कारस्थाने

                       कारस्थाने
                                  - ना.रा.खराद

  या जगाचा इतिहास मानवी कारस्थानाने भरलेला आहे. अगदी रामायण,महाभारत ह्यास अपवाद नाहीत.कारस्थानी लोक अत्यंत सक्रिय असतात.सारी उलथापालथ याच लोकांमुळे होते. अनेक रथी महारथी या जमातीने संपवले आहेत.असले कारस्थानी सर्वच ठिकाणी असतात. ते कुंटुबात, गावात, वेगवेगळ्या संस्थेत असतात. ते अत्यंत महत्वकांक्षी असतात.ते जंगलातील लांडग्यासारखे दबा धरून असतात.दगडाला सेंदूर फासून त्याला देव करणारे तर देवाला हरताळ फासणारे असतात. ते केसाने गळा कापणारे हुजरे असतात. ते पक्षपाती असतात.आपला आणि आपल्या माणसाचा ते जाणीवपूर्वक उदोउदो करतात. त्यांच्या भल्यासाठी षडयंत्र रचतात. कारस्थानी लोकांनी छत्रपती शिवरायांना सोडले नाही, छत्रपती संभाजी विरोधात कट कारस्थाने केली. कारस्थानी लोकांनी रामास वनवास दिला.
   कारस्थानी हे दांभिक असतात, ढोंगी असतात. चांगला मुखोटा धारण करुन गुप्त खलबते करतात. सत्याला पायाखाली तुडवतात.न्यायाने वागत नाहीत. कारस्थानी लोकांमुळे घरे उद्ध्वस्त झाली. जिथे कारस्थानी कारभारी असतात ती कोणतीही संस्था टिकू शकत नाही. जे न्यायाने वागत नाही. चांगल्या माणसाविषयी कंड्या पसरवतात. त्यास नामोहरम करतात, त्यांची
उपेक्षा करतात. कारस्थानी लोक आपला हेतू
कळू देत नाहीत. दाखवायचे आणि खायचे यांचे वेगळे दात असतात.ते अत्यंत पाताळयंत्री असतात.इच्छित साध्य करण्यासाठी ते किती घसरतील सांगता येत नाही. ते आपल्या धन्याचे स्तुतिपाठक असतात.त्यांचे पाठबळ घेऊनच ते अत्याचाराची ताकत प्राप्त करून घेतात.ते सोयिस्करपणे षडयंत्र रचतात आणि तशी परिस्थिती निर्माण करतात,कांगावा किंवा देखावा करतात. ते पडद्याआडून खलबते करतात. हाती असलेल्या सत्तेचा गैरफायदा घेतात. चांगल्या गोष्टी विषयी उघड प्रेम दाखवतात पण गुप्तपणे वाईट गोष्टींना त्यांचा
पाठिंबा असतो.स्तुतिपाठक त्यांना प्रिय असतात. सत्याचे त्यांना वावडे असते.स्वाभिमान नसलेली हि जमात छाती काढून चालते.आपले मित्र, नातेवाईक यांची
ते पाठराखण करतात.
  कारस्थानी लोक छळवादी असतात. छळाचा
राक्षसी आनंद त्यांना मिळतो.कारस्थानी लोकांची वाणी गोड असते.चेहरा चारित्र्यवानअसतो.त्याच्याआडूनच त्यांचा खेळ चालतो.ते अन्यायी असतात. 
कारस्थानी लोक ओळखता आली पाहिजेत.त्यांचे कारस्थाने वेळीच ताडली पाहिजे. अधिकारांपासून त्यांना वंचित ठेवले
पाहिजे. त्यांच्या कारस्थानांना बळी पडू नये. कारस्थाने उघडी पाडावीत.सत्याचे,समतेचे,न्यायाचे,निरपेक्षतेचे
एक निरोगी वातावरण घरात,गावात व इतरत्र
निर्माण करुया.
    
Tags

एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.