- ना.रा.खराद
मला नावडणारी माणसे परंतु आवडणारा शब्द , खलनायक!खलनायक फक्त चित्रपटातच असतात,असे नव्हे.ते प्रत्येक ठिकाणी असतात.ते पुरुष खलपुरुष असतात.हे जग ज्यांनी नासवले हेच ते दुष्ट लोक असतात.आहे त्या ठिकाणी आपल्या खल म्हणजेच कारस्थानी प्रवृत्तीचे दर्शन घडवतात.
दूधात मीठाचा खडा टाकल्याने जसे दूध नासते,तसे ही माणसे आपल्या वाणीने इतरांचे कार्य नासवून टाकतात.हे पक्के सोंगाडे असतात.ओठात एक आणि पोटात एक ,अशा प्रकारची दुटप्पी असतात.सरळ माणसे हे त्यांचे सावज असतात.त्यांच्या चिमुकल्या डोळ्यांना फक्त कुणाचे काही वाईट करता येईल का एवढेच दिसते.ही जमात अत्यंत ढोंगी असते.पारध्याने जाळंटाकावे तसे हे माणसांना फसवण्यासाठी
आसुसलेली असतात.इतरांचे वाईट बघून यांना खुप आनंद होतो.इतरांचे अश्रू हेच त्यांचे
सुख असते.इतरांच्या यशाचे त्यांचा जळफळाट होतो.कुणी सुखी असलेले त्यांना बघवत नाही.कान भरणे, चूगलखोरी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा असतो.
ते बुद्धिभेद करतात.आपल्या बुद्धीचा उपयोग
दुष्टपणाने करतात.ते बोलवल्याशिवाय येतात, विचारल्याशिवाय सांगतात.मध्यस्थी करुन दलाली खाणारे ते भडवे असतात.ते निंदक असतात.पावलागनिक आपली भाषा बदलणारे अत्यंत खोटारडे असतात.आपल्या स्वार्थापायी इतरांचा गळा दाबणारे अत्यंत घातकी असतात.त्यांचे दाखवयाचे आणि खाण्याचे दात वेगळे असतात.खल प्रवृत्तीची
माणसे कुभांड रचणारी असतात.खोटे आरोप
करुन इतरांना नामोहराम करणारी असतात.
सत्तेत किंवा अधिकारात ही माणसे असतील तर त्यांना फार गर्व आणि माज चढतो.पिसाळलेल्या हत्तीप्रमाणे ते मस्तवाल बनतात.कट रचणे ,खोडी काढणे हे तर त्यांचे
सततचे कार्य असतात.गाव नासवण्याचे काम
हे खल नायक करतात.घरे कशी उद्धस्त करावीत हे यांना ठाउक असते.मानहानि करणे त्यांचा विरंगुळा असतो.जिथे चांगले काही दिसेल तिथे यांनी बीबा घातलाच म्हणूनसमजा.वेठीस धरणे तर यांना खुप उत्तम जमते.खलबते तर खल लोकांचा मुख्य छंद असतो.ही प्रवृत्ती सर्व क्षेत्रातील लोकांमध्ये आढळते.अपवाद नाहीच.पदाने कुणीही असो, प्रवृत्तीचे खल ते खलच असतात.
आपण स्वत: खल नसाल,तर आपणास सलाम करतो,असाल तर विनंती करतो की
लवकरात लवकर ही वृत्ती सोडा.नसता त्याचे
परिणाम ठरलेलेच असतात.तुम्ही खल असले
तरी तुमच्याविषयी आम्हाला प्रेम आहे आणि
त्या प्रेमापोटीच आम्ही तुम्हाला खल प्रवृत्ती
सोडून द्या,असे आवाहन करत आहे.