- ना.रा.खराद
आपल्यामध्ये ज्या काही उणीवा आहेत, त्यामध्ये जाणीवेची उणीव देखील असते.आपल्या सभोवताली जे काही आहे,त्याचे भान असणे म्हणजे जाणीव होय.आत्मभान म्हणजे जाणीव.संवेदना जाग्या असणे म्हणजे जाणीव.जाणीव होत असते, नसेल तर कुणीतरी ती करुन देते.भानावर येणे म्हणजे जाणीव.समजणे, कळणे, जाणवणे म्हणजे जाणीव.जाणीव कर्तव्याची, जाणीव हक्काची, जाणीव उपकाराची, जाणीव इतरांच्या भावनांची.जाणीवेचे क्षेत्र खुप मोठे आहे.
गाफिलपणाचा अभाव म्हणजे जाणीव, स्वतःला ओळखणे म्हणजे जाणीव.कोणत्याही प्रसंगाचे आकलन होणे म्हणजे जाणीव.भावार्थ, मतितार्थ, अन्वयार्थ समजणं म्हणजे जाणीव.प्रसंगावधन म्हणजे जाणीव.आपला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ ह्याचा मेळ असणे म्हणजे जाणीव.जीवनामध्ये
सुसुत्रता आणावयाची असेल तर जाणीव हवी.
कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही प्रसंगात जाणीवपूर्वक असणे अगत्याचे आहे.नेणीवचा अभाव असणे म्हणजे जाणीव होय.स्वत:चे व परिस्थितीचे भान असणे म्हणजे जाणीव होय.खरेखुरे आकलन होणे जाणीव होय.मागचा पुढचा विचार न करणारे लोक जाणीवेच्या अभावामुळे अडचणीत येतात.परिस्थिती आणि प्रसंगाचे भान नसेल तर विपरीत प्रसंग ओढतात.
आपले कर्तव्य आपण तेव्हाच योग्यरित्या निभावतो , जेव्हा आपणास त्या कर्तव्याची जाणीव असेल.
जाणीव एकप्रकारे व्यावहारिक ज्ञान आहे,ज्याचा प्रत्यक्ष उपयोग असतो, परिणाम असतो.जाणीवेचा संबंध भावभावनांशी असतो.सर्व भाव हे जाणीवेची प्रतिक आहे.आपल्या व इतरांच्या भावना समजणं म्हणजे जाणीव.जाणीव नसणे ही निष्ठूरता आहे, अज्ञान आहे.जे लोक स्वतःलाच ओळखू शकत नाही,ते इतरांना कधीच ओळखू शकत नाही.
इतरांच्या भावनांचा आदर राखणे जाणीवेशिवाय शक्य नसते, कठोरात जाणीवेचा अभाव आहे.जसा
उन्हाचा दाह उन्हात गेल्याविना जाणवत नाही, तसे अनुभवायला आल्याशिवाय जाणीवेच्या कक्षा रुंदावत नाहीत.ज्या गोष्टीचा अनुभव नसतो,त्या जाणवत नाहीत.इतरांच्या दुःखाची, गरीबीची जाणीव तेव्हाच होते, जेव्हा आपणही कधीतरी ते अनुभवलेले असते.
मानवी स्वभावातील जाणीव ही खरी संवेदना आहे.संवेदना जाणीव आहे, जाणीव भान आहे आणि भानावर असणे म्हणजे कर्तव्याची जाण आहे, कर्तव्याची जाणीव असणे म्हणजे जीवन आहे.