मनुष्य भावनाशील प्राणी आहे.रडणे आणि हसणे त्याचा स्थायीभाव आहे.इतर देखील अनेक राग आहेत,तो कायम कोणत्या तरी
भावनेत अडकलेला असतो,तो निष्ठूर असला तरी तो देखील एक भाव असतो.
इमोशनल होणे किंवा भावनीक होणे ही मानवी प्रवृत्ती आहे.
भावना कमी जास्त प्रमाणात असतात, कुणाच्या ठिकाणी त्या अतितीव्र असतात,तर कुणाच्या साधारण.संवेदनशील मन जास्त भावनीक असते.करुणा,दया, प्रेम, आपुलकी, आस्था अशा अनेक भावनामानवी संवेदनाचे प्रतिक असतात.
अश्रू हा भावनेचा ओलावा आहे.शब्दाविना तो व्यक्त होतो.माणसे माणसाला जपतात, ते याच भावनेतून.कळवळा ,लळा जिव्हाळा
ह्या मानवीय भावना जगण्याची उर्मी देतात.
आपल्या भावना सांभाळून इतरांच्या भावना समजून घेणे श्रेष्ठ माणसे साधत असतात.सर्वत्र भावकल्लोळ आहे.मुलीला सासरी पाठवणी करताना आईबाप टाहो फोडतात ते भावनेच्या आवेगाने.भावनेच्या
ओघात कितीतरी गोष्टी घडतात.भावनेवर नियंत्रण ठेवण्याचे विचारी लोक सांगतात.काही भावना अव्यक्त राहतात,त्या व्यक्त करणे व्यावहारिक नसते.समयोचित
नसते.
जीवनात भावनेचा ओलावा आवश्यक आहे,नसता जीवन शुष्क वाळवंट होऊन जाईल.मानवामध्ये जे आपसातील प्रेम आहे,त्याच्या जोरावरच मानवामध्ये एकोपा आहे, सहकार्य ही भावना त्यांना एकत्र आणते.जगण्याची सारी गमंत या भावनेत
दडलेली आहे.त्याग, समर्पण,निष्ठा या भावना मानवाच्या कल्याणासाठी असतात.मानव मानवाच्या कामी येतो ही
मानवीय भावना मानवाची खरी ओळख आहे, माणुसकी ही भावना मनुष्याची खरी ओळख आहे.
अपवादात्मक कुणी भावनाहीन असते,तर
कुणाच्या हीन भावना असतात.भावना कोणतीही असली तरी ती भावनाच असते हे मात्र नक्कीच.समर्थन जशी भावना आहे,तशी विरोध देखील.नकारात्मक भावना म्हणून त्यांची ओळख आहे.
भाव तिथे देव, असं म्हटलं जातं.ज्याची जशी भावना हेही बोललं जातं.भावनेच्या ओघात वाहत जाणारी अनेक चूका करतात, भावना असेल तसं बोलणं किंवा वागणं अविवेकी असते.आपल्या भावना आपणास ओळखता आल्या पाहिजेत.भावनांना योग्य दिशा दिली गेली पाहिजे.अंहकार व इतर त्याज्य भावनेचा नायनाट करता आला पाहिजे.आपल्या मनाची मशागत केली पाहिजे.इतरांच्या भावना जपणं ही चांगल्या माणसांची ओळख आहे.भावजीवन हेच खरे जीवन असले तरी विवेक बाळगला पाहिजे.अतिरेकी भावना कधीही हानिकारकच असते.माणसांना जोडणारा दुवा म्हणजे भावना आहे.
आपल्या ठिकाणी वसत असलेल्या सर्व भावनांचा आढावा घेतला जावा व नकारात्मक व हीन भावना संपुष्टात यावी , श्रेष्ठ मानवी भावनांचा आपल्या ठिकाणी दरवळ असावा इतकेच!🙏
- ना.रा.खराद,अंबड