- ना.रा.खराद
माणसामाणसातील मतांतरे,मतभेद त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण करतात.
लहानसहान बाबींमध्ये देखील मतभेद दिसून येतात.कौटुंबिक जीवनात तर नवराबायको मधील मतभेद इतके जास्त असतात की सततची कुरबुर, कटकटी, आदळआपट त्याचाच परिणाम!
जिथे एकत्र राहायचे असते, एकत्र काम करायचे असते, निर्णय घ्यायचा असतो, तिथे एकमत, एक विचार होणे गरजेचे असते, परंतु प्रत्येकजन आपल्या मतांवर ठाम राहतो.माझे ऐका,हाच प्रत्येकाचा आग्रह असतो.यामुळे घर असो वा इतर ठिकाणी मतभेद हे ठरलेले आहेत.समान स्वार्थ साधत असेल तरच माणसांचे एकमत होते.जिथे स्वार्थ नडतो, तिथे मात्र तीव्र विरोध दाखवला जातो.
आपली लोकशाही देखील मतभेदाचे उदाहरण आहे.मतभिन्नता आहे म्हणून ती टिकून आहे.लोकशाहीची पाळेमुळे मतभेदाची आहेत.एकप्रकारे विरोध करण्यासाठी ती एक जागा आहे.आपल्या मताचा उमेदवार निवडून आला की तो सुखावतो.मत म्हणजे विचार, भावना,पसंती, इच्छा, भावना,गरज , बुद्धी या सर्वांची रसभेसळ असते. माणसे ' मला असे वाटते, माझे असे मत आहे अशी सुरुवात करतात.मतभेद टाळण्यासाठी अनेक समंजस माणसे सहमत होतात किंवा मौन बाळगतात.आपल्या मतांचा अतिरेक करणे,ते लादणे अमानवीय ठरते.आपल्या मतांशी सहमत होणारी माणसे आपणास प्रिय होतात.आपली मते खोडणारी माणसे नकोशी वाटतात.
गरज नसताना माणसे मते मांडताना दिसतात.छोट्या गोष्टींमध्ये शुद्धा काही तरी मत व्यक्त करतात आणि वितंडवाद वाढवतात.आपले जितके ऐकले जाते,तितका अहंकार सुखावतो.मतभेदाच्या आड अनेक गोष्टी असतात.अविश्वास,घृणा,असूया,सूड त्यातून
व्यक्त होतो.
जीवनात पावलागणिक निर्णय घ्यावे लागतात, स्वतः निर्णय न घेणारी किंवा न घेऊ शकणारी माणसे इतरांच्या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया देतात.आम्हाला मान्य नाही,आमचा विरोध आहे असे बोलतात.
हे मौनी विरोधक फार घातक असतात.
खरे म्हणजे जिथे मनभेद नसतो, तिथे मतभेद दिसून येत नाही.मनातले वितुष्ट हेच मतभेद दाखवते.आमचे पटत नाही,मला त्याचे वागणे आवडत नाही वगैरे बोलले
जाते.काहीतरी कारणाने मत वेगळे बनते आणि तेच मतभेदात बदलते.एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत नकारात्मक मत तयार झाले की त्याच्या प्रत्येक बाबतीत विरोध केला जातो, आणि यामधून माणसाचे गट
पडतात.राजकिय पक्ष खऱ्या अर्थाने अराजकीय असतात.त्याशिवाय पक्ष कसला? पक्ष म्हणजे मत आणि मत आले की मतांवर ठरलेले आणि मतांतर पुढे विरोध मग पुढे...!
प्रत्येकाला आपल्या मताप्रमाणे जगता यावे,अशी व्यवस्था तर समाजात नाही.एकत्र यायचे, रहायचे असेल तर एकमत आवश्यक आहे, आणि ते होणे
शक्य नाही.कलह हा त्याचाच परिणाम.
आपल्या मताबरोबर इतरांच्याही मतांचा आदर व्हावा, कितीही मतभिन्नता असली तरी त्या मुद्यावर असावी, त्यातून व्यक्तीगत पातळीवर येऊ नये.मनात आकस ,तेढ ठेवू नये.टोकाची भूमिका घेऊ नये.दोन पाउले मागे घेतल्याने कमीपणा येत नाही,उलट ते शहाणपणाचे असते.
आपल्या कौटुंबिक, सामाजिक जीवनात मत संयमाने व्यक्त करावे.मध्यम मार्ग काढावा,इतरांचा आदर राखण्यासाठी त्याच्या मताचा आदर करावा.
माणसांसोबत रहायचे असेल तर माणसांसारखे वागावे लागेल.