सहजता

                     सहजता
                              - ना.रा.खराद
आपण जीवनातील सहजता गमावत चाललो आहोत.औपचारिकता किंवा शिष्टाचार यामध्ये आपण गुरफटून गेलो आहोत.जीवन हे सहज सुलभ असावयास हवे,ते आंतरिक असावे.केवळ तकलादू नसावे.जीवन ओझे वाटू नये.कुणाचेही अनुकरण न करता किंवा बरोबरी न करता आपण आपल्या ठिकाणी सामान्य जीवन जगू शकतो.जे सहज असते ते सुंदर असते,सत्य असते.
क्षमतेपेक्षा अधिक काही करणे ओंगळवाणे वाटते.जे जमते , जसे जमते तसेच ते सहज असले पाहिजे, त्यासाठी आटापिटा करणे योग्य नसते.आपल्या मर्यादा ओळखल्या पाहिजेत ‌.फाजिल अपेक्षा करणे सोडले पाहिजे.औपचारिकता आता गरज बनत चालली आहे.
अनुकरण हा तीचा खुराक आहे.तणावाचे ते कारण आहे.
वैभव, प्रतिष्ठा ही पोकळ ऐट आहे हे लक्षात घेतले पाहिजे.पदाने, प्रतिष्ठेने आपण कुणीही असलो तरी जगण्यातील सहजता सोडता कामा नये.ऐटबाजपणा, ताठरपणा,अकडूपणामुळे सहजता नष्ट होते.पद आणि पैसा आला की प्रतिष्ठा मिळू लागते आणि हळूहळू सहजता नष्ट होऊ लागते.ती होऊ न देणे ही सहजता आहे.बाह्य गोष्टींचा आंतरिक परिणाम होता कामा नये.
अमूकचे वागणे बदलले असे घडू नये.अंगावर झुल चढवली तरी जसे बैलाचे वागणे बदलत नाही , तसे आपले नैसर्गिक वागणे बदलू नये.अविर्भाव हा एक मानसिक रोग आहे.इतरांवर छाप टाकण्यासाठी केला जाणारा खटाटोप त्याज्य आहे.
आपले बोलणे,चालणे एकंदरीत आपले एकूण वर्तन हे सहज असावे.कुठली ओढाताण, आविर्भाव किंवा अभिनिवेश त्यामध्ये नसावा.एखाद्या निरागस बालकांप्रमाणे असले पाहिजे.डोळ्यामधली सहजता लक्षात येते.सहजतेमध्ये जो आनंद आहे तो औपचारिकते मध्ये नाही.जिथे इतरांना आपले सानिध्य असहज वाटते,तिथे ते औपचारिक असते.
सहजच कोकीळेचा स्वर कानावर पडावा तसे आपले वर्तन असावे.वाणी प्रासादिक हवी.बोलणे सहज सुलभ
असावे.शब्दांची ओढाताण नसावी.आपल्या तोंडून शोभेल तेवढेच चांगले बोलावे.पाहुणे येणार म्हणून बैठक
स्वच्छ करायची ,ही संस्कृती रुढ झाली आहे.इतरांमुळे किंवा इतरांसाठीच औपचारिकतेने वागले जाते.जिथे जिव्हाळा नाही,खरी आपुलकी नाही तिथे शिष्टाचार म्हणुन सर्व काही केले जाते.
जीवनातील सहजता नष्ट होणे ही धोक्याची घंटा आहे.
साधे सरळ जीवन जगता आले पाहिजे.हार्दिक संबंध जोडले गेले पाहिजे.फार पसारा वाढविण्याची गरज नाही.
आहे त्या ठिकाणी सहज वावरले पाहिजे.पक्षी जसे सहज विचरण करतात ,आपण तसे सामान्यपणे वावर‌ले
पाहिजे ‌‌.एखादे लेबल लावून असहज होऊ नये.आपण कुणी विशेष आहोत ,हा विचार सोडला पाहिजे.साधेपणात जे सुख आहे ते स्वतःचे आहे.
माणसाने साधे सरळ असले पाहिजे.लक्षात असू द्या,साधारण वाटणारी माणसेच असाधारण असतात.
   
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.