोठे काम करु शकत नाही.
संयम शिकवता येत नाही,तो जात्याच असावा लागतो.संयमी व्यक्ती खाणे,पिणे , बोलणे,चालणे सर्वच बाबतीत सावध असतो.भावनेत न वाहता संयमाने गोष्टी हाताळता आल्या तर त्या अधिक अचूक होतात.
मनात उठणारे आवेग थोपवून, संयमाने प्रकरणं हाताळणं हे कौशल्य फक्त संयमी माणसाकडे असते.
एकदम प्रतिक्रिया देणं कधीही चूकीचे असते.कुणाबद्दल बोलताना संयम बाळगला पाहिजे, मनात येईल ते बरळणे अयोग्यच.आततायीपणामुळे खुप नुकसान होते.
भरपूर वेळ असताना, उगीच घाई करणे योग्य नसते.
संयमी माणसे शांतपणे सर्वकाही करतात, उगीच धांगडधिंगा काय कामाचा? 
संयमामुळे भांडण टळते, संयमाने सत्य उमगते, संयमामुळे पश्चात्ताप करण्याची वेळ येत नाही.मनात आले तरी ओठावर येऊ द्यायचे नाही, हे फक्त संयमाने साध्य होते.ज्यास लवकर पाहिजे,त्यास ते कधीच लाभत नाही.जो वाट बघू शकतो, तोच त्या लायकीचा असतो.
संयम हे जीवनाचे तत्त्वज्ञान आहे.संयमाविना जीवन सुकर होत नाही,वाणीसंयम तर खुप महत्वाचा आहे.जो संयमाने बोलतो तो चूकत नाही.संयमी हा विवेकी असतो.
संयमी मितभाषी असतो,अकारण बडबड करणे तो टाळतो.प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणे तो टाळतो.इतरांच्या जीवनात नाक खुपसणे त्यास आवडत नाही,त्याचा स्वभाव हा उचापतीखोर नसतो.संयमी हा सर्व मर्यादा पाळतो.
संयमीची बुद्धी स्थिर असते, मानसिक संतुलन असल्याखेरीज संयम साध्य होत नाही.काय आणि कुठे बोलू नये त्यास चांगले उमगते.संयम हा गरजेनुसार बाळगावा लागतो.सावधगिरी संयमाची कसोटी असते.
संयमी माणसे आकर्षक असतात.कुणाचे काही हिसकावून घ्यायचे नसल्याने तो स्थितप्रज्ञ असतो.कुणाशी स्पर्धा नसल्याने अचल असतो, आणि
उताविळपणा नसल्याने स्थिर असतो.
संयमी माणसाचे सानिध्य सुखद असते.


Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.