- ना.रा.खराद
अर्धे आयुष्य झोपेत जाते,ती झोप किती महत्त्वाची असेल बरं! काही लोक जीवनाचे गणित मांडताना झोपेतील आयुष्य कमी करतात,एक रात्र जर मनुष्य झोपला नाही,तर तो उभा राहू शकत नाही.झोप नैसर्गिक बाब आहे, त्यामध्ये मानवी हस्तक्षेप अनाठायी आहे.ज्यांना चांगली झोप लागते, तेच जागे चांगले राहू शकतात.दिवसभरचा थकवा घालवण्यासाठी झोप असते.झोपेतून जागे झाले की किती प्रसन्न वाटते,नवा उत्साह येतो.
झोपेमुळे रोजचा दिवस नवा वाटतो.काही काळ निपचित पडून राहिले पाहिजे,हा संकेत आहे.सततची धावपळ थोडावेळ विसावली पाहिजे, म्हणून झोप आहे.
पुरेशी झोप नसेल तर अनेक आजार बळावतात,डोके जागेवर राहत नाही, चिडचिडेपणा वाढतो, कार्यक्षमता कमी होते व असे अनेक दुष्परिणाम होतात,हे नको असेल तर झोपेची टाळाटाळ करु नये, अथवा झोप मोडून कोणतेही काम करु नये.
लहान मुलांना भरपूर झोपू दिले पाहिजे, शिस्त किंवा अभ्यास या नावाखाली मुलांना अर्धवट झोपेतून उठवू नये.
झोपेतही जीवन थांबलेले नसते, स्वप्नांच्या विश्वात मुक्तपणे संचार करता येतो.जे वास्तविक जगात लाभले नाही,त्याची स्वप्ने रंगवता येतात.रात्री सर्व कोलाहल थांबलेला असतो, अशा निरव शांततेत शरीर आणि मन दोन्ही विश्रांती घेतात.नवा जोम हवा असेल तर झोप आवश्यकच.
झोपेत आपला अंह थांबलेला असतो, झोपेत आपण कुणीच नसतो.जागे झाले की अंह किंवा मी जागा होतो.झोप सर्व मानवांना समानतेची शिकवण देते.जागे होण्याची खात्री असल्याने सर्वच निर्धास्त असतात.झोपेतून जागही येते.काहींची झोप खुप गाढ असते, कुणी झोपेत घोरते.कुणी चालते,कुणी बोलते.
काहींची झोप अल्प असते.झोपेत दचकून उठणारे असतात, काहींना विचित्र स्वप्न पडतात.काही लोकांना ठराविक ठिकाणीच झोप येते,तर काही कुठेही झोपतात.झोप नसताना देखील रात्र झाली म्हणून झोपणारे असतात.
चिंता , दुःख असेल तर झोप लागत नाही.शारिरिक वेदना असेल तर झोप लागत नाही.लहान मुलांना झोपू घालावे लागते.
झोप हा आयुष्यचा भाग आहे.जीवनाचे नवचैतन्य झोपेमुळे आहे.चांगल्या झोपेत खुप सुख असते.
काही काळ सर्व कटकटी पासून दूर राहण्यासाठी झोप असते.ती मानसिक विश्रांती असते.त्यामुळे निवांत झोपले पाहिजे, चांगली झोप येईल असे वागले पाहिजे.