- ना.रा.खराद
माझे अनेक मित्र आहेत. उरलेले शत्रू नाहीत. पैकी एक मित्र खुप कंजुस आहे. कंजुषपणाचे बाळकडू घेऊनच तो जन्माला आला आहे. त्याच्या कंजुषपणाचे अनेक किस्से आहेत.ते गंमतीशीर असले तरी मानवी स्वभावाचा उलगड करणारे आहेत.
कंजूसपणा हा गुण आहे की दोष मला अजून कळाले नाही,कारण जो पैसा खर्च करतो , तो कंगाल होतो, लोक त्यास तुच्छ लेखतात आणि दूसरीकडे जो कंजूस आहे.त्याचीही खिल्ली उडवत असतात.
प्रत्येक ठिकाणी पैसा वाचवण्यासाठी तो पराकाष्ठा करतो.कमीतकमी पैसा खर्च व्हावा ,शक्य असेल तर होऊच नये असा त्याचा मानस असतो.प्रवासात तो सोबतीला असला म्हणजे तो इतके पैसे वाचवतो की ,तो फ्री निघतो.पण नको तिथे ,नको तितकी काटकसर नकोसी वाटते. अनेकवेळा हुज्जत घालावी लागते.तोंड फिरवले की,"काय हलकट माणूस आहे हा!" असले टोमणे कानावर पडले तरी आपले दोन रुपये वाचले याचा त्यास जास्त आनंद मिळतो.तो फक्त जवळच्याच पाहुण्यांना चहा पाजतो.जेवू तर कुणालाच आणि कधीच घालत नाही,तो स्वतः खातो हेच विशेष! तो कितीही बदनाम असला तरी पैसेवाला आहे म्हणून त्यांचे नाव आहे.उधार पैसे तो कधीच परत करत नाही.
घरात देखील कंजुषपणाचे व्रत सोडत नाही. मुलांना भूक लागली की शेजारच्या घरात पाठविण्याचे कसब त्याच्याकडे आहे. शेजाऱ्याना बरे वाटावे म्हणून चारचौघात," आमचे शेजारी आणि आम्ही वेगळे नाहीत" असे आवर्जून सांगतो.मात्र स्वतःच्या घरी आणलेली केळी लपवून आणतो आणि दारे बंद करुन खातो.सालट्यामध्ये जीवनसत्त्व असते वरुन हे ज्ञानही पाजळतो,सालटेही खावू घालतो.त्याच्या घरातील वस्तू, घरातल्याच पूर्वीच्या वस्तूपासून बनवलेल्या असतात.एकाच्या अनेक इजारी असण्याऐवजी ,एकच इजार अनेकजन वापरतात.वापरण्यासारखा भागअलगद वेगळा करुन नवीन इजार घरच्या घरी तयार होते, ज्याच्या मापाची असेल त्याने ती वापरायची.नवा कपडा तो क्वचितच खरेदी करतो.बायकोला साडी हवी असेल तर एखाद्या नातेवाईकांकडे तो जोडीने जातो.बोळवण होते. साडीचे पैसे वाचले.त्याच्याकडे पैशांची कमी आहे असेही नाही. गरज पडली की आम्हाला त्याच्याकडून उसने घ्यावे लागतात.कुठे भेटवस्तू देण्याचा प्रसंग आला की तो घरात असलेल्या न वापरलेल्या वस्तू देतो.त्याच्या लग्नात मिळालेल्या अनेक घड्याळी त्याने भेट देऊन वेळ निभावली आहे.
एकदा टरबूज खरेदी करतांना त्याने कमाल केली. विक्रेता म्हणे,"तीसला एक,पन्नासला दोन." ह्यास एकच घ्यायचे होते. तो थांबला दूसरे गिऱ्हाईक येईपर्यंत. पन्नासचे दोन घेतले,दोघांमध्ये!
मी त्यास नवीन चप्पल घेतांना कधीच बघीतले नाही. चपलेचे पूर्ण नुतनीकरण झालेले असते.चपलेचे शरीर बदललेले असते आत्मा अमर असतो.पेन वगैरे सारख्या
तुच्छ वस्तू तो कधीच विकत घेत नाही.
गरज नसतांना तो मागवून ठेवतो,गरजेच्या वेळी कामी येतील यासाठी!
तो पाहुण्यांना भजे आणि पुऱ्या मोजून वाढतो.चहाचे कप लहानात लहान वापरतो.तो नेहमी उदार लोकांसोबत राहतो, तिथे त्याचे पैसे खर्च होत नाहीत.
पेट्रोल वाचविण्यासाठी उतारावर पेट्रोल बंद करतो.दात घासण्याचा ब्रश दात तुटेपर्यंत बदलत नाही. तो सतत महागाई खुप वाढलीअसे गाऱ्हाणे मांडत असतो.त्याने दहावी पर्यंत नव्या वह्या कधीच घेतल्या नाही. पाचवीला घेतलेल्या वह्या काटकसरीने वापरत ,सहावीला त्याच वापरतो.कोरे पाने शिल्लक ठेवायची आणि त्याची वही तयार करायची.त्याच्या या कंजुषपणामुळे त्याला मिळालेले गुणही काटकसरीने दिलेले होते.
पुस्तके कायम जूनीच वापरायचा.रद्दीवाल्याकडे शोधायचा.सहलीला गेला की सोबतचे पैसे खर्च करत नसे.तसेच परत आणायचा.त्याने चश्मा कधीच नवा घेतला नाही. त्याचे अवयव बदलायचा फक्त!
दोन रुपये जरी खर्च झाले तरी लिहून ठेवतो.
वार्षिक ताळेबंद मांडतो.त्याचा तो अर्थ संकल्प बघण्यासारखा असतो.त्याने आयुष्यात कुणाला काही दिले नाही. माणूस चांगला आहे, फक्त कंजूष आहे.