स्वतःची चूक ओळखा!

             स्वतःची चूक ओळखा!
                               - ना.रा.खराद
 आपल्यापैकी बहुतेक जण इतरांच्या चूका शोधण्यात पटाईत असतात.आपण चूका करतच नाही,असे त्यांना वाटते, परंतु हे खरे असते का? जसे इतर चूका करतात, तशा त्या आपणही करत असतो, परंतु कुणीही आपली चूक मान्य करत नाही,उलट इतरांवर खापर फोडून मोकळे होऊ पहातो.खरे म्हणजे जे काही विपरीत घडते ,मग ते स्वतःच्या बाबतीत असो की इतर कुणाच्या त्यास कुणीतरी किंवा काहीतरी जबाबदार असते, परंतु आपण आपले काहीच चूकले नाही,असा गवगवा करतो.
मनुष्याकडून चूका घडू शकतात किंवा तो जाणुन बुजुन चूका करतो , प्रत्येक चूक त्याचा परिणाम दाखवते आणि मग कारणांचा शोध घेतला जातो, अनेकवेळा ती आपलीच चूक असते, परंतु ती मान्य करणे आपणास जमत नाही, त्यामुळे गुंता अजून वाढत जातो.मोठमोठे गुन्हेगार देखील आपला गुन्हा मान्य करत नाही, अनेक वर्षे युक्तिवाद केला जातो, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची खटपट जशी न्यायालयात चालते ,तशी ती न्यायालयाच्या बाहेर देखील!
आपली चूक मान्य न करण्याची प्रवृत्ती जन्मजात व स्वाभाविक असते.पुढे शिक्षणामुळे,तत्वज्ञानामुळे चूक मान्य करणे हा एक विचार रुजला, आणि काही प्रमाणात
चूक मान्य केल्या जाऊ लागल्या.तर्काच्या जोरावर चूकांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न होऊ लागला,कुटनीति आणि मुत्सद्देगिरीच्या जोरावर चूकांचे उद्दातीकरण होऊ लागले.मनुष्य हा चूकीचा पूतळा आहे अशी विधाने त्यास कारणीभूत ठरली.चूकीला क्षमा हा एक खतपाणी घालणारा विचार पुढे आला आणि चूका आणि शिका हा संदेश पसरु लागला.
आपले आरोग्य, आर्थिक स्थिती, प्रतिष्ठा आपल्याच हातात असते, यापैकी काही चूकीचे घडले तर आपण इतर घटकांना जबाबदार धरतो , परंतु स्वतःची चूक ओळखत नाही.निवडणूकीत पराभूत झालेले उमेदवार स्वतःची चूक न ओळखता अमूकमुळे मी पराभूत झालो असे वर्तवतो.परीक्षेत नापास झालेला किंवा कमी गुण मिळालेला विद्यार्थी इतर हजार कारणे सांगेल परंतु स्वतःची चूक शोधणार नाही.कौटुंबिक कलहात कुणीही स्वतःची चूक कबूल करत नाही,इतर सदस्य दोषी आहेत,हेच तो आवर्जून सांगतो.
रस्त्यावर अपघात होतात, चूक असतेच पण कुणी मान्य करत नाही.तीसरा कुणीतरी हवा ज्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणतात.एकच चूक वारंवार करण्यात येते, अशावेळी ती झाली अशी म्हणण्यास वाव नसतो,मग ती माझी चूक नसून इतर कुणामुळे तरी ती मला करावी लागली असे पालपूद जोडून तो नामानिराळा होतो.
चूका होणे किंवा करणे हा इथे मुद्दा नसून त्या आपण अमान्य करतो हा कळीचा मुद्दा आहे.त्या अमान्य केल्याने
अनेक अडचणी येतात.किमान मान्य जरी केल्या तो तिढा लवकर सुटू शकतो, न्याय लवकर केला जाऊ शकतो.लहान मुले देखील आपली चूक लवकर मान्य करत नाही,आपण तर मोठी माणसे आहोत!
डाकू देखील मी यामुळे डाकू बनलो ,अशी कारणे सांगतो.
कुठल्याही परिस्थितीत कुणीही आपली चूक मान्य करत नाही,ही वस्तुस्थिती आहे.चूक मान्य करण्याचे औदार्य, धारिष्ट्य माणसाकडे का नाही.सरळपणाचा अभाव हे कारण आहे की अंहकार आहे,की अजून दूसरे काही!
चला तर आपण शोध घेऊ आणि चूक मान्य करायला शिकूया!
                  
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.