तुझ्या नावाचा गजर आता बंद झाला आहे,
याची जाणीव असेलच तुला.
लाखों करोडों प्रार्थना स्थळांतून
तुझ्या गुणांचा महिमा, अचानक थांबलेला बघून,
तुलाही आश्चर्य वाटलच असेल,
त्याचे कारण तुला माहीत नसेल,
इतका काही तु दूधखुळा नसेलच!
अरे देवा..
तुम्हा देवांमध्ये काही बिनसलं तर नाही ना,
आम्हा मानवासारखी भांडणे तर झाली नाही ना,
तुमच्या वरुन आम्ही भांडणे करतो तसे आमच्या वरुन तुमची
दंगल तर झाली नाही ना!
कारण तुमचाही इतिहास आम्हाला
माहित आहे.
तुझे नाव घेत झोपणारे आणि जागणारे आम्ही
तुझ्या नावाचा दिवसरात्र जप करणारे
विज्ञानयुगातही तुला विसरलो नाही
तुझे नाव घेतो,तुझ्या नामाचा महिमा गातो
तुला दूधा तुपाचे अभिषेक घालतो
दगडातही तुलाच बघतो ,
म्हणून आमची कुचेष्टाही झाली परंतु
तुझ्यावर असलेल्याअगाध विश्वासावर आम्ही तेही सहन केले
केदारनाथला तुझ्या भक्तांवर जो दुःखाचा
डोंगर कोसळला,तोही तुझ्या डोळ्यासमोर
निदान तिथे तरी तू मदतीला धावशील असे
वाटले होते, पण छे! तेही फोलच ठरले.
तू जन्मदाता आहे म्हणतात,
मग तुझी लेकरे मरत असतांना,
तू काय करतो आहेस!
हा तमाशा तू तर केला नाही ना
यदा यदा हि धर्मस्य ग्लानी, हे का नुसते पोकळ आश्वासन?
जेव्हा आम्हीच नसू तेव्हा कोणता धर्म असणार
सर्वत्र पसरलेला हाहाकार तुला ऐकू येत नाही का
ऐकून गप्पं का बसला आहेस
करंगळीने गोवर्धन उचलणारा तू
लेकरांना असे वाऱ्यावर सोडणार का
तुझ्या नावाचा जप करणारे साधू संत
तुझी वाट पहात आहेत
कधी येशील तू भगवंता
नसेल येणार तर तसे सांगून टाक
आता तर तुझ्या आस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे,
तूझ्या असण्याविषयी अनेकांना शंका होती,
तसे ते आम्हाला समजावतही होते
तरीही आम्ही निष्ठा ढळू दिली नाही पण आज
ती ढळू पहात आहे करोडों लोकांच्या भक्तीची तुला जरा देखील
किंमत असेल तर ,'कोरोना' नावाच्या राक्षसाचा संहार कर आणि
तुझ्या विषयीची निष्ठा अजुन बळकट कर!
एक भाबडा भक्त!
ना.रा.खराद,अंबड