- ना.रा.खराद
त्या ठिकाणी उच्च शिक्षित पन्नास व्यक्ति बसलेले होते.ते सर्व आर्थिकदृष्ट्या समृद्ध होते.तरीही प्रत्येकजन काळजीत,चिंतेत दिसत होता.त्या़च्यामध्ये अधूनमधून एखादा विनोद होत होता, हास्य उमटत होते.लगेच पुन्हा पहिल्या अवस्थेत.तितक्यात त्या ठिकाणी चहावाला चहाची केतली घेऊन आला.तो मळकट कपडे घातलेला.केस विस्कटलेला होता.कोणते तरी गाणे तो गुणगुणत होता.त्याच्या चेहऱ्यावर अत्यंत प्रसन्न भाव होते.त्याच्याकडे बघून सर्वांना आश्र्चर्य वाटू लागले.हा इतका आनंदात कसा? एकजन म्हणाला,'अडाणी आहे,अज्ञानी आहे.' दूसरा म्हणे,'मूर्ख दिसतो.'
तिसरा म्हणे ,' भोळा दिसतो.'
एका आनंदित माणसाकडे बघून त्या चिंतातुर
लोकांना इतके वैषम्य का वाटत असावे?
आनंदित रहाण्यासाठी वरील सर्व मते खरी मानायची काविद्वान,बुद्धीमान,ज्ञानी,तत्वज्ञ,हे आनंदित नसतात का? त्यांनी आनंदात असू नये का?
आनंदित, प्रसन्न, समाधानी तर प्रत्येकास रहाता आले पाहिजे.परंतु सतत तणावाखाली
वावरणाऱ्या लोकांना हे पटत नाही.डोक्यामध्ये काय चालते यावर आपले सुख अवलंबून आहे.स्वत:चे डोके तपासले पाहिजे.स्वादिष्ट भोजन घेतांना देखील माणसे
आनंदित होत नाहीत.बासूंदी तोंडात असतांनाही चेहरा मात्र शेणखात असल्यासारखा असतो.कशानेही आनंदित
न होणारी माणसे, बाहेर जगात फक्त दु:ख शोधत असतात.समाधान ही एक वृत्ती आहे.
आवडलेली एक साडी खरेदी केली तर आनंद
व्हावा ,पण नाही त्या इतर आवडलेल्या साड्यांचे काय? परत जैसे थे.टेंशन हा शब्द इतका रुढ झाला आहे की वर्तमान काळाचा तो पर्याय बनला आहे.
लहान मुले देखील आजकाल बोलतात,' खुप
टेंशन आहे.' जो तो जिकडे-तिकडे एकच शब्द ऐकायला मिळतो,"बहुत टेंशन है भाई."
तणाव ही एक व्याधि आहे.मनाचा रोग आहे.
तो बाह्य उपचाराने जात नाही.त्यासाठी त्याची कारणे शोधली पाहिजे.जीवनशैली समजून घेतली पाहिजे.
धावपळ, कटकटी, चढाओढ, ईर्ष्या,शत्रुत्व, विसंवाद ,लालसा अशा अनेक कारणांमुळे तणाव निर्माण होतो.जीवन समजून घेतले पाहिजे.साधेपणानेही आनंदित जगता येते, हे लक्षात घेतले पाहिजे.कुणाची बरोबरी करायला जाल तर अपयश तुम्हाला तणावाखाली आणेल.इतरांना सुखी बघून आपणास सुख वाटत असेल तर तणाव येणार नाही.मी कित्येकवेळा अत्यंत श्रीमंत लोकांच्या घरी गेलो आहे.त्यांचा थाट मी बघितला आहे.तो बघून मला आनंद होतो.
जे चांगले आहे ते बघून दूसरे काय होणार?
परंतु आपण तिथेही दुःखी होतो.काय वाटेल
तो विचार करु लागतो.आपला स्वभावच असा बनलेला आहे की सर्वकाही चूकीचे वाटते.आणि बसतो डोक्याला हात लावून.
साधी बसमधली गर्दी आपण सहन करु शकत नाही.तिथेही कुरकुर.घरी आले तरी तेच.लोकअसे..लोकतसे.वगैरे.अपेक्षा,गाऱ्हाणे, कुरकुर संपतच नाही.कपड्यावर एक डाग पडला तरी दिवसभर तेच गाऱ्हाणे.साऱ्या जगाचा हिशोब मांडण्याची गरज नाही.जग आपल्या मतानुसार चालणार नसते.जग आहे तसेच असणार आहे,आपण स्वत:ला ओळखले पाहिजे.बारीकसारीक गोष्टी भेडसावत असतील तर डोके लवकर तपासून घ्या.उंदीर डोंगराएवढा दिसत असेल
तर काळजी घ्या.जीवनातील जितका काळ
तुम्ही चिंतेत रहाल तितका तुम्ही तो गमावलेला आहे.तुम्ही हात मोकळे सोडा,नसता तुमचे सगळे हिसकावले जाणार आहे.हे लक्षात असू द्या,आपले काहीच नसते.कशाचीही फार काळजी करु नका.
मोकळेपणाने बोला ,हसा .जगात खूप मजा
आहे तीचा आनंद घ्या.आहे ते खुप आहे असे
समजा.आनंद हा आनंद असतो तो स्वस्त महाग नसतो.इतरांशी तुलना करु नका.स्वत:ला कमी लेखू नका.अनमोल शरीर प्रत्येकाला आहे.चिमुकल्या डोळ्यांनी हे ब्रम्हांड बघा.
आनंदी रहा....आनंदी रहा...!