हे ईश्वर! जर तू असेल तर,
तसा तू असलाच पाहिजे.
त्याशिवाय काय जगभर
तुझ्या नामाचा गजर सुरू असतो.
हा,तुझे आस्तित्व नाकारणारेही
आता ,विजयी. मुद्रेत वावरत आहेत
पण तू नसेलच तर
तुझे करोडों प्रार्थनास्थळे काय नुसत्याच वास्तू!
जेव्हा निरपराधांचे बळी जातात
तेव्हाही तुझ्या असण्याविषयी शंका येते.
तुला नाकारणारांचे जाऊ दे ,
किमान तुझी आरती ओवाळणारांना तरी धीर दे.
हे ईश्वर! सर्व तुझी लेकरे आहेत म्हणतात
मग लेकरांनाअसे वाऱ्यावर सोडून
तू कोणत्या कामात गुंतला आहेस.
चराचरात तू आहे असाही
भक्तांचा दावा आहे
मग कोरोना हेही तुझेच नाव आहे का?
जन्माला घालून मारण्याचा हा
तुझाच खेळ आहे.
तुझ्यासाठी निर्माण केलेली संगमरवरी वास्तू
,तिच्यावर सोन्याचा कळस हे तुला कमी पडले का?
तुझ्या मूर्तीवर रत्नाचे हार,दूधा तुपाचे अभिषेक तुला पुरेसे नाहीत का!
हे ईश्वर!कित्येक साधुसंतांनी
तुझ्या प्रेमात ग्रंथ रचना केली
त्यांना तु साक्षात भेटलास ,
त्या ग्रंथांची शेकडों वर्षापासून
पारायणे सुरू आहेत.
तुझी आतापर्यंत गरज वाटली नाही
तरी तुझी भक्ती आम्ही सोडली नाही
आणि आता मानवजातच धोक्यात आली असता
तू मात्र लपून बसलास
हे ईश्वर! न्यायालयात तुझ्या नावाची शपथ घेतली जाते.
घराघरात तुझी पूजा होते.
दगडमातीत देखील तुलाच बघितले जाते.
तुझ्यावर इतके प्रेम करणारे
तू मात्र बेफिकीर,तुला दयावंत म्हणतात ,
कधी दिसणार ती दया.
जन्माच्या आधी आणि
मरणाच्या नंतरही
तुझ्याशिवाय पान हलत नाही
आता तू मूक झालास!
तुझे आस्तित्व नाकारले असते तर
बरेच झाले असते.
मंदिर. मस्जिद ऐवजी आम्ही
मोठमोठे दवाखाने निर्माण केले असते.
तुझ्या नावावरून होणारे
दंगे धोपे थांबलेअसते.
पुजारी,महाराज ,मठाधिपती, साधु संत,वगैरेंच्या
जोखडातून सगळे मुक्त झाले असते.
हे ईश्वर! तू असेल तर माझ्या बोलण्याचा तुला राग येऊ
दे,
नसेलच तर आमचे आम्ही बघून घेऊ.
आमची भाबडी आशा खोटी ठरु नये एवढेच!
- ना.रा.खराद