स्वतःची ओळख

                                        स्वतःची ओळख
                                                          - ना.रा.खराद
   आपण जीवनात विसरलेली गोष्ट म्हणजे, स्वतःला ओळखणे! फार कमी लोक असे असतात की ज्यांना स्वतःला ओळखणे गरजेचे वाटते, बहुतेक याकडे लक्ष देत नाही, किंवा त्यांचे त्याकडे लक्ष जात नाही.स्वत:ला ओळखणे तसे सोपे काम असते,परंतु न ओळखणे मात्र खुप चूकीचे असते.
  आपण स्वतःला वगळून सर्व जगाचा अभ्यास करतो.सर्व शास्त्र आपणास ठाऊक असतात, सामान्य ज्ञान तर कमालीचे असते, इतिहास तर मुखोदगत असतो.इंग्रजी तर अस्सलखीत बोलता येते, परंतु या सर्व खटाटोप मध्ये एकच गोष्ट आपण विसरतो , ते म्हणजे स्वतःला ओळखणे! 
 आपण कधी विचारच करत नाही की आपण कोण , कसे आहोत आणि कशासाठी आहोत.जगण्याच्या धूंदीत आणि या बाह्य जगतात इतके रममाण होऊन जातो की स्वतःलाच पारखे होतो.वारंवार होणारे दुःख, पश्चात्ताप, अपमान वगैरे हे सर्व स्वतःला न ओळखण्याचा परिपाक आहे.इतरांच्या गुण दोघांबद्दल अहोरात्र बोलणारे आपण, स्वतःच्या गुणदोषांची जाणीव नसलेले असतो.
 स्वतःची ओळख ही खूप मौलिक गोष्ट आहे.ज्या काही त्रोटक लोकांनी हे केले , त्यांचे जीवन बघा,मग कळेल.
सतत बाहेर किंवा इतरांकडे बघण्याची सवय इतकी जडलेली असते की स्वतःलाच आपण विसरतो, डोळे उघडे ठेवून नाही तर डोळे बंद करून स्वतःशी संवाद करायला हवा.स्वत: ला ओळखण्याचे फायदे खुप अधिक आहेत, परंतु आपणास त्याची कधी गरज वाटत नाही,ज्याची खुप गरज आहे.
 इतरांच्या प्रतिक्रिया हीच आपली आपण ओळख बनवू पहातो.इतरांच्या तालावर नाचण्याची आपणास सवय होऊन जाते, आणि यातून आपण स्वतःला विसरून जातो.आपण कसे आहोत, हे इतरांना सांगावे लागते, किंवा इतर म्हणतात, तसे आपण स्वतःला समजायला लागतो,ही आपली खरी ओळख नाही, हे मृगजळ आहे.
  स्वतःला ओळखण्यामध्ये काही अडसर आहेत.पहिला म्हणजे आपण हे विसरतो की आपले शरीर म्हणजे आपण आहोत, आपण शरीरापेक्षा वेगळे आहोत, शरीर फक्त साधन आहे, आपणास वहन करण्याचे.आपण कोण आहोत.हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे, तेव्हा आपण त्याकडे वळू शकू.दूसरे म्हणजे मी स्वतः आहे, मला काय ओळखण्याची गरज , इथेच चूक होते, हा अंहकार स्वतःला ओळखू देत नाही, आणि आपण आपली कोणतीही चूक मान्य करायला तयार नसतो, अंहकारच आडवा येतो.
 स्वतःला आरशात बघून स्वतःला ओळखता येत नसते.प्रतिबिंब ही ओळख नाही,बिंब ओळखले पाहिजे.पिंड ओळखता आला पाहिजे.स्वत:ची बलस्थाने, कमजोरी, भावना, बुद्धी ओळखली पाहिजे,त्यांचे परिक्षालन केले पाहिजे.मनशांती तेव्हाच लाभेल, जेव्हा मन समजून घ्याल.मनात उठणारी हजारों वादळे थांबवण्यासाठी ती समजून घ्यावयास हवी.जगराहटीमध्ये या गोष्टीचा विसर पडतो, आयुष्याचे मातेरे होते, आयुष्य ओळखल्या खेरीज आयुष्य संपणे हे आयुष्याचे मातेरे आहे.
   आत्मचिंतन केले तर आत्मशक्ती प्राप्त होते,आत्मशांती लाभते.आपण फक्त शरीर नसून आत्मा आहोत,हेच अध्यात्म आहे, हा विषय धार्मिक नसून आध्यात्मिक आहे.स्वत:ला ओळखले तरच सर्व शक्ती जागृत होतात,विराट दर्शन होते.दृष्टी स्वतःकडे वळली पाहिजे.डोळ्यात तेज झळकले पाहिजे,नुसती वटवट उपयोगी नसते.
 स्वतःला ओळखून आपली जागा निश्चित करा,जग आपणास काय समजते, यापेक्षा आपण स्वतःला किती ओळखले आहे, हे महत्त्वाचे आहे. दिसते तेच फक्त जग आहे,असे नाही,जे दिसत नाही, ते बघण्यासाठी आत्मचक्षू लागतात, ते प्रत्येकाकडे नसतात, परंतु प्रत्येकाला मिळू शकतात.
  बघा तर एकदा प्रयत्न करून, काही हाती लागते का?
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.